भारतात सन २०१७ चा विचार करता सर्वसाधारणपणे सातपैकी एका व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या प्रकारची मानसिक व्याधी असल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे. या व्याधीची तीव्रता कमी किंवा अधिक असू शकते. यात नैराश्य, चिंता यांचे प्रमाण तुलनेत अधिक असल्याचे दिसून आले आहे.

भारतात एकूणच रोगांच्या तुलनेत १९९० पासून मानसिक व्याधींची समस्या राज्यनिहाय कशी आहे, याबाबतचा अहवाल ‘लॅन्सेट सायकियाट्री’ या पत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. मानसिक व्याधींमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचे प्रमाण भारतात १९९० पासून २०१७ पर्यंत दुपटीने वाढले असल्याचे या अहवालात म्हटले आहे. या व्याधींमध्ये नैराश्य, भयगंड, सिझोफ्रेनिआ, व्यक्तीदुभंग, वर्तनविषयक समस्या, गतिमंदता यादींचा समावेश आहे.

याबाबत झालेल्या अभ्यासाचे निष्कर्ष सोमवारी प्रसिद्ध करण्यात आले. त्यानुसार भारतात २०१७ मध्ये १९ कोटी ७० लाख लोकांना मानसिक व्याधी जडल्या होत्या. यापैकी चार कोटी ६० लाख लोकांना चिंतेचे विकार जडले होते. भारतात साधारणपणे चिंता आणि नैराश्याचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण जास्त आहे. विशेषत: भारतातील दक्षिणेकडील राज्ये आणि महिलांमध्ये तुलनेत हे प्रमाण जास्त आहे.

भारतातील प्रौढांचा विचार केला असता वृद्धत्वाकडे झुकलेल्या लोकांमध्ये नैराश्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले. भारतातील आत्महत्यांच्या प्रश्नाशी नैराश्याचा संबंध दिसून येतो. एकूणच भारतात मानसिक व्याधी टाळण्यासाठी, त्या नियंत्रणात ठेवण्यासाठी परिणामकारक उपाययोजना करण्याची गरज आहे, असे दिसून येते.

दक्षिणेतील राज्यांत मानसिक व्याधींचे प्रमाण जास्त असले, तरी उत्तरेतील राज्यांमध्ये बालपणी उद्भवणाऱ्या मानसिक व्याधींचे प्रमाण अधिक आहे, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक प्रा. बलराम भार्गव यांनी दिली.