Diabetes Control Tips: भारतीय स्वयंपाकघरातील एक प्रमुख पदार्थ असलेल्या मेथीच्या दाण्यांना अनेक आजारांवर प्रभावी मानले जाते. डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रामुख्याने मेथीचे दाणे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का की हे छोटेसे दाणे तुमच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी नेमकं कसं काम करत असेल? ज्येष्ठ डायबिटीज तज्ज्ञ डॉ. मोहन यांच्या मते, मेथीच्या दाण्यांमधील उच्च फायबर आणि अमिनो अॅसिड आतड्यांमधील ग्लुकोजचे शोषण मंदावतात आणि इन्सुलिनच्या स्त्रावाला चालना देतात. मात्र याला औषधांना पर्याय मानता येणार नाही.

डॉ. मोहन यांच्या मते, डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी केवळ औषधांवर अवलंबून राहणे पुरेसे नाही. ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी नियमित शारीरिक हालचाल, तणावाचे व्यवस्थापन आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळेनुसार औषध घेणे महत्त्वाचे आहे. तसंच आपल्या आहारात काही विशिष्ट पदार्थांचा समावेश करणे देखील फायद्याचे ठरू शकते. मेथीचे सेवन करणे डायबिटीजसाठी प्रभावी ठरू शकते. त्याचे फायदे अनेक अभ्यासांमध्ये नमूद केले गेले आहेत. तर मग जाणून घेऊया डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी मेथीचे दाणे कसे प्रभावी ठरू शकतात…

मेथी हा डायबिटीजसाठी उपाय आहे का?

डॉ. मोहन यांनी स्पष्ट केले की, मेथी हा डायबिटीजवरील इलाज नाही. डायबिटीजवरील कोणत्याही उपचाराला किंवा औषधाला पर्याय म्हणून तिचा विचार केला जाऊ शकत नाही. काही संशोधनानुसार, आहारात मेथीचा समावेश केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे डायबिटीज असलेली व्यक्ती संतुलित आहाराचा भाग म्हणून मेथीचा समावेश करू शकते. मात्र मोथीसाठी डॉक्टरांनी दिलेली औषधे थांबवू नये.

मेथीचे दाणे कसे कार्य करतात?

मेथीच्या दाण्यांमध्ये दोन प्रमुख घटक असतात. गॅलॅक्टोमॅनॅन हा एक विद्राव्य फायबर आहे. दुसरे ४-हायड्रॉक्सिआयसोलेउसीन नावाचे एक अमिनो अॅसिड असते. जेव्हा रूग्ण मेथीचे दाणे खातो, तेव्हा त्यातील विद्राव्य फायबर पचनसंस्थेमध्ये (आतड्यांमध्ये) जेलसारखी रचना तयार करते, त्यामुळे आतड्यांद्वारे कर्बोदके आणि ग्लुकोजचे शोषण मंदावते. परिणामी, जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. तसंच त्यातील अमिनो अॅसिड स्वादुपिंडाला नैसर्गिकरित्या इन्सुलिन स्त्रवणासाठी उत्तेजित करते आणि इन्सुलिन संवेदनशीलता वाढवते.

किती आणि कसे प्रमाण असेल?

मेथीचे दाणे योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी सेवन केल्यास ते प्रभावी ठरतात. १ चमचा (५-१० ग्रॅम) मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी पिऊन आणि दाणे चावून खाणे हे पचनापासून ते डायबिटीज नियंत्रणापर्यंत सर्व गोष्टींसाठी प्रभावी ठरते. मेथी फायदेशीर आहे, मात्र तिच्या अतिसेवनाने पचनक्रिया बिघडू शकते. तिचे अतिसेवन केल्यास पोटदुखी, जुलाब आणि पोट फुगणे यांसारखे त्रास होऊ शकतात. त्यामुळे मेथीच्या प्रमाणाकडे लक्ष असावे.

‘या’ लोकांनी सावध राहावे

जर एखादा रूग्ण आधीच इन्सुलिन किंवा तोंडावाटे घ्यायच्या उच्च मात्रेच्या औषधांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असेल, तर मेथीच्या अतिसेवनामुळे रक्तातील साखरेची पातळी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. मेथीमध्ये उष्णता निर्माण करणारा गुणधर्म असतो आणि त्यामुळे गर्भाशयाचे आकुंचन होऊ शकते. म्हणूनच गर्भवती महिलांनी सल्ल्याशिवाय तिचे अतिसेवन टाळावे.

जीवनशैलीतील बदलही आवश्यक

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, जर तुम्हाला डायबिटीज नियंत्रणात ठेवायचे असेल तर मेथीच्या दाण्यांसोबत जीवनशैलीत बदल करणेही आवश्यक आहे. डॉ. मोहन यांच्या मते, नियमित ३० मिनिटांचे चालणे, कर्बोदकांवर नियंत्रण आणि वेळेवर औषधोपचार यांसोबत हा उपाय अत्यंत प्रभावी ठरतो.