Blood sugar control tips: मधुमेही रुग्णांसाठी, रक्तातील साखरेचे नियंत्रण करणे हे एक मोठे दैनंदिन आव्हान बनत चालले आहे. बदलती जीवनशैली, फास्ट-फूड खायची वाढती सवय, शारीरिक हालचालींचा अभाव व मानसिक ताण यांसारख्या घटकांमुळे रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होऊ शकते. कधी कधी रक्तातील साखर अचानक वाढते आणि कधी कधी औषधोपचार करूनही ती अनियंत्रित राहते. दीर्घकालीन, अनियंत्रित रक्तातील साखरेचे हृदय, मूत्रपिंड, डोळे आणि नसांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. म्हणून रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
या कारणास्तव, बरेच लोक औषधांव्यतिरिक्त, नैसर्गिक आणि त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत सहज समाविष्ट करता येतील, असे घरगुती उपायदेखील शोधतात. असाच एक लोकप्रिय उपाय म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे पाणी पिणे. १५ वर्षांपासून आयुर्वेदिक औषधांनी लोकांवर उपचार करणारे आयुर्वेदिक आणि युनानी औषधांचे तज्ज्ञ म्हणतात की, मेथीचे दाणे रात्रभर भिजवून सकाळी पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी सामान्य राहण्यास मदत होते. मेथीमध्ये असलेले पोषक घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकतात. मेथीच्या दाण्यांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होण्यास कशी मदत होते याबाबत आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.
मेथीचे दाणे रक्तातील साखर कशी नियंत्रित करतात?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मेथीच्या बियांमध्ये विरघळणारे फायबर आढळते, जे शरीरात साखरेचे शोषण कमी करण्यास मदत करू शकते. त्यामुळे रक्तातील साखरेची अचानक वाढ होण्याचा धोका कमी होऊ शकतो. मेथीच्या बियांमध्ये ४-हायड्रॉक्सीआयसोल्यूसिन नावाचे दुर्मीळ अमीनो आम्ल असते, जे इन्सुलिन वाढवते. पबमेड आणि एमडीपीआयच्या संशोधनानुसार, हे घटक स्वादुपिंडाच्या बीटा पेशींना उत्तेजित करतात. त्यामुळे इन्सुलिनचा स्राव थेट वाढतो, ज्यामुळे रक्तातील ग्लुकोज पेशींपर्यंत पोहोचण्यास मदत होते आणि साखरेची पातळी कमी होते.
मेथीच्या बियांमध्ये असलेले ५०% विरघळणारे फायबर साखरेचे शोषण विलंबित करते. हे फायबर पोटात जाड जेल बनवते. ते कार्बोहायड्रेट पचन आणि साखर शोषणाची प्रक्रिया मंदावते. परिणामी, खाल्ल्यानंतर होणारी साखर वाढ रोखली जाते. जर्नल ऑफ डायबेटीज अँड मेटाबॉलिक डिसऑर्डर्समधील संशोधनातून असे दिसून आले आहे की, मेथीच्या बिया पेशींची इन्सुलिन संवेदनशीलता वाढवतात. त्यामुळे शरीरातील इन्सुलिन अधिक प्रभावीपणे कार्य करते, जे टाईप २ मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी खूप महत्त्वाचे आहे . अनेक क्लिनिकल चाचण्यांमधून असे दिसून आले आहे की, दोन-तीन महिने मेथीचे सेवन केल्याने HbA1c पातळी ०.८% ते १% कमी होऊ शकते.
संशोधनातून असे दिसून आले आहे की, मेथीचे नियमित सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण सरासरी २०-२५% कमी होते. काही अभ्यासांतून असे आढळून आले आहे की, मेथीचे नियमित प्रमाणात सेवन केल्याने मधुमेहाचे व्यवस्थापन होण्यास मदत होते.
ते कसे सेवन करावे?
एक चमचा मेथीचे दाणे रात्रभर एका ग्लासभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या. हवे असल्यास तुम्ही भिजवलेल्या बिया चावू शकता.
आवश्यक खबरदारी
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, केवळ मेथीच्या पाण्यावर अवलंबून राहणे ही चांगली संकल्पना नाही. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे ही मधुमेह नियंत्रणाची गुरुकिल्ली आहेत. जर तुम्ही आधीच मधुमेहाची औषधे घेत असाल, तर नियमित मेथीचे सेवन सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण- त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी जास्त प्रमाणात कमी होऊ शकते.
(या लेखात दिलेली माहिती केवळ सामान्य माहितीवर अवलंबून आहे. हा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचारांचा पर्याय म्हणून समजू नये. तुमचा आहार, व्यायाम किंवा औषधे यांमध्ये कोणताही बदल करण्यापूर्वी नेहमीच तुमच्या डॉक्टरांचा किंवा पात्र आरोग्य सेवा व्यावसायिकांचा सल्ला घ्या. आरोग्य आपत्कालीन परिस्थितीत, ताबडतोब जवळच्या रुग्णालयात संपर्क साधा.
