जेव्हा इंटरनेट आजइतकं अगदी सहज उपलब्ध होत नव्हतं आणि सामान्यांच्या आवाक्यातही नव्हतं, तेव्हापासून जगभरातल्या कम्प्युटर्सवर इंटरनेट वापरण्यासाठी मायक्रोसॉफ्टच्या Internet Explorer शिवाय युजर्सकडे पर्याय नव्हता. आत्ता ज्या प्रमाणात नेटिझन्स गुगल क्रोम हा सर्वपरिचित ब्राऊजर वापरतात, त्याहूनही जास्त प्रमाणात तेव्हा कम्प्युटर्समध्ये इंटरनेट एक्सप्लोरर्सचा वापर होता. पण बदलत्या काळात इंटरनेट एक्सप्लोररला प्रचंड स्पर्धा निर्माण होऊ लागली. आजघडीला जगभरातल्या इंटरनेट युजर्सपैकी अवघे ३.८ टक्के लोकं इंटरनेट ब्राऊजिंगसाठी इंटरनेट एक्सप्लोररचा वापर करतात. त्यामुळे वाढती स्पर्धा आणि युजर्सचा कल लक्षात घेता अखेर मायक्रोसॉफ्टनं इंटरनेट एक्सप्लोररला निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची तारीख देखील आत्ताच जाहीर करून टाकली आहे!

एक्सप्लोररचा २५ वर्षांचा प्रवास

१९९५ साली, जेव्हा मोजक्या लोकांनाच कम्प्युटरचा वापर शक्य होता, तेव्हा इंटरनेट एक्सप्लोररचा जन्म झाला. तेव्हापासून गेल्या जवळपास २५ वर्षांपासून मायक्रोसॉफ्टच्या आणि मायक्रोसॉफ्टची ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या सर्व कम्प्युटर्समध्ये इंटरनेट एक्सप्लोररचं अस्तित्व आहे. पण या काळात बाजारात निर्माण झालेल्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोररनं स्वत:मध्ये तसे बदल न केल्यामुळे वापरकर्ते हळूहळू गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स अशा ब्राऊजर्सकडे वळू लागले!

सद्यघडीची बाजाराची परिस्थिती पाहाता इंटरनेट एक्सप्लोरर अवघे ३.८ टक्के वापरकर्ते वापरत आहेत. त्यातही अनेक जुने पण महत्त्वाचे सॉफ्टवेअर्स फक्त इंटरनेट एक्सप्लोररवरच चालू शकतात, अशा वापरकर्त्यांची संख्या जास्त आहे. त्याउलट गुगल क्रोमनं इटरनेट ब्राऊजिंगचं ७० टक्के मार्केट खिशात घातलं आहे.

अनधिकृत सॉफ्टवेअरचा धोका

‘या’ तारखेपासून इंटरनेट एक्सप्लोरर बंद!

दरम्यान, इंटरनेट एक्सप्लोरर पुढील वर्षी बंद करण्यात येणार असल्याचं मायक्रोसॉफ्टकडून जाहीर करण्यात आलं आहे. “इंटरनेट एक्सप्लोरर ११ हे डेस्कटॉप अॅप्लिकेशन निवृत्त होत असून १५ जून, २०२२ पासून ते वापरता येणार नाही”, अशी माहिती ‘मायक्रोसॉफ्ट एज’चे प्रोग्राम मॅनेजर सीन लिंडरसे यांनी दिली आहे.

दरम्यान, इंटरनेट एक्सप्लोरर निवृत्त करत असताना २०१५ साली मायक्रोसॉफ्टनं बाजारात आणलेल्या ‘एज’ या ब्राऊजरसाठी मायक्रोसॉफ्ट बरीच मेहनत घेत आहे. विंडोज १०मध्ये मायक्रोसॉफ्टकडून एज हेच सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून दिलं जात आहे. याशिवाय, मायक्रोसॉफ्टनं याआधीच इंटरनेट एक्सप्लोरर ११ ला मायक्रोसॉफ्ट टीम वेब अॅपची सेवा देणं बंद केलं आहे. त्यासोबतच, या वर्षाच्या अखेरीपर्यंत मायक्रोसॉफ्ट ३६५ प्रोडक्टची सेवा देखील इंटरनेट एक्सप्लोररसाठी बंद करण्याचं नियोजन कंपनीकडून सुरू असल्याची माहिती मिळत आहे. याचा अर्थ, मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर वापरणाऱ्या युजर्सला मायक्रोसॉफ्ट ३६५ वापरता येणार नाही.