Smriti Irani Dal Soup: अॅनिमिया म्हणजेच रक्तक्षयाची समस्या विशेषतः महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते. सततचा थकवा, अशक्तपणा, डोकेदुखी, त्वचा फिकट दिसणे किंवा कोणतेही काम करण्याची इच्छा न होणे, ही त्याची काही सामान्य लक्षणे आहेत. मात्र, या समस्येवर आपल्या स्वयंपाकघरातील साध्या पदार्थांचा उपयोग होऊ शकतो का? अभिनेत्री मीरा कपूरने नुकताच तिचा अनुभव सांगितला आणि एका साध्या सूपबाबतची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

मीरा कपूरची नुकतीच माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याशी विमान प्रवासादरम्यान भेट झाली. या प्रवासात दोघींमध्ये कोडिंग प्लॅटफॉर्म, इतिहास यांसह अनेक विषयांवर गप्पा रंगल्या. मात्र, या भेटीदरम्यान मीराला स्मृती इराणी यांनी यापूर्वी सांगितलेल्या एका खास सूपची आठवण झाली. हे सूप अॅनिमियाच्या त्रासात आपल्याला विशेष उपयोगी ठरल्याचे मीराने सांगितले.

मीराने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले, “मलाही आयुष्यभर अॅनिमियाचा त्रास झाला आहे. मी हे सूप तीन महिने घेतले आणि माझ्या रक्ताच्या तपासणीच्या अहवालांमध्ये खरोखरच फरक जाणवला. हे फक्त एक सूप आहे. त्यात काहीही खास किंवा महागडे नाही. आपल्या नेहमीच्या भारतीय स्वयंपाकघरात सहज मिळणारे पदार्थच यासाठी वापरले जातात.”

मीराने पुढे दररोज अर्धा कप सूप घेण्याची शिफारस केली. स्मृती इराणी यांनी यापूर्वी २०२४ मध्ये ‘कर्ली टेल्स’सोबतच्या एका संवादात हे आयर्नयुक्त सूप शेअर केले होते. भारतातील अनेक महिलांना अॅनिमियाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो, असे त्यांनी त्यावेळी नमूद केले होते.

नेमकं काय आहे या सूपमध्ये?

हे सूप तयार करण्यासाठी शेवग्याची पाने, मसूर डाळ, कांदा, आले, टोमॅटो आणि आवडीनुसार मसाल्यांचा वापर केला जातो. हे सर्व पदार्थ पाण्यात उकळून काही वेळ शिजवल्यानंतर सूप तयार होते. शाकाहारी व्यक्तींसाठी लोह मिळवण्याचा हा आहारातील एक चांगला पर्याय ठरू शकतो.

ॲस्टर सीएमआय रुग्णालय, बंगळुरू येथील क्लिनिकल न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स विभागाच्या प्रमुख एडविना राज यांनी या सूपच्या पोषणमूल्यांबाबत माहिती दिली. त्यांच्या मते, मसूर डाळीतून वनस्पतीजन्य लोह आणि प्रथिने मिळतात, तर शेवग्याच्या पानांमध्ये लोह आणि फोलेट असते. टोमॅटोमध्ये असलेले ‘क’ जीवनसत्त्व वनस्पतीजन्य लोह शरीराला शोषून घेण्यास मदत करते. कांदा आणि आले यांमुळे चव वाढण्यासोबतच काही पोषक घटकही मिळतात.

मात्र, हे सूप अॅनिमियावरील उपचार नाही, हे लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एडविना राज सांगतात, “एका वाटीतील सूपमधून मिळणारे लोह गंभीर कमतरता भरून काढण्यासाठी पुरेसे असेलच, असे नाही. अॅनिमियाचे निदान झालेल्या व्यक्तींना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लोहाची औषधे किंवा मूळ कारणावर उपचार करण्याची आवश्यकता असू शकते.”

महिलांमध्येच अॅनिमिया अधिक का दिसतो?

महिलांमध्ये अॅनिमिया होण्याचे प्रमुख कारण म्हणजे मासिक पाळीदरम्यान होणारा रक्तस्राव. त्यामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होऊ शकते. गर्भधारणा आणि स्तनपानाच्या काळातही शरीराची लोहाची गरज वाढते. त्याशिवाय अतिरक्तस्राव होणारी मासिक पाळी, वारंवार होणाऱ्या गर्भधारणा, आहारातून पुरेसे लोह न मिळणे आणि शरीराला लोह शोषून घेण्यात अडचण येणे यांमुळेही अॅनिमियाचा धोका वाढतो.

लोह हे हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी आवश्यक असते. हिमोग्लोबिनच्या माध्यमातून शरीराच्या विविध भागांपर्यंत प्राणवायू पोहोचतो. त्यामुळे लोहाची कमतरता झाल्यास सतत थकवा, अशक्तपणा, डोकेदुखी, एकाग्रता कमी होणे, त्वचा फिकट दिसणे व ऊर्जा कमी होणे, अशी लक्षणे जाणवू शकतात.

सूपसोबत आहारात ‘हे’ पदार्थही ठेवा

अॅनिमियाचा धोका कमी करण्यासाठी मसूर डाळीव्यतिरिक्त हरभरा, राजमा, सोयाबीन, टोफू, हिरव्या पालेभाज्या, नाचणी, तीळ, भोपळ्याच्या बिया, कडधान्ये, सुकामेवा आणि लोहयुक्त तृणधान्यांचा आहारात समावेश करावा, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

लोहयुक्त पदार्थांसोबत आवळा, पेरू, संत्री, लिंबू, टोमॅटो आणि ढोबळी मिरची यांसारखे ‘क’ जीवनसत्त्वयुक्त पदार्थ घेतल्यास वनस्पतीजन्य लोहाचे शोषण होण्यास मदत होते. त्याच वेळी लोहयुक्त जेवणाच्या अगदी लगेच चहा किंवा कॉफी पिणे टाळावे. त्यातील काही घटक शरीरातील लोहाचे शोषण कमी करू शकतात.

मात्र, अॅनिमियाची लक्षणे वारंवार जाणवत असतील किंवा रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण खूपच कमी असेल, तर केवळ घरगुती सूपवर अवलंबून राहणे योग्य नाही. अशा वेळी वैद्यकीय तपासणी करून अॅनिमियामागचे नेमके कारण शोधणे गरजेचे आहे. आहारातील कमतरता, रक्तस्राव किंवा इतर कोणतीही आरोग्यविषयक समस्या यापैकी कारण कोणते आहे, हे डॉक्टरांच्या सल्ल्याने निश्चित करता येते.