Mobile Addiction Treatment : मोबाईलशिवाय हल्ली प्रत्येकाचेच जीवन अपूर्ण आहे. बहुतेक लोकांना सकाळी उठल्याबरोबर मोबाईल पाहण्याची सवय असते.पण आता लहान मुलांच्या हातात मोबाईल अगदी खेळण्यासारखा पोहोचला आहे. ती मोबाईलमध्ये तासंतास कार्टून पाहताना दिसतात. अनेकदा या मुलांकडून मोबाईल काढून घेताच ती मोठ्याने रडू लागतात, रागावता किंवा जमिनीवर लोळू लागतात, हे पाहून पालकांनाही काळजी वाटू लागते. अनेकदा हे हट्टीपणा किंवा सवय समजून दुर्लक्ष केले जाते,परंतु आरोग्य तज्ज्ञांचे असे मत आहे की, हे वर्तन नेहमीच सामान्य नसते. हे लक्षण वेळीच समजून घेणे खूप महत्वाचे आहे, अन्यथा भविष्यात त्याचा मुलाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
हे सामान्य का नाही?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मुले दोन वर्षांची होईपर्यंत त्यांना स्क्रीनपासून दूर ठेवावे. तसेच दोन ते पाच वयोगटातील मुलांना फोन देण्याचे प्रमाण मर्यादित ठेवा, कारण याच वयात मुले व्यसनाधीन होतात.जर एखादा मुलगा जास्त रडत असेल, जमिनीवर लोळत असेल किंवा मोबाईल काढून घेतल्यावर रागाने वस्तू फेकत असेल तर ते सामान्य लक्षण नाही. जर तुमचे मूल हे दीर्घकाळ करत राहिले तर खालील समस्या दिसू शकतात.
१) झोपेचा अभाव
२) डोळे दुखणे किंवा अशक्तपणा
३) लक्ष केंद्रित करण्यात अडचण
४) अभ्यासात रस कमी होणे
५) सामाजिक वर्तनात बदल
लहान मुलं का रडतात?
१) डोपामिनचा परिणाम
२) डिजिटल एडिशनची सुरुवात
३) भावनात्मक नियंत्रणाचा अभाव
पालकांनी काय करावे?
१) तुमच्या मुलाचा मोबाईल अचानक हातातून काढून घेण्याची चूक करू नका; त्याऐवजी त्यांचा मोबाईल वापरण्याचा वेळ हळूहळू कमी करा. दररोज तो १० मिनिटांनी कमी करण्याचा प्रयत्न करा.
२) मुलाला बाहेर खेळण्याची सवय लावा. त्यांना खेळायला, चित्र रंगविण्यासाठी, गोष्टी ऐकण्यासाठी किंवा कोडी सोडवण्यासाठी प्रोत्साहन द्या. नवीन आणि मजेदार पर्याय उपलब्ध असल्यास त्यांची मोबाईल हातात घेण्याची सवय कमी होईल.
३) मुलांना वेळ द्या आणि त्यांच्यासमोर तुम्ही मोबाईल वापरण्याचे प्रमाण कमी करा. यामुळे तुमच्या मुलाचे मोबाईल वापरण्याचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल.
४) जर मूल खूप आक्रमक होत असेल किंवा त्याच्या वागण्यात मोठा बदल होत असेल तर चाइल्ड सायकोलॉजिस्टचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल.
