केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी 2021-22 या वर्षासाठी सोमवारी (दि.1) अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात सीतारामन यांनी मोबाइल फोन आणि चार्जर महाग होणार असल्याची घोषणा केली. अर्थमंत्र्यांनी स्मार्टफोन आणि चार्जर दोन्हीवर कस्टम ड्युटी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन दर 1 एप्रिल 2021 पासून लागू होईल.

कस्टम ड्युटी वाढवल्याने आता मोबाइल आणि चार्जरची खरेदी महाग होणार आहे. मोबाइलच्या सुट्ट्या भागांवर 0 टक्के कस्टम ड्युटी होती ती आता 2.5 टक्के वाढवण्यात आल्याने मोबाइल फोन लवकरच महागणार आहेत. तर, मोबाइलचं चार्जर आणि हेडफोनही महाग होणार आहेत. कारण, मोबाइल चार्जर आणि अ‍ॅडप्टरच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी आवश्यक असलेल्या प्रिंटेड सर्किट बोर्ड असेंबली आणि मॉड्यूल्ड प्लॅस्टिकवरील कस्टम ड्युटीही 10 वरुन 15 टक्के झाली आहे. मोबाइल चार्जरच्या काही पार्ट्सवर लागणारी कस्टम ड्युटी 10 टक्के करण्यात आली आहे. यावर आधी कस्टम ड्युटी आकारली जात नव्हती. लीथियम आयन बॅटरी आणि बॅटरी पॅकच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी आवश्यक इनपुट्स, पार्ट्स आणि सब-पार्ट्सरही कस्टम ड्युटी शून्य टक्क्यांवरुन 2.5 टक्के झाली आहे.

– बजेट स्मार्टफोनच्या किंमतीत थोडीफार वाढ होणार, पण प्रीमियम स्मार्टफोन जास्त महाग होण्याची शक्यता.
– कॅमेरा, कनेक्टर, पोर्ट्स यांसारखे सुट्टे पार्ट्स महाग झाल्याने मोबाइल दुरूस्तीसाठी जास्त खर्च येणार
-कस्टम ड्युटी वाढल्याने काही स्मार्टफोन ब्रँड्स आपल्या नवीन स्मार्टफोनच्या बॉक्समध्ये चार्जर, हेडफोन यांसारख्या मोफत अ‍ॅक्सेसरीज देणार नाहीत.
– आयात शुल्क लावल्यामुळे चार्जरसाठी केबल, अ‍ॅडप्टर अशा मेड इन इंडिया पार्ट्सचा वापर वाढण्याची शक्यता.