ज्या शाळांमध्ये मोबाइलवर बंदी घालण्यात आली, तेथे परीक्षांमध्ये मुलांची कामगिरी सुधारली आहे, असे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने केलेल्या संशोधनात दिसून आले आहे.
मोबाइल फोनवर शाळांमध्ये बंदी घातल्याने मुलांना संपूर्ण शैक्षणिक वर्षांत एक आठवडा जादा शिक्षण देणे शक्य होते, असा संशोधकांचा दावा आहे.
चार शहरांमधील शाळांमध्ये मोबाइल बंदी केल्यानंतर मुलांच्या गुणांची तपासणी केली असता ते सहा टक्क्य़ांनी वाढल्याचे दिसून आले. ज्या मुलांना कमी गुण मिळत होते व जे कमी उत्पन्न गटातील होते त्यांचेही गुण सुधारले, असे संशोधनात दिसून आल्याचे सांगण्यात आले.
‘बीबीसी न्यूज’ने याबाबत दिलेल्या वृत्तात म्हटले आहे, की मोबाइल तंत्रज्ञानाचे अनेक फायदे असले, तरी त्यामुळे लक्ष विचलित होते. उत्पादनक्षमता कमी होते व अध्ययनात लक्ष लागत नाही, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
संशोधक लुईस फिलीप बेलँड व रीचर्ड मर्फी यांनी सांगितले, की आमच्या मते मोबाइल बंदीमुळे विद्यार्थ्यांची कामगिरी सुधारली एवढेच नव्हे तर कमी उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांचे गुणही वाढले. त्यांना शाळेत दर आठवडय़ाला एक तास जास्त मिळू लागला, त्यांची शाळा वर्षांत पाच दिवसांनी वाढली.
बर्मिगहॅम, लिसेस्टर, लंडन व मँचेस्टर येथील शाळांमध्ये मोबाइल फोन वापरात असताना व वापरात नसताना अशा दोन्ही स्थितीत माध्यमिक शाळात हे संशोधन करण्यात आले. जी मुले फार चमकदार नसतात त्यांचे मोबाइल फोन सारख्या गोष्टींनी लक्ष चटकन विचलित होते व मोबाइल फोन असलेले हुशार विद्यार्थी वर्गात लक्ष केंद्रित करू शकतात, असेही संशोधकांचे म्हणणे आहे.

मोबाइलमुळे काय होते ?
*कामाच्या ठिकाणी उत्पादकता कमी होते.
*शाळेत विद्यार्थ्यांचे लक्ष लागत नाही.
*कमी हुशार मुलांचे गुण आणखी कमी होतात.
*मोबाइल वापरला नाही तर गुण सहा टक्के वाढले.