Mobile Review : ‘ओप्पो ए ५७’ मोबाइल बाजारात उपलब्ध

कॅमेरा अधिकाधिक चांगला करण्याचा ओप्पोचा प्रयत्न

फोटो हा नेहमी आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा आणि कुतूहलतेचा विषय असतो, कारण आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण त्यात कैद झालेले असतात आणि ते क्षण आपल्याला नेहमीच सकारात्मक ऊर्जा देत असतात. सण समारंभ असो किंवा कुठे फिरायला जाणे, असो फोटो चांगले येणे महत्त्वाचे असते आणि हे क्षण पटकन टिपता यावेत यासाठी महत्त्वाचे साधन म्हणजे मोबाइल. मोबाइलच्या या उपयोगामुळेच त्यातील कॅमेरा हा अगदी महत्त्वाचा भाग आहे. अगदी लहानांपासून ते मोठय़ांपर्यंत अगदी सहज कोणीही मोबाइलचा उपयोग करून फोटो काढू शकतो म्हणूनच मोबाइलमधील कॅमेरा हा जास्तीत जास्त चांगला असावा असाच सगळ्यांचा प्रयत्न असतो. मोबाइल कंपन्यासुद्धा अगदी हाच विचार करून जास्तीत जास्त चांगले कॅमेरा असलेले मोबाइल बाजारात कसे येतील याचाच प्रयत्न करीत असतात. ओप्पो ही कंपनीसुद्धा तिच्या कॅमेरांसाठी प्रसिद्ध आहे. ओप्पोने त्यांचा नवीन फोन ‘ओप्पो ए ५७’ हा नवीन मोबाइल बाजार उपलब्ध केला आहे.

सेल्फी काढण्याची आवड तशी तरुणाईमध्ये प्रसिद्ध आहेच पण मोबाइलला मधील पुढील कॅमेराचा उपयोग व्हिडीओ कॉलसाठीही होतो म्हणूनच मोबाइलचा पुढील कॅमेरा अधिकाधिक चांगला कसा करता येईल, हा प्रयत्न ओप्पो कंपनीने केलेला दिसतो. ‘ओप्पो ए ५७’ या मोबाइल मध्ये पुढील कॅमेरा १६ मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार यात कमी प्रकाशातसुद्धा चांगले फोटो येतील. ‘ओप्पो ए ५७’ कॅमेऱ्याची दोन नवीन वैशिष्टय़ेसुद्धा आहेत. यात तुम्हाला फोटो काढण्यासाठी बटण दाबण्याची आवश्यकता नाही. फक्त तुम्ही तुमचा हात मोबाइलसमोर नेला की आपोआप फोटो येईल आणि तुम्ही सेल्फी फोटोंना बोकेह इफेक्ट देऊ शकता (यात तुम्ही तुमचा फोटो काढल्यानंतर तुमच्यामागील बाजूचे चित्र ब्लर करू शकता, ज्यामुळे एखाद्या व्यावसायिक कॅमेरामधून काढले जाणारे फोटो यात काढता येतात). मोबाइलच्या मागच्या बाजूस १३ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि फ्लॅश देण्यात आला आहे. ओप्पो ए ५७ मधे ५.२ इंच चा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या मोबाइलमध्ये कॉलकॉमचा स्नॅॅपड्रॅगॉन ४३५ ऑक्टा कोर प्रोसेसर आणि ड्रीनो ५०५ जीपीयू वापरण्यात आला आहे, ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाइलचा विनाअडथळा उपयोग करू शकता. हा मोबाइल अँड्रॉइड ६.०.१ या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. ‘ओप्पो ए ५७’ या मोबाइलमध्ये थ्री जीबी रॅम आणि ३२ जीबी मेमरी देण्यात आली आहे आणि मेमरी कार्ड वापरण्यासाठी वेगळी जागा देण्यात आली आहे, ज्यामुळे तुम्ही मेमरी कार्डचा उपयोग करून मेमरी स्टोरेज २५६ जीबीपर्यंत वाढवू शकता. ‘ओप्पो ए ५७’मध्ये २९०० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामुळे तुम्ही दिवसभर मोबाइलचा उपयोग करू शकता.

परंतु हा मोबाइल जलद चार्जिग नाही करीत. या मोबाइलची उंची १४९.१ एमएम, रुंदी ७२.९ एमएम, जाडी ७.६५ एमएम आणि वजन १४७ ग्राम आहे. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत हा मोबाइल दोन सिम कार्डला साहाय्य करतो तसेच टूजी, थ्रीजी, फोरजी आणि विओएलटीईला साहाय्य करतो. यात वायफाय, जीपीएस, ब्लूटूथ, एफएम आहे. स्मार्टफोनचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करता यावा म्हणून यात सगळ्या प्रकारचे महत्त्वाचे सेन्सर्स देण्यात आले आहेत. फोनच्या सुरक्षेच्या दृष्टीने यात पुढील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले आहे, ज्याचा उपयोग स्क्रीन अनलॉक करण्यासाठी करू शकता. ‘ओप्पो ए ५७’ ऑनलाइन आणि दुकानात दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे.
फायदे
चांगला कॅमेरा.
मेमरी कार्ड वापरण्यासाठी स्वतंत्र जागा.
ऑनलाइन आणि दुकानात दोन्ही ठिकाणी उपलब्ध.
तोटे
बॅटरी कमी.
अँड्रॉइडच्या जुन्या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो.
जलद चार्जिगला साहाय्य नाही करीत.
मोबाइल किंमत :
ओप्पो ए ५७
रु. १४,९९०/-

response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mobile review of oppo a