Mogra Plant Flowering Tips: पावसाळा सुरू झाला की, घराच्या बाल्कनीपासून अंगणापर्यंत हिरवाई अधिक खुलून दिसू लागते. याच काळात मोगऱ्याचे रोपही अनेकांच्या बागेची शोभा वाढवते. हिरवीगार पाने, नाजूक पांढरी फुले आणि दरवळणारा सुगंध यांमुळे मोगऱ्याचे रोप आवडीने लावले जातो. मात्र, अनेकदा रोपाची वाढ चांगली होत असतानाही त्याला अपेक्षेप्रमाणे फुले येत नाहीत. कधी कळ्या लागतात; पण त्या उमलण्याआधीच गळून पडतात. त्यामुळे रोपाची कितीही काळजी घेतली तरी फुलांचा बहर काही दिसत नाही.
अशा वेळी महागडी खते किंवा रासायनिक उपाय करण्यापूर्वी घरात सहज उपलब्ध असलेल्या एका साध्या पदार्थाचा उपाय करून पाहण्याचा सल्ला बागकामाच्या काही जाणकारांकडून दिला जातो. विशेष म्हणजे हा पदार्थ दिसायला अगदी साधा आणि पांढऱ्या रंगाचा असतो. त्याचा योग्य प्रमाणात वापर केल्यास मातीचा सामू बदलण्यास मदत होऊ शकते आणि मोगऱ्याच्या वाढीस पोषक वातावरण तयार होऊ शकते.
मोगऱ्याला फुले का येत नाहीत?
मोगऱ्याला भरपूर फुले येण्यासाठी केवळ पाणी देणे पुरेसे नसते. तर, योग्य सूर्यप्रकाश, छाटणी, मातीचा निचरा आणि मातीतील पोषक घटक यांचीही भूमिका महत्त्वाची असते. मातीचा सामू म्हणजेच पीएच योग्य नसल्यास काही पोषक घटक रोपाला सहज उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे पाने हिरवी दिसत असली तरी फुलांची संख्या कमी राहू शकते.
याच कारणामुळे मातीचा सामू किंचित आम्लधर्मी ठेवण्याच्या उपायांबद्दल बागकामात चर्चा केली जाते. मात्र कोणताही पदार्थ जास्त प्रमाणात वापरणे रोपासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे घरगुती उपाय करताना प्रमाणाची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
एका मग पाण्यात मिसळा तो पदार्थ
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हा पांढरा पदार्थ नेमका कोणता? त्यासाठी एक मग स्वच्छ पाण्यात अगदी कमी प्रमाणात तो पदार्थ मिसळून द्रावण तयार करण्याचा उपाय सांगितला जातो.
एका मग पाण्यात साधारण एक छोटा चमचा ‘त्या’ पदार्थाची पूड मिसळून, ती व्यवस्थित विरघळवून घ्यावी. द्रावण तयार झाल्यानंतर ते मोगऱ्याच्या रोपाच्या मुळांजवळील मातीत हळूहळू सोडावे. पाणी देण्यापूर्वी माती हलकीशी सैल केल्यास पाणी मुळांपर्यंत पोहोचण्यास मदत होऊ शकते.
मात्र, हा उपाय वारंवार करणे टाळावे. मातीचा सामू अचानक बदलल्यास रोपाच्या मुळांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशा घरगुती उपायांचा वापर मर्यादित प्रमाणात करणे योग्य ठरते.
१५ दिवसांत फुलांना बहर येतो का?
या उपायामुळे काही रोपांमध्ये वाढ आणि कळ्यांची निर्मिती सुधारल्याचे बागकाम करणारे सांगतात. मात्र, १५ दिवसांत हमखास फुले येतील, असे निश्चितपणे सांगता येत नाही. रोपाचे वय, मातीचा प्रकार, हवामान, सूर्यप्रकाश, पाणी आणि आधीची निगा यांवर त्याची फुलधारणा अवलंबून असते.
त्यामुळे या उपायासोबत मोगऱ्याला दररोज किमान पाच ते सहा तास चांगला सूर्यप्रकाश मिळेल, याची काळजी घ्या. कुंडीत पाणी साठून राहणार नाही, याचीही खात्री करा.
जुनी वाळलेली फांदी काढा
मोगऱ्याच्या रोपाला नवीन फांद्या फुटण्यासाठी हलकी छाटणीही उपयुक्त ठरू शकते. सुकलेल्या, कमकुवत किंवा मृतवत फांद्या काढून टाकल्यास रोपाची ऊर्जा नवीन वाढीकडे वळण्यास मदत होते. मात्र, रोपाची अति प्रमाणातही छाटणी करू नये. योग्य वेळ आणि योग्य प्रमाण महत्त्वाचे आहे.
शेवटी जाणून घ्या ‘त्या’ पांढऱ्या पदार्थाचे नाव!
इतका वेळ ज्या साध्या पांढऱ्या पदार्थाचा उल्लेख केला, तो म्हणजे “तुरटी”. तुरटीला इंग्रजीत Alum असे म्हणतात. मातीचा सामू कमी करण्यासाठी तिच्या वापराबद्दल बागकामात काही घरगुती उपाय सांगितले जातात. मात्र, तुरटी ही खत नाही आणि ती मोगऱ्याला फुले आणणारे कोणतेही जादुई औषध नाही. तिचा अतिरेक माती अधिक आम्लधर्मी करू शकतो आणि रोपाच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
त्यामुळे मोगऱ्याला भरपूर फुले हवी असतील, तर तुरटीवरच अवलंबून न राहता योग्य सूर्यप्रकाश, संतुलित खत, योग्य पाणी, चांगला निचरा आणि वेळोवेळी हलकी छाटणी यांकडेही लक्ष द्या. घरगुती उपाय म्हणून तुरटीचा वापर करून पाहत असाल, तर आधी मातीची स्थिती लक्षात घेऊन, तिचा अगदी मर्यादित प्रमाणातच वापर करणे अधिक सुरक्षित ठरेल.
