Monsoon Clothes Drying Hack: पावसाळा सुरू झाला की, सर्वांत मोठी डोकेदुखी ठरते ती ओल्या कपड्यांची. सूर्यप्रकाश नसल्याने कपडे वाळायला उशीर होतो आणि अंतर्वस्त्रे वाळत घालायची झाली की, अनेकांना संकोचही वाटतो. मात्र, घरातील एका साध्या कंगव्याचा असा भन्नाट उपयोग होऊ शकतो, याचा तुम्ही कदाचित विचारही केला नसेल.

पावसाळ्यात घरभर ओलावा, दमट वातावरण आणि सतत सुरू असलेला पाऊस यांमुळे दैनंदिन कामांमध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. त्यात सर्वाधिक त्रासदायक गोष्ट म्हणजे धुतलेले कपडे वेळेत न वाळणे. दिवसभर कपडे वाळत घातले तरी ते ओलसरच राहतात. त्यामुळे त्यातून कुबट वास येण्याची शक्यता वाढते. विशेषतः अंतर्वस्त्रे वाळवण्यासाठी अनेकांना योग्य जागा मिळत नाही किंवा ती उघड्यावर टांगण्यास संकोच वाटतो.

अशाच समस्येवर सोशल मीडियावर एक भन्नाट आणि अतिशय सोपा जुगाड सध्या चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे हा उपाय करण्यासाठी बाजारातून कोणतीही महागडी वस्तू विकत आणण्याची गरज नाही. घरात पडून असलेला एक जुना कंगवा आणि थोडासा दोरा वापरून हा जुगाड सहजपणे करता येतो.

हा उपाय पाहिल्यानंतर अनेक गृहिणींनी तो जुगाड कौतुकास्पद असल्याचे म्हटले आहे. या उपायाद्वारे कमी जागेत एकाच वेळी अनेक अंतर्वस्त्रे वाळत घालता येतात. त्याशिवाय गरज पडल्यास संपूर्ण स्टँड काही क्षणांत दुसऱ्या ठिकाणी हलवता येतो. त्यामुळे हा उपाय अनेकांच्या पसंतीस उतरला आहे.

नेमका काय आहे हा जुगाड?

सर्वप्रथम घरात पडलेला एखादा जुना किंवा कमी वापरात असलेला कंगवा घ्या. कंगव्याचे दात मजबूत असतील, तर हा उपाय अधिक सोपा होतो. त्यानंतर कपडे वाळत घालण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्लिप्स घ्या.

प्रत्येक क्लिपच्या छिद्रातून एक जाडसर दोरा ओवून त्याला गाठ मारा. अशा पद्धतीने सर्व क्लिप्स तयार करून घ्या. आता या दोऱ्यांची टोके कंगव्याच्या प्रत्येक खाचेत अडकवा. त्यामुळे प्रत्येक खाचेला एक क्लिप लटकलेली दिसेल.

त्यानंतर कंगव्याच्या दोन्ही टोकांना स्वतंत्र दोरा बांधा. हा दोरा वापरून कंगवा घरातील खिळा, हूक किंवा हवेशीर जागेतील एखाद्या आधाराला अडकवा. आता त्या क्लिप्समध्ये अंतर्वस्त्रे किंवा छोटे कपडे सहजपणे लावता येतील.

या जुगाडाचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे कोणी पाहुणे अचानक घरी आले तरी संपूर्ण कंगवा काही सेकंदांत काढून दुसऱ्या ठिकाणी हलवता येतो. त्यामुळे अशा वेळी अंतर्वस्त्रांसारखे कपडे लपवण्यासाठी धावपळ करण्याची गरज भासत नाही.

सोशल मीडियावरही मिळतेय पसंती

हा भन्नाट जुगाड Smart Homely Lady या यूट्यूब चॅनेलवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी या कल्पनेचे कौतुक केले असून, कमी खर्चात आणि घरातील उपलब्ध वस्तू वापरून असा उपयोगी उपाय सुचवल्याबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अनेक गृहिणींनी हा उपाय प्रत्यक्ष वापरून पाहिल्याचेही कमेंटमध्ये नमूद केले आहे. कमी जागा असलेल्या घरांसाठी किंवा पावसाळ्यात वारंवार कपडे वाळत घालण्याची अडचण असणाऱ्यांसाठी हा जुगाड उपयुक्त ठरू शकतो, असे अनेकांचे मत आहे.

येथे पाहा व्हिडीओ

पावसाळ्यात कपडे वाळवण्याची समस्या जवळपास प्रत्येक घरात असते. अशा वेळी कोणताही अतिरिक्त खर्च न करता, घरात सहज उपलब्ध असलेल्या वस्तूंचा उपयोग करून तयार होणारे असे छोटे छोटे जुगाड दैनंदिन आयुष्य अधिक सोपे करू शकतात. त्यामुळे तुम्हालाही पावसाळ्यात ओल्या कपड्यांचा त्रास होत असेल, तर हा सोपा उपाय एकदा करून पाहण्यास हरकत नाही.