Malaria Symptoms in Kids : पावसाळा हा उन्हाळ्यापासून दिलासा देणारा असला तरी या दिवसांत आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. पावसाळ्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठते. या साचलेल्या पाण्यामुळे डासांपासून होणाऱ्या आजारांचा धोका खूप वाढतो. त्याच कारणामुळे या दिवसांत डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होते.

मलेरियाचा आजार तसा कोणालाही होऊ शकतो; पण लहान मुलांमध्ये याचा धोका सर्वाधिक प्रमाणात पाहायला मिळतो. मुले खेळताना बाहेर जास्त वेळ घालवतात, त्यांची रोगप्रतिकार शक्तीही पूर्णपणे विकसित झालेली नसते आणि अनेकदा ते आपली लक्षणे व्यवस्थित सांगू शकत नाहीत. याच कारणामुळे मुलांमधील मलेरियाचे निदान उशिरा होते आणि हा आजार वेगाने गंभीर रूप धारण करू शकतो. मुलांव्यतिरिक्त गरोदर महिलांसाठीही हा आजार जीवघेणा मानला जातो.

आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, चांगली गोष्ट म्हणजे मलेरिया हा पूर्णपणे रोखता येणारा आजार आहे. जर पालकांनी याची सुरुवातीची लक्षणे ओळखली आणि डासांपासून बचावाचे उपाय केले, तर मुलांमधील या आजाराचा धोका बऱ्याच अंशी कमी करता येऊ शकतो.

लहान मुलांना मलेरियाचा धोका का जास्त असतो?

अभ्यासातून असे दिसून आले आहे की, पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये प्रौढांच्या तुलनेत मलेरियाचा धोका जास्त असतो. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची विकसित होत असलेली इम्युनिटी (रोगप्रतिकार शक्ती), जी या संसर्गाशी प्रभावीपणे लढण्यास अजून पूर्णपणे सक्षम नसते.

जर मूल पहिल्यांदाच मलेरियाच्या परजीवीच्या (Parasite) संपर्कात आले, तर आजार झपाट्याने गंभीर होऊ शकतो. कुपोषित मुले किंवा ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत आहे, त्यांच्यासाठी हा धोका आणखी वाढतो. तुमच्या घराभोवती दूषित पाणी साठत असेल आणि स्वच्छतेचा अभाव असेल, तर अशी परिस्थिती तुमच्यासाठीही या आजाराचा धोका वाढवणारी ठरू शकते.

मुलांमधील मलेरिया कसा ओळखावा?

१) डॉक्टरांच्या मते, मलेरियाची सुरुवात सामान्य व्हायरल फिवरसारख्या (ताप) लक्षणांनी होते.

२) त्याशिवाय मुलाला तीव्र ताप येणे, थंडी वाजून अंग कापणे, खूप घाम येणे, डोकेदुखी व अशक्तपणा यांसारखे त्रास होऊ शकतात.

३) लहान मुलांमध्ये चिडचिड होणे, सतत रडणे, दूध न पिणे किंवा सुस्ती येणे

४) जर तुम्ही अशा भागात राहत असाल जिथे मलेरियाचा धोका जास्त आहे, तर या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.

काय असू शकतात धोके?

१) जर मलेरियावर वेळेवर उपचार मिळाले नाहीत, तर आजार गंभीर रूप घेऊ शकतो.

२) मलेरियामुळे मुलाला फिट्स (दौरे) येणे, बेशुद्ध पडणे, श्वास घेण्यास त्रास होणे, मूत्रपिंडे आणि यकृतावर (लिव्हर) परिणाम होऊ शकतो.

३) गंभीर संसर्गामध्ये शरीरातील अनेक अवयव निकामी होऊ शकतात. लहान मुलांमध्ये ही परिस्थिती वेगाने बिघडू शकते.

४) बहुतेक प्रकरणांमध्ये वेळेवर उपचार सुरू झाल्यास मूल पूर्णपणे बरे होते. मात्र, औषधांचा पूर्ण कोर्स करणे अत्यंत आवश्यक आहे.

मुलांना मलेरियापासून कसे वाचवाल?

१) मलेरियापासून बचावासाठी डासांची उत्पत्ती रोखणे आणि डासांपासून स्वतःचे संरक्षण करणे सर्वांत महत्त्वाचे मानले जाते.

२) मुलांना रात्री मच्छरदाणीमध्ये झोपवा. पूर्ण बाह्यांचे कपडे घाला आणि डासांना पळवून लावणारे उपाय (मॉस्किटो रिपेलंट) वापरा.

३) घराभोवती पाणी साचू देऊ नका. कूलर, कुंड्या, टायर आणि पाण्याच्या टाक्यांची नियमित स्वच्छता करा.

४) खिडक्यांना जाळ्या लावा आणि घराभोवती स्वच्छता राखा.