Foods To Swaps In Monsoon : भरपूर पाऊस, थंडगार वारा पाहून काहीतरी गरम व तळलेले पदार्थ खाण्याची इच्छा आपल्याला नक्कीच होते. चहाबरोबर पकोडे किंवा वडापाव, समोसे, अशी पावसाळ्यात खाल्ल्या जाणाऱ्या खास पदार्थांची एक वेगळीच यादी असते. पण, वजन वाढेल या भीतीने हे पदार्थ अजिबात खाऊ नयेत किंवा त्यांना पूर्णपणे टाळणे नेहमीच शक्य नसते.
तर याबद्दल आहारतज्ज्ञ व हेल्थ कोच डॉक्टर रिधिमा खामेसरा यांनी खाण्याच्या इच्छेला दाबण्यापेक्षा ती इच्छा कशी पूर्ण केली जाते यात बदल करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच डॉक्टरांनी सात सोपे बदल सांगितले आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही पावसाळ्यात तुमचे आवडते पदार्थ खाण्याचा आनंद घेऊ शकता आणि त्याच वेळी उष्मांकांचे प्रमाणही मर्यादित ठेवू शकता.
एअर-फ्राय पकोडे
पाऊस सुरू झाला की, सर्वांत आधी आठवण येते ती पकोड्यांची. पकोडे पूर्णपणे बंद करण्याऐवजी, ते एअर फ्रायरमध्ये बनवून बघा. डॉक्टरांच्या मते, एअर फ्रायरमध्येही बेसनचे आवरण कुरकुरीत होऊ शकते आणि डीप फ्राय करण्याच्या तुलनेत चरबीचे (फॅटचे) प्रमाण खूपच कमी राहते. चटणीबरोबर पकोडे खाताना त्या पदार्थाची परिचित चव व पोत (टेक्श्चर) टिकून राहते.
वडापावला द्या हेल्दी टच
काही छोटे बदल करून वडापावचाही पावसाळी क्रेव्हिंग्समध्ये समावेश करता येतो. तळलेल्या वड्याऐवजी बेक केलेला वडा आणि आकाराने लहान असलेला पाव तुम्ही खाऊ शकता. चटणी आणि मसाल्यांमुळेच या पदार्थाला खरी चव येते.
चहा थोडा कमीच घ्या
पावसाळ्यात संध्याकाळी चहा पिणे एक महत्त्वाचा भाग मानला जातो. त्यामुळे चहा पूर्णपणे सोडण्याची गरज नाही. पण, प्रत्येक कपबरोबर खाल्ले जाणारे पदार्थ नकळतपणे उष्मांक वाढवू शकतात. दिवसातून दोनदाच चांगल्या प्रकारे बनवलेला चहा प्या आणि त्याव्यतिरिक्त जास्त चहा पिण्याची इच्छा झाल्यास त्याबरोबर बिस्कीट खाणे टाळा. त्यामुळे दिवसभरातील साखरेचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते.
मॅगी
पावसाळ्यात वाफाळलेली ‘मॅगी’ खाणे हा सर्वांत सुखद पर्याय वाटू शकतो. पण, मॅगी घाईघाईने संपवल्यास तुम्हाला लवकरच पुन्हा भूक लागू शकते. एक सोपा उपाय म्हणजे त्यात अंडे, काही भाज्या किंवा एक चमचा पनीर घाला. या गोष्टींमुळे ‘मॅगी’चे रूपांतर एका अधिक पौष्टिक आणि परिपूर्ण आहारात होऊ शकते आणि त्यानंतर पुन्हा काहीतरी खाण्याची इच्छा होण्यापासूनही नियंत्रण ठेवता येऊ शकते.
सामोसा
पावसाळ्यात समोसे पूर्णपणे खाणे बंद करण्याची गरज नाही. त्याऐवजी घरी समोसे बनवताना ते लहान आकाराचे बनवा आणि त्याचे मैद्याचे आवरण पातळ ठेवा. कारण- समोशामध्ये फक्त बटाट्याचे सारण किती आहे हे महत्त्वाचे नसते, तर समोसा किती मोठा आहे आणि त्याभोवती मैद्याचे आवरण किती जाड आहे, याचाही आहारातील अतिरिक्त उष्मांक /घटकांवर परिणाम होतो.
मका
पावसाळ्यात भाजलेला मका खाण्याची मजा वेगळीच असते; पण मक्यावर भरपूर बटर लावणे गरजेचे नाही. त्याऐवजी लिंबू आणि मिरची लावून मका भाजला तरी तो तिखट, चविष्ट आणि छान धुरकट चवीचा लागतो. म्हणजेच जास्त बटर लावल्यामुळे मक्याची चव फार मोठ्या प्रमाणात वाढत नाही. त्यामुळे बटर कमी वापरूनही चवदार भाजलेल्या मक्याचा आनंद घेता येतो.
तळलेल्या पदार्थांमधील तेल टिपून घ्या
जर तुम्ही बाहेरून तळलेले स्नॅक्स विकत घेत असाल, तर ते खाण्यापूर्वी एक छोटीशी कृती करू शकता. तळलेल्या पदार्थांवर काही सेकंद टिश्यू पेपर ठेवून, त्यावरील अतिरिक्त तेल टिपून घ्या. रस्त्यावरील स्टॉल्सवरून आणलेल्या तळलेल्या पदार्थांसाठी ही पद्धत उपयुक्त ठरू शकते. कारण- तिथे दिवसभर एकाच तेलाचा वारंवार वापर केला जाण्याची शक्यता जास्त असते.
आवडत्या पदार्थांचे सेवन करणे सोडू नका
तर डॉक्टरांच्या टिप्समुळे तुम्हाला समजले असेल की, पावसाळ्यात आवडते पदार्थ पूर्णपणे खाणे बंद करणे हा वजन कमी करण्याचा उपाय होऊ शकत नाही. चहा, भजी किंवा इतर आवडते पदार्थ तुम्ही खाऊ शकता; पण ते किती प्रमाणात खायचे, कसे बनवायचे आणि त्यासोबत काय खायचे यामध्ये थोडे बदल करणे गरजेचे आहे. इतर लोक गरम चहा आणि भजी खात असताना तुम्ही फक्त सॅलड खावे, असे नाही. तुमचे आवडते पदार्थ खा; पण ते थोडे आरोग्यदायी पद्धतीने खाण्याचा प्रयत्न करा.
