Monsoon Hygiene Tips : पावसाळा उष्णतेपासून दिलासा देत असला तरी या वातावरणात आजारांचे प्रमाण वाढते. या दिवसांत वातावरणातील आर्द्रता (ह्युमिडिटी) जिवाणू, विषाणू आणि बुरशीच्या वाढीसाठी अत्यंत पोषक ठरते. तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात आर्द्रतेचे प्रमाण ७० ते ९० टक्क्यांपर्यंत पोहोचते, ज्यामुळे सूक्ष्मजीवांची वाढ वेगाने होते. याच कारणामुळे पावसाळ्यात अन्नातून होणारी विषबाधा (फूड पॉयझनिंग), त्वचेचे संसर्ग, व्हायरल फीवर आणि ॲलर्जीच्या समस्यांमध्ये मोठी वाढ दिसून येते. (home cleaning in rainy season)

विशेष म्हणजे, संसर्गाचा धोका केवळ बाहेरील चिखल किंवा दूषित पाण्यामुळेच असतो असे नाही, तर घरातील दैनंदिन वापरातील काही वस्तू देखील यास कारणीभूत ठरू शकतात; ज्या आपण बहुदा स्वच्छ करायला विसरतो. या वस्तूंना ‘हाय-टच सरफेसेस’ (High-touch surfaces) म्हटले जाते, कारण दिवसभरात अनेक व्यक्तींचा यांना सतत स्पर्श होतो. जर या वस्तू नियमितपणे निर्जंतुक केल्या नाहीत, तर त्या संपूर्ण कुटुंबात आजार पसरवण्याचे माध्यम बनू शकतात.

पावसाळ्यात जंतूंची वाढ अधिक वेगाने का होते?

सूक्ष्मजीवशास्त्रानुसार (Microbiology), जिवाणू आणि बुरशी यांच्या वाढीसाठी तीन गोष्टी आवश्यक असतात: ओलावा, उबदार तापमान आणि अन्नाचे बारीक कण किंवा सेंद्रिय कचरा. पावसाळ्यात या तिन्ही गोष्टी सहजरीत्या उपलब्ध होतात. विशेषतः स्वयंपाकघर आणि स्नानगृह (बाथरूम) या ठिकाणी जिवाणूंच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण असते.

तज्ज्ञांनुसार, ओले स्पंज, सुती कापड आणि ओलसर पृष्ठभागांवर जिवाणू अत्यंत वेगाने वाढतात. तसेच, अशा वातावरणात काही दिवसांतच बुरशी साचू लागते. म्हणूनच, संसर्ग टाळण्यासाठी पावसाळ्यात घरातील वस्तूंची नियमित स्वच्छता करणे आणि त्या पूर्णपणे कोरड्या ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

१. स्वयंपाकघरातील स्पंज (Kitchen Sponge)

स्पंजच्या छिद्रांमध्ये अन्नाचे कण आणि ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो. यामुळे ‘ई. कोलाय’ (E. coli) आणि ‘साल्मोनेला’सारख्या धोकादायक जिवाणूंना आणि बुरशीला वाढण्यासाठी जागा मिळते.

स्वच्छ करण्याची पद्धत:

प्रत्येक वापरानंतर स्पंज पूर्णपणे पिळून कोरडा करा.

आठवड्यातून एकदा स्पंज उकळत्या पाण्यात किमान ५ मिनिटे ठेवा.

स्पंजला दुर्गंधी येऊ लागल्यास तो ताबडतोब बदला.

दर ७ ते १० दिवसांनी नवीन स्पंज वापरणे आरोग्यासाठी हिताचे ठरते.

२. मोबाईल फोन आणि फोन कव्हर (Mobile Phone & Cover)

दिवसभरात मोबाईल फोन आपले हात, खिसे, बॅग, जेवणाचे टेबल आणि अशा अनेक पृष्ठभागांच्या संपर्कात येतो. पावसाळ्यात ओल्या किंवा दमट हातांनी फोन वापरल्यास तो दूषित होण्याची शक्यता अधिक असते.

स्वच्छ करण्याची पद्धत:

फोन स्वच्छ करण्यासाठी ७०% आयसोप्रोपिल अल्कोहोल (Isopropyl Alcohol) वाइप्सचा वापर करा.

फोनवर थेट कोणतेही द्रव किंवा स्प्रे फवारू नका.

सिलिकॉनचे फोन कव्हर आठवड्यातून दोनदा साबणाच्या पाण्याने स्वच्छ धुवून वाळवा.

३. डोर नॉब, स्विचबोर्ड आणि रिमोट (Door Knobs, Switchboards & Remotes)

घरातील प्रत्येक सदस्य दिवसभरात या वस्तूंना अनेकदा स्पर्श करतो. घरात एखाद्या व्यक्तीला सर्दी किंवा व्हायरल संसर्ग झाला असल्यास जंतू या पृष्ठभागांवर सहज पसरतात.

स्वच्छतेच्या सोप्या टिप्स:

मायक्रोफायबर कापडावर थोडे डिस्इन्फेक्टंट (जंतुनाशक) लावून हे स्वच्छ करा.

इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर थेट स्प्रे करणे टाळा.

घरात कोणी आजारी असल्यास या वस्तू दिवसातून किमान दोनदा स्वच्छ करा.

४. टूथब्रश होल्डर आणि सिंक (Toothbrush Holder & Bathroom Sink)

बाथरुममधीस सततच्या दमट वातावरणामुळे बुरशी आणि जिवाणूंची वाढ वेगाने होते.

काय काळजी घ्यावी?

टूथब्रश होल्डर आठवड्यातून किमान दोनदा धुवून स्वच्छ करा.

सिंक रोज धुवा.

बाथरूममध्ये हवा खेळती राहण्यासाठी एक्झॉस्ट फॅनचा वापर करा किंवा व्हेंटिलेशनची योग्य व्यवस्था ठेवा.

५. पाण्याची बाटली आणि झाकणं (Water Bottle & Lid)

फक्त बाटलीत पाणी बदलणे पुरेसे नसते. बाटलीच्या झाकणावर आणि स्ट्रॉच्या भागात एक अदृश्य चिकट थर (बायोफिल्म) तयार होतो, जिथे जंतू मोठ्या प्रमाणात साचतात.

स्वच्छतेच्या टिप्स:

रोज बॉटल ब्रशचा वापर करून बाटली आतून आणि बाहेरून स्वच्छ करा.

आठवड्यातून एकदा कोमट पाणी आणि व्हिनेगर/ साबणाने बाटलीची डिप स्वच्छता करा.