Monsoon Skin Care Tips : पावसाळ्यात त्वचेसंबंधित अनेक समस्या वाढू लागतात. हवामानातील दमटपणा, ओलावा आणि घामामुळे त्वचा खूप वेळ ओलसर राहते. यामुळे काही लोकांमध्ये फंगल इन्फेक्शन आणि त्वचेच्या इतर आजारांचा धोका वाढतो. विशेषतः पाय, काख आणि शरीराचे असे भाग जिथे ओलावा सहज टिकून राहतो, तिथे या समस्या जास्त जाणवतात.

अनेकदा आपल्या रोजच्या काही सवयींमुळे ही समस्या अधिक गंभीर बनते. चला तर मग जाणून घेऊया, पावसाळ्यात कोणत्या चुकांमुळे स्किन इन्फेक्शन होऊ शकते आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. (Monsoon Cause of Skin Infection)

१. ओले कपडे जास्त वेळ घालून ठेवणे

पावसाळ्यात भिजल्यानंतर अनेक जण कपडे बदलण्यात आळस करतात. खूप वेळ ओले कपडे घातल्याने त्वचा सतत ओलाव्याच्या संपर्कात राहते. विशेषतः कंबर, काख आणि जांघांच्या भागात ओलावा आणि घाम साचल्यामुळे जळजळ, खाज आणि पुरळ (Rashes) येऊ शकतात. म्हणूनच, पावसाळ्यात भिजल्यानंतर लवकरात लवकर कपडे बदला. शरीर पूर्णपणे सुकल्यानंतरच स्वच्छ आणि कोरडे कपडे परिधान करा.

२. ओले शूज आणि सॉक्स वापरणे

पावसाळ्यात पायांच्या त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. पावसाच्या पाण्याने ओले झालेले शूज आणि सॉक्स दीर्घकाळ घातल्याने पायांभोवती ओलावा टिकून राहतो. यामुळे फंगल इन्फेक्शनचा धोका वाढतो तसेच पायांना खाज सुटणे, त्वचा लाल होणे किंवा त्वचा निघणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे ओले सॉक्स लगेच बदला आणि शूज व्यवस्थित वाळवून मगच वापरा. रोज एकाच ओल्या शूजचा वापर करणे टाळा.

३. शरीर व्यवस्थित न सुकवणे

आंघोळ केल्यानंतर किंवा पावसात भिजल्यानंतर फक्त कपडे बदलणे पुरेसे नाही. शरीराचे जे भाग सहज कोरडे होत नाहीत किंवा जिथे ओलावा साचतो, ते भाग नीट सुकवणे अत्यंत गरजेचे आहे. काख, पायांच्या बोटांमधील जागा, कंबर आणि त्वचेच्या घड्या (Folds) नेहमी कोरड्या ठेवा. तिथे सतत ओलावा राहिल्यास त्वचेला जळजळ आणि फंगल इन्फेक्शन होऊ शकते. त्यामुळे आंघोळीनंतर स्वच्छ टॉवेलने शरीर नीट पुसून घ्या.

४. टॉवेल शेअर (एकच वापरणे) करणे

घरात कुटुंबातील सदस्यांमध्ये एकच टॉवेल वापरणे ही सामान्य बाब असली, तरी त्वचेची समस्या असताना असे करणे टाळले पाहिजे. दुसऱ्या कोणाचा तरी वापरलेला टॉवेल ओलावा आणि त्वचेच्या संपर्कामुळे संसर्ग पसरवण्याचे माध्यम बनू शकतो. प्रत्येक व्यक्तीने स्वतःचा वेगळा टॉवेल वापरणे उत्तम. वापरल्यानंतर टॉवेल उन्हात चांगला सुकवा आणि नियमित धुवा. विशेषतः पावसाळ्यात ओला टॉवेल जास्त वेळ वापरणे टाळा.

५. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय क्रीम किंवा औषधे लावणे

पावसाळ्यात खाज, लाल चकत्ते किंवा अंगावर दाणे आल्यास अनेक जण स्वतःच मेडिकलमधून क्रीम आणून लावतात. असे करणे दरवेळी योग्य नसते. प्रत्येक खाज किंवा पुरळ फंगल इन्फेक्शनमुळेच असते असे नाही. चुकीची क्रीम लावल्याने लक्षणे काही काळासाठी दबू शकतात, परंतु मूळ आजार तसाच राहतो. विशेषतः ‘स्टिरॉइड’युक्त क्रीम्स डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरणे हानिकारक ठरू शकते. त्वचेवर खाज, लालसरपणा, सूज, वेदना किंवा चकत्ते सतत राहत असतील किंवा वेगाने पसरत असतील, तर स्वतः औषध घेण्याऐवजी त्वचारोग तज्ज्ञांचा (Dermatologist) सल्ला घ्या.