Monsoon Clothing Care Tips : पावसाळा जितका आल्हाददायक असतो, तितक्याच समस्याही सोबत घेऊन येतो. या दिवसांत आजारांबरोबर कपडे धुणे आणि ते सुकवणे ही एक मोठी डोकेदुखी ठरते. हवेतील आर्द्रतेमुळे घरातील अनेक वस्तू खराब होऊ लागतात. अशा वेळी ओले कपडे व्यवस्थित सुकवणे अत्यंत गरजेचे असते. अनेकदा सतत पडणारा पाऊस आणि उन्हाचा अभाव यामुळे २-२ दिवस कपडे पूर्णपणे सुकत नाहीत. परिणामी, कपड्यांना कुबट वास येऊ लागतो आणि त्यामध्ये ओलसरपणा राहतो, ज्यामुळे फंगल इन्फेक्शन आणि त्वचेच्या ॲलर्जीचा धोका वाढू शकतो. जर तुमच्याही घरी पावसाळ्यात कपडे लवकर सुकत नसतील, तर काही सोपे घरगुती उपाय करून तुम्ही ओले कपडे झटपट सुकवू शकता.

पावसाळ्यात कपडे सुकवण्यासाठी सोप्या टिप्स (Tips To Dry Clothes During Monsoon)

  • अतिरिक्त पाणी व्यवस्थित पिळून घ्या: कपडे धुतल्यानंतर सर्वात आधी त्यांमधील अतिरिक्त पाणी पूर्णपणे काढून टाका. जर तुमच्याकडे वॉशिंग मशीन असेल, तर ‘स्पिन मोड’ (Dryer) नक्की वापरा.
  • सुक्या टॉवेलची मदत घ्या: जर एखादा कपडा जास्त ओला असेल, तर तो एका सुक्या आणि जाड टॉवेलमध्ये गुंडाळा. त्यानंतर हलक्या हाताने तो दाबा. टॉवेल कपड्यातील अतिरिक्त पाणी शोषून घेईल, ज्यामुळे कपडे हलके आणि कमी ओले होतील.
  • पंख्याखाली कपडे सुकवा: ऊन नसेल तेव्हा कपडे अशा खोलीत वाळत घाला जेथे हवा खेळती राहील. खोलीतील पंखा चालू ठेवा. हवेच्या सततच्या प्रवाहामुळे कपड्यांमधील ओलसरपणा वेगाने कमी होतो.
  • कपड्यांमध्ये अंतर ठेवा: अनेक जण कपडे वाळत घालताना ते अगदी जवळजवळ किंवा एकमेकांना चिकटवून टांगतात. असे केल्याने कपड्यांना पुरेशी हवा मिळत नाही आणि ते उशिरा सुकतात. म्हणून दोन कपड्यांमध्ये थोडे अंतर ठेवा, जेणेकरून चहूबाजूंनी हवा लागेल.
  • हँगरचा वापर करा: शर्ट, टी-शर्ट, कुर्ता आणि ड्रेस यांसारखे कपडे दोरीवर दुमडून टाकण्याऐवजी हँगरला अडकवून सुकवा. यामुळे कपड्यांचा जास्तीत जास्त भाग हवेच्या संपर्कात येतो आणि ते लवकर सुकतात.
  • इस्त्री (Ironing) करण्यापूर्वी कपडे थोडे सुकू द्या: जर कपड्यांमध्ये अगदी हलका ओलसरपणा शिल्लक असेल, तर तुम्ही कमी तापमानावर त्यांना इस्त्री करू शकता. यामुळे कपड्यांमधील उरलेली दमटपणा निघून जाईल.

(टीप: अगदी ओले कपडे थेट इस्त्री करू नका)