scorecardresearch

देशातील ८० पेक्षा जास्त जिल्ह्य़ांमध्ये रक्तपेढीच नाही

रक्तपेढय़ांची कमतरता नसून देशभरात एकूण २ हजार ७०८ पतपेढय़ा आहेत

(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)

केंद्र सरकारची संसदेत माहिती
नव्यानेच तयार झालेल्या जिल्ह्य़ांसोबतच देशातील ८० पेक्षा जास्त जिल्ह्य़ांमध्ये रक्तपेढी नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.
रक्तपेढय़ांची कमतरता नसून देशभरात एकूण २ हजार ७०८ पतपेढय़ा आहेत, मात्र ८१ जिल्ह्य़ांमध्ये अजूनही रक्तपेढी नसल्याचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितले. रक्तपेढी नसलेल्या ८१ जिल्हे आणि केंद्र-अखत्यारीत आरोग्य केंद्र असलेल्या राज्यांमध्ये अंदमान-निकोबारची बेटे, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, झारखंड, मध्यप्रदेश आणि मणिपूरचादेखील समावेश आहे. यापैकी बहुतेक जिल्ह्य़ांची रचना नव्याने आणि नुकतीच झाल्याचे नाईक यांनी सांगितले.
राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने (एनबीटीसी)ने २२ डिसेंबर २०१५ पूर्वीच एक नोटीस प्रसिद्ध करताना रक्तपेढीमध्ये उपलब्ध असलेल्या रक्तसाठय़ाबाबत राष्ट्रीय आरोग्याच्या पोर्टलवर माहिती टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्यामुळे रुग्णांसाठी आवश्यक अतिरिक्त रक्तसाठा आणि रक्तसाठय़ातील पारदर्शकता आणि सार्वजनिक भागातील उपलब्ध रक्तातील घटकांची माहिती मिळण्यासाठी मदत होणार आहे.
‘९ कोटी मुलांना जंतनाशक औषधांचे वाटप’
नवी दिल्ली : देशातील २४ कोटी मुलांना जंतसंसर्ग होण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता केंद्र सरकारने गेल्या वर्षी सुरू केलेल्या महत्त्वपूर्ण मोहिमेअंतर्गत ९ कोटी मुलांना जंतनाशक औषधांचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी लोकसभेत दिली.
जागतिक आरोग्य संस्था (डब्ल्यूएचओ)च्या २०१२ च्या एका अहवालानुसार भारतातील १ ते १४ वयोगटातील साधारण २४१ दशलक्ष (६८ टक्के)मुलांना जंतसंसर्गाचा धोका असल्याची माहिती नड्डा यांनी दिली. त्यानुसार केंद्र सरकारने गेल्या वर्षभरापासूनच ११ राज्ये आणि आरोग्य केंद्रांत राष्ट्रीय कृमीविरोधी दिनाचे आयोजन करताना १ ते १९ वयोगटातील १०.३१ कोटी मुलांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आखले आहे. या मोहिमेअंतर्गत २०१५ पर्यंत ८.९८ कोटी (८५ टक्के) मुलांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप राष्ट्रीय जंतनाशक दिनाला करण्यात आले, असे नड्डा यांनी सांगितले.
(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-02-2016 at 01:28 IST

संबंधित बातम्या