Moringa Side Effects :आयुर्वेदिक वनस्पतींचं सेवन आजच्या काळात प्रचंड लोकप्रिय झालं आहे. लोक रासायनिक औषधांच्या दुष्परिणामापासून दूर राहण्यासाठी आणि शरीर नैसर्गिकरीत्या तंदुरुस्त ठेवण्यासाठी पुन्हा एकदा आयुर्वेदाकडे वळत आहेत. त्यातच शेवग्याच्या पानांना आयुर्वेदामध्ये विशेष महत्त्व आहे. या पानांना अनेक जण ‘चमत्कारी पानं’ म्हणतात. कारण त्यांच्यात असलेले पोषक घटक शरीराच्या प्रत्येक अवयवाला बळकटी देतात. मात्र हीच पानं काही आजारांमध्ये विषासारखी ठरतात, असं तज्ज्ञ सांगतात.
शेवगा म्हणजे काय?
शेवगा(Moringa Oleifera) हा भारतात सहज सापडणारा वनस्पती प्रकार आहे. या पानांमध्ये व्हिटॅमिन A, C, कॅल्शियम, पोटॅशियम, प्रोटीन, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते, पचन सुधारतं आणि त्वचेला नैसर्गिक उजळपणा येतो.
सिग्नस लक्ष्मी हॉस्पिटलचे जनरल फिजिशियन डॉ. संजय कुमार सांगतात, “शेवग्याच्या पानांमध्ये शरीरासाठी आवश्यक असलेले जवळजवळ सर्व पोषक घटक असतात. ही पानं रोजच्या आहारात घेतल्यास पचन सुधारतंय, स्मरणशक्ती चांगली राहते आणि डोळ्यांची दृष्टीही वाढते.”
पण सगळ्यांनाच याचा फायदा होतो असं नाही. काही विशिष्ट आजारांमध्ये या पानांचा परिणाम शरीरावर उलट होऊ शकतो.
यकृत संबंधित आजारात शेवगा ठरू शकतो धोकादायक
यकृत संबंधित त्रास असलेल्या लोकांनी शेवग्याच्या पानांपासून दूर राहणं आवश्यक आहे. ज्यांना फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस किंवा यकृतमध्ये सूज आहे, त्यांनी या पानांचं सेवन अजिबात करू नये.
या पानांमध्ये असलेले विषारी गुण शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतात. पण जेव्हा यकृत आधीच कमकूवत असतो, तेव्हा त्याच्यावर हा विषारी घटकांचा भार वाढतो आणि त्याचं कार्य बिघडतं. त्यामुळे उलट यकृतचं नुकसान होऊ शकतं.
हृदय विकार आणि रक्तदाब असलेल्या रुग्णांनी घ्यावी काळजी
हृदयरोगींसाठी शेवग्याची पानं धोकादायक ठरू शकतात. या पानांमधील घटक ब्लड प्रेशर नैसर्गिकरीत्या कमी करतात. हृदय विकार असलेले रुग्ण आधीच बीपी कमी करणारी औषधं घेत असतील, तर शेवग्याची पानं खाल्ल्याने त्यांचा रक्तदाब खूपच कमी येऊ शकतो.
त्यामुळे चक्कर येणं, थकवा जाणवणं आणि हृदयाचे ठोके कमी होणं असे परिणाम दिसतात. काही वेळा ही स्थिती गंभीर स्वरूप घेऊ शकते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला न घेता शेवग्याची पानं खाणं टाळावं.
गर्भवती महिलांसाठी शेवग्याची पानं म्हणजे विष
गर्भवती महिलांनी शेवग्याच्या पानांचं सेवन करणं टाळावं. तज्ज्ञ सांगतात की, या पानांमधील काही घटक गर्भाशयावर परिणाम करतात. काही महिलांमध्ये त्यामुळे अपचन, गॅस, जुलाब किंवा मळमळ अशी लक्षणं दिसतात.
गर्भवतींच्या शरीरात होणाऱ्या नैसर्गिक बदलांमुळे या पानांचा परिणाम जास्त तीव्र होऊ शकतो. त्यामुळे गर्भावस्थेदरम्यान शेवग्याची पाने खाणं पूर्णपणे बंद ठेवावं.
मधुमेही रुग्णांसाठीही धोक्याची घंटा
मधुमेही रुग्णांसाठी शेवग्याचे पानं घातक ठरू शकतात. कारण ही पानं रक्तातील साखरेची पातळी अचानक कमी करतात. शेवग्यातील संयुगे इन्सुलिन सेंसिटिव्हिटी वाढवतात आणि जर रुग्ण रक्तातील सारख नियंत्रित करणारी औषधं घेत असेल, तर या पानांमुळे त्याचं रक्तातील साखरेची धोकादायक पातळीपर्यंत खाली येऊ शकतं.
यामुळे Hypoglycemia (रक्तातील साखरेची पातळी अत्यंत कमी होणं) होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे मधूमेही रुग्णांनी या पानांचं सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे.
शेवगा कधी आणि किती प्रमाणात खावं?
आरोग्यदृष्ट्या निरोगी लोकांसाठी शेवग्याच्या पानांचा वापर फायदेशीर असतो, पण त्याचं मर्यादित प्रमाणात सेवन करणं महत्त्वाचं आहे. पानं उकळवून भाजी स्वरूपात किंवा काढा बनवून आठवड्यातून दोन ते तीन वेळा घेतल्यास शरीराला आवश्यक पोषकद्रव्यं मिळतात. मात्र कोणताही आजार असेल किंवा औषधं घेत असाल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही पानं खाऊ नयेत.
शेवगा म्हणजे निसर्गानं दिलेलं वरदानच आहे. यात अनेक औषधी गुण असून हे शरीराला बळकटी देतं, रोगांपासून संरक्षण करतं. पण प्रत्येक नैसर्गिक पदार्थाचा परिणाम सगळ्यांवर सारखाच होतो असं नाही. म्हणूनच कोणत्याही औषधी वनस्पतीप्रमाणे शेवग्याचं सेवन योग्य प्रमाणात आणि योग्य परिस्थितीत करायला हवं. नाहीतर हेच अमृत विषासारखं ठरू शकतं.
