Moringa Health Benefits: आयुर्वेदापूसन ते आधुनिक पोषण शास्त्रापर्यंत मोरिंगाला पोषक तत्वांचा खजिना मानले जाते. व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेली मोरिंगाची पाने, शेंगा आणि बिया केवळ रोगप्रतिकारशक्तीच मजबूत करत नाहीत, तर रक्तातील साखर आणि पचनक्रिया नियंत्रित ठेवण्यासही मदत करतात. मोरिंगाचे झाड हे एक असे झाड आहे, ज्याचा प्रत्येक भाग उपयुक्त आहे.

आयुर्वेदिक आणि युनानी औषध शास्त्रातील तज्ज्ञ डॉ. सलीम झैदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरिंगाची पाने खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि शरीराचे आजारांपासून संरक्षण होते. मोरिंगाची लोकप्रियता त्याच्या पोषक तत्वांनी समृद्ध पानांमुळे आहे. त्यामध्ये नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन ए, सी आणि ई तसंच लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फोलेट आढळतात. त्यात फायबर, वनस्पती आधारित प्रोटीन आणि क्वेर्सेटिन आणि क्लोरोजेनिक अॅसिडसारखे अँटीऑक्सिडंट्स देखील असतात. हे निरोगी पचनास चालना देतात.

शेवगा ही वनस्पती तिच्या विविध भागांच्या वेगवेगळ्या उपयोगांमुळे खास आहे. तिच्या पानांवर केलेल्या अनेक अभ्यासांमधून असे दिसून आले आहे की, त्यातील पोषक तत्वे महिलांमधील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करू शकतात. शास्त्रज्ञांच्या मते, शेवग्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, खनिजे आणि विविध बायोअॅक्टिव्ह संयुगे असतात, त्यामुळे आरोग्याला असंख्य फायदे मिळतात. तर मग जाणून घेऊया शेवग्याच्या म्हणजेच मोरिंगाच्या सेवनाचे आरोग्यदायी फायदे…

हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यात मदत करते

आरोग्यविषयक संशोधन अहवालानुसार, खराब (LDL) कोलेस्ट्रॉल वाढल्याने धमन्यांमध्ये प्लाक जमा होतो, त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, मोरिंगाच्या पानांमधील घटक शरीरातील चरबीचा साठा कमी करण्यास आणि एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी खाली आणण्यास मदत करू शकतात. त्यातील अँटिऑक्सिडंट गुणधर्म रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यासही मदत करतात असे मानले जाते.

रक्तातील साखर नियंत्रित करण्यास उपयुक्त

ब्लड शुगरची पातळी दीर्घकाळ वाढलेली राहिल्यास डायबिटीजसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. मोरिंगाच्या पानांमधील क्लोरोजेनिक अॅसिड जेवणानंतर साखरेची पातळी झपाट्याने वाढण्यास प्रतिबंध करते. काही अभ्यासांनुसार, जेवणात मोरिंगा पावडरचा समावेश केल्यास जेवणानंतरची ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास आणि इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास मदत होते.

अँटीऑक्सिडंट्सचा उत्कृष्ट स्त्रोत

आपल्या शरीरातील पेशींना दररोज ऑक्सिडेटिव्ह ताणाचा सामना करावा लागतो. प्रदूषण, तणाव आणि सामान्य चयापचय क्रियेदरम्यान तयार होणारे फ्री रॅडिकल्स पेशींना नुकसान पोहोचवू शकतात. मोरिंगाच्या पानांमध्ये क्वेर्सेटिन, क्लोरोजेनिक अॅसिड, कॅरोटीनॉइड्स आणि व्हिटॅमिन सी सारखे शक्तिशाली अणटिऑक्सिडंट्स असतात. ते फ्री रॅडिकल्सना निष्प्रभ करण्यास मदत करतात.

हिमोग्लोबिन वाढण्यास मदत करते

मोरिंगाच्या पानांमध्ये लोह आणि फोलेट भरपूर प्रमाणात असते, ते लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी शरीरातील लोहाचे शोषण सुधारण्यासही मदत करते. मोरिंगाच्या सेवनाने हिमोग्लोबिनच्या पातळीत सुधारणा दिसून येते.

मोरिंगाचे सेवन कसे करावे?

  • भारतात शेवग्याच्या लांब शेंगांचा वापर सांबार, आमटी आणि अनेक पारंपरिक पदार्थांमध्ये केला जातो.
  • शेवगा तुम्ही भाजी बनवून किंवा डाळ आणि सूपमध्ये मिसळून खाऊ शकता.
  • वाळलेल्या शेवग्याच्या पानांची पावडर स्मूदी, दही किंवा ताकामध्ये मिसळून घेता येते.