Banana Diet for Weight Loss: वाढतं वजन आणि लठ्ठपणा ही सध्या जगभरातील मोठी आरोग्य समस्या मानली जाते. वजन कमी करण्यासाठी अनेक जण व्यायाम, आहारातील बदल, उपवास अशा वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. काही जण त्यासाठी महागडे आहारतज्ज्ञ, व्यायामशाळा किंवा विविध वजन कमी करण्याच्या पद्धतींचाही आधार घेतात. मात्र, प्रत्येक पद्धत प्रत्येक व्यक्तीसाठी परिणामकारक ठरेलच, असं नाही.

याचदरम्यान जपानमधील एक अनोखी आहारपद्धत चर्चेत आली आहे. या पद्धतीमध्ये वजन कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात केळी खाण्यावर विशेष भर दिला जातो. या आहार पद्धतीला ‘मॉर्निंग बनाना डाएट’, असं म्हटलं जातं. नावाप्रमाणेच या आहारात सकाळच्या वेळेतील केळी महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, वजन कमी करण्यासाठी ही पद्धत खरोखरच प्रभावी आहे का, याबाबत अद्याप ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही.

सकाळच्या नाश्त्यात ३-४ केळी!

मॉर्निंग बनाना डाएटमध्ये सकाळी उठल्यानंतर नाश्त्यामध्ये साधारण तीन ते चार केळी खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यासोबत भरपूर पाणी पिण्यावरही भर दिला जातो. त्यानंतर दुपारचं आणि रात्रीचं जेवण तुलनेनं हलकं ठेवण्याची पद्धत आहे.

या आहारपद्धतीचा उद्देश केवळ केळी खाण्यापुरता मर्यादित नाही. दिवसभरात किती आणि काय खाल्लं जातं, जेवणाची वेळ, झोपेची सवय आणि एकूण आहाराचं प्रमाण यालाही महत्त्व दिलं जातं.

वेबएमडीच्या माहितीनुसार, या आहारपद्धतीत फळांचा समावेश केला जातो. रात्रीचं जेवण शक्यतो रात्री ८ वाजण्यापूर्वी पूर्ण करण्यावर भर दिला जातो. सकाळी केळी खाल्ल्यानंतर दुपारचं आणि रात्रीचं जेवण साधं ठेवण्याची पद्धत आहे.

पोट ८० टक्के भरलं की थांबायचं!

या आहारपद्धतीतील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पोट पूर्ण भरून जेवण्याऐवजी साधारण ८० टक्के पोट भरल्याची जाणीव झाली की खाणं थांबवण्याचा सल्ला दिला जातो.

रात्रीच्या जेवणानंतर गोड पदार्थ किंवा मिठाई खाणं टाळलं जातं. दिवसभर पुरेसं पाणी पिण्यालाही महत्त्व दिलं जातं. त्याशिवाय दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मद्य आणि कॅफीनयुक्त पदार्थ टाळण्याची पद्धत या डाएटमध्ये सांगितली जाते.

या सगळ्यामुळे दिवसातील एकूण उष्मांकाचं सेवन कमी होऊ शकतं. वजन कमी होण्यामागे ही बाब महत्त्वाची ठरू शकते. मात्र, फक्त केळी खाल्ल्यामुळे वजन कमी होतं, असा निष्कर्ष काढता येत नाही.

मग हे डाएट खरंच वजन कमी करते का?

हा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे. ‘मॉर्निंग बनाना डाएट’ ही पद्धत लोकप्रिय होत असली तरी या विशिष्ट आहारपद्धतीमुळे वजन कमी होतं, याचा ठोस वैज्ञानिक पुरावा अद्याप उपलब्ध नाही.

वजन कमी होण्यासाठी एकूण आहार, उष्मांकांचं प्रमाण, शारीरिक हालचाल, झोप व जीवनशैली अशा अनेक घटकांचा विचार करावा लागतो. त्यामुळे एखादं विशिष्ट डाएट काही लोकांना उपयोगी वाटलं म्हणून ती पद्धत सर्वांसाठीच परिणामकारक ठरेल, असं नाही.

प्रथिनांची कमतरता होण्याची शक्यता

‘मॉर्निंग बनाना डाएट’मध्ये सकाळच्या नाश्त्यात प्रामुख्याने केळी खाण्यावर भर असल्यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. फक्त केळी खाल्ल्यानं शरीराला आवश्यक तेवढी प्रथिने आणि इतर पोषक घटक मिळतीलच, असं नाही.

शरीराच्या योग्य कार्यासाठी प्रथिनं, जीवनसत्त्वं, खनिजं, तंतुमय पदार्थ आणि चांगल्या प्रकारचे स्निग्ध पदार्थ यांचा संतुलित आहारातून पुरवठा होणं आवश्यक आहे. त्यामुळे नाश्त्यात केवळ एका पदार्थावर अवलंबून राहण्यापेक्षा आहारात विविध पौष्टिक पदार्थांचा समावेश करणं महत्त्वाचं आहे.

मधुमेह असणाऱ्यांनी घ्यावी विशेष काळजी

केळी हे पौष्टिक फळ असलं तरी मधुमेह असलेल्या व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात केळी खाण्यापूर्वी काळजी घेणं आवश्यक आहे. आहारातील एकूण कार्बोहायड्रेटचं प्रमाण आणि रक्तातील साखरेवर होणारा परिणाम प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळा असू शकतो.

त्यामुळे वजन कमी करण्याच्या नादात दिवसातून अनेक केळी खाणं सुरू करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणं योग्य ठरेल.

झोपेलाही दिलं जातं महत्त्व

या डाएटमध्ये केवळ आहारावर भर नसून पुरेशी आणि नियमित झोप घेण्यावरही लक्ष दिलं जातं. रात्री उशिरापर्यंत जागणं टाळणं आणि शरीराला पुरेशी विश्रांती देणं वजन नियंत्रणासाठी उपयुक्त ठरू शकतं.

म्हणूनच वजन कमी करण्यासाठी फक्त एक पदार्थ किंवा एका डाएटवर अवलंबून राहण्यापेक्षा संतुलित आहार, नियमित शारीरिक हालचाल, पुरेशी झोप व योग्य जीवनशैली यांचा एकत्रित विचार करणं महत्त्वाचं आहे.

थोडक्यात, सकाळी केळी खाणं हा आहाराचा एक भाग असू शकतो. मात्र, केळी खाल्ल्यानंच वजन झपाट्यानं कमी होईल, असं समजणं योग्य नाही. विशेषतः मधुमेह किंवा इतर आरोग्यविषयक समस्या असतील, तर कोणतंही वजन कमी करण्याचं डाएट सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अधिक सुरक्षित ठरेल.