Dizziness in Morning Reason: सकाळी झोपेतून उठताच जर गरगरायला लागलं, डोळ्यांसमोर अंधार येऊ लागला किंवा काही सेकंदांसाठी शरीर हलकं वाटलं तर ते दुर्लक्षित करू नये. अनेक लोक हे थकवा, कमी झोप किंवा अशक्तपणा समजून दुर्लक्ष करतात. पण, वारंवार असं होत असेल तर ते एखाद्या आजाराचं लक्षण असू शकतं.

डॉक्टरांच्या मते, बहुतेक वेळा सकाळी उठल्यावर चक्कर येण्याचं कारण अचानक शरीराची स्थिती बदलणं असतं. आपण आडवं पडून थेट उभं राहिलो तर काही क्षणांसाठी मेंदूकडे जाणाऱ्या रक्तपुरवठ्यात घट होते. या स्थितीला ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन असं म्हणतात.

ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन म्हणजे काय?

जेव्हा आपण झोपलेलो असतो आणि नंतर अचानक उभे राहतो, तेव्हा रक्तदाब अचानक कमी होऊ शकतो. शरीराला तो लगेच नियंत्रित करता आला नाही तर गरगरल्यासारखं वाटतं. ही समस्या विशेषतः वयोवृद्ध लोकांमध्ये, कमी पाणी पिणाऱ्यांमध्ये किंवा काही औषधे घेणाऱ्या लोकांमध्ये जास्त दिसून येते.

सकाळी चक्कर येण्याची सामान्य कारणे

पाण्याची कमतरता

रात्री झोपेत असताना शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. जर दिवसभर पुरेसं पाणी प्यायला नाहीत, तर सकाळी रक्तदाब कमी होऊ शकतो आणि चक्कर येऊ शकते. दारू किंवा जास्त कॅफिन घेतल्याने ही समस्या आणखी वाढते, त्यामुळे सकाळी उठल्यावर गरगरल्यासारखं वाटू शकतं.

लो ब्लड शुगर (रक्तातील साखरेचा स्तर कमी)

सकाळी पोट रिकामं असल्यामुळे काही लोकांचा रक्तातील साखरेचा स्तर कमी होऊ शकतो. विशेषतः मधुमेह असलेल्या आणि इन्सुलिन किंवा औषधे घेणाऱ्या रुग्णांमध्ये साखर खूप कमी झाल्यास (हायपोग्लायसेमिया) चक्कर येणे, अशक्तपणा आणि चिंता जाणवू शकते.

औषधांचे दुष्परिणाम

रक्तदाब, नैराश्य, हृदयविकार किंवा झोपेच्या औषधांमुळेही सकाळी चक्कर येऊ शकते. ही औषधे रक्तदाबावर किंवा नसांच्या कार्यावर परिणाम करतात, त्यामुळे डोके फिरल्यासारखे वाटू शकते.

स्लीप अ‍ॅपनिया

रात्री झोपेत श्वास वारंवार थांबत असेल, तर शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे सकाळी उठताच चक्कर येणे किंवा डोकं जड वाटणे असे त्रास होऊ शकतात.

कानाशी संबंधित समस्या

कानाचा आतला भाग शरीराचा तोल सांभाळतो. त्या भागात सूज, संसर्ग किंवा क्रिस्टलमध्ये बिघाड झाला, तर उठताना किंवा हालचाल करताना जोरात चक्कर येऊ शकते. याशिवाय रक्ताची कमतरता (ॲनिमिया), मायग्रेन किंवा काही मेंदूशी संबंधित आजारांमुळेही वारंवार चक्कर येऊ शकते.

सकाळी चक्कर येऊ नये यासाठी सोपे उपाय

जर तुम्हाला सकाळी उठताच चक्कर येत असेल, तर बेडवरून अचानक उठू नका. आधी काही मिनिटे बसून घ्या आणि मग हळूहळू उभे राहा. दिवसभर पुरेसे पाणी प्या आणि सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी जरूर प्या.

रात्री दारू आणि जास्त कॅफिन घेणे टाळा. नाश्ता नक्की करा, त्यामुळे रक्तातील साखर स्थिर राहते. जर तुम्ही काही औषधे घेत असाल आणि चक्कर वाढत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.