Kidney Disease Warning Signs on Skin: सकाळी उठल्यावर आरशात काहीतरी वेगळं दिसतंय का? अनेकजण शरीरावर दिसणाऱ्या छोट्या बदलाकडे दुर्लक्ष करतात. पण, ही साधी वाटणारी गोष्ट शरीरातील मोठ्या बिघाडाची सुरुवात ठरू शकते, लोक याकडे किरकोळ समस्या म्हणून पाहतात. रात्री उशिरापर्यंत जागरण, अपुरी झोप किंवा चुकीची झोपण्याची पद्धत यामुळे असे होत असेल असे समजून दुर्लक्ष करतात. पण, हीच सूज जर वारंवार दिसू लागली, तर ती केवळ थकव्याची नाही, तर गंभीर आजाराची विशेषतः मूत्रपिंडाच्या (किडनीच्या) विकाराची पूर्वसूचना असू शकते.
शारदा हॉस्पिटलमधील इंटरनल मेडिसिन विभागाचे प्राध्यापक डॉ. भूमेश त्यागी यांचे म्हणणे आहे की, “बहुतेक लोक मूत्रपिंडाचे आजार म्हणजे फक्त लघवीत होणारे बदल असेच मानतात. परंतु, प्रत्यक्षात शरीराच्या इतर भागांवरही त्याचे परिणाम दिसू शकतात. विशेषतः सकाळच्या वेळी डोळ्यांच्या आसपास दिसणारी सूज ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात.”
ही सूज वैद्यकीय भाषेत पेरिऑर्बिटल पफीनेस म्हणून ओळखली जाते. मूत्रपिंडांच्या कार्यक्षमतेत बिघाड झाल्यास शरीरातील महत्त्वाचे प्रथिन अल्ब्युमिन लघवीतून बाहेर पडू लागते. हे प्रथिन रक्तवाहिन्यांमध्ये द्रव टिकवून ठेवण्याचे काम करते. जेव्हा याची कमतरता निर्माण होते, तेव्हा शरीरातील द्रव ऊतींमध्ये साचू लागतो. परिणामी चेहरा, विशेषतः डोळ्यांच्या भोवती सूज येते.
रात्री झोपताना आपण सरळ स्थितीत असतो. त्या वेळी शरीरातील द्रव सॉफ्ट टिश्यूजमध्ये, म्हणजेच मऊ ऊतींमध्ये, विशेषतः डोळ्यांभोवती साचतो, म्हणून सकाळी उठल्यावर सूज अधिक दिसते. दिवसभर चालणे-फिरणे सुरू झाल्यावर गुरुत्वाकर्षणामुळे हा द्रव खाली पायांकडे सरकतो आणि चेहऱ्यावरील सूज काहीशी कमी झाल्यासारखी वाटते.
तथापि, हीच लक्षणे केवळ मूत्रपिंडांशी संबंधित असतात असे नाही. अपुरी झोप, अॅलर्जी, शरीरातील पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) किंवा जास्त मिठाचे सेवन यामुळेही सूज वाढू शकते. पण, जर यासोबत इतर काही लक्षणेही दिसू लागली जसे की लघवीत फेस येणे, टाचांमध्ये सूज, सतत थकवा जाणवणे किंवा रक्तदाब वाढणे तर हे धोक्याचे संकेत ठरू शकतात.
विशेषतः ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आहे किंवा कुटुंबात मूत्रपिंडाच्या आजाराचा इतिहास आहे, त्यांनी अधिक सावध राहणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत वेळ न दवडता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.
शेवटी महत्त्वाचं : आरशात दिसणारं ‘ते’ चिन्ह ओळखा
दररोज सकाळी आरशात पाहताना जर डोळ्यांच्या भोवती सतत सूज, चेहरा फुगलेला दिसणे ही लक्षणे जाणवत असतील आणि ती काही दिवसांपेक्षा जास्त काळ टिकत असतील तर हे केवळ थकव्याचे नाही, तर मूत्रपिंडाच्या आजाराचे सुरुवातीचे संकेत असू शकतात, त्यामुळे, ‘सकाळी चेहरा सुजलेला दिसतोय’ ही साधी वाटणारी गोष्ट दुर्लक्ष करू नका.
वेळेत ओळख आणि उपचार केल्यास मोठा धोका टाळता येऊ शकतो.
