Checking Phone in the Morning: सकाळी उठल्यानंतर अनेक लोक गरम पाणी पितात, व्यायाम करायला जातात. या सवयी चांगल्या मानल्या जातात. पण एक सवय अशी आहे, ज्याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. ती म्हणजे सकाळची सुरुवात मोबाईल पाहून करणे. आजकाल झोपेतून उठताच सर्वात आधी मेसेज, सोशल मीडिया आणि बातम्या पाहण्याची सवय अनेकांना लागली आहे.

अनेक अहवालांनुसार, सुमारे ७० ते ८० टक्के लोक झोपेतून उठल्यानंतर १० ते १५ मिनिटांच्या आत मोबाईल हातात घेतात. ही सवय पाहायला साधी वाटत असली, तरी डॉक्टरांच्या मते ती हळूहळू शरीर आणि मेंदू दोघांवरही वाईट परिणाम करते. वेळेत ही सवय बदलली नाही, तर पुढे ती मोठी समस्या बनू शकते.

सकाळी उठताच मोबाईल वापरल्याने मेंदूवर काय परिणाम होतो?

अनेकांच्या मनात प्रश्न येतो की, सकाळी उठताच मोबाईल वापरल्याने नेमकं काय होतं? तज्ज्ञ सांगतात की, झोपेतून उठल्यानंतर आपला मेंदू पूर्णपणे जागा झालेला नसतो. तो झोप आणि जागेपणाच्या मधल्या अवस्थेत असतो. या अवस्थेला तज्ज्ञ “स्लीप इनर्शिया” असे म्हणतात. या वेळी मेंदूला हळूहळू जागं होऊन शांतपणे काम सुरू करण्याची गरज असते. पण आपण उठताच मोबाईलमध्ये मेसेज, ईमेल किंवा सोशल मीडिया पाहू लागलो, तर मेंदूवर अचानक खूप माहितीचा ताण येतो.

एखाद्या वेळी झोपेत असताना महत्त्वाचा फोन किंवा गरजेचा मेसेज आला, तर त्याचा फारसा परिणाम होत नाही. मात्र हीच गोष्ट रोजची सवय झाली, तर शरीर हळूहळू कायम हलक्या तणावात राहू लागते.

मोबाईलच्या स्क्रीनमुळे झोप आणि मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो?

ही सवय फक्त मानसिक आरोग्यावरच नाही, तर झोपेच्या संपूर्ण पद्धतीवरही परिणाम करते. सकाळी मोबाईलच्या स्क्रीनमधून येणारा तेजस्वी प्रकाश शरीराच्या नैसर्गिक जैविक घड्याळात अडथळा निर्माण करतो. त्यामुळे रात्री नीट झोप लागत नाही. झोप पूर्ण न झाल्यामुळे दिवसभर ऊर्जा कमी राहते, स्मरणशक्तीवर परिणाम होतो आणि काम करण्याची क्षमता देखील घटते. तसेच जे लोक सकाळी उठताच नकारात्मक बातम्या किंवा तणाव वाढवणारी माहिती पाहतात, त्यांचा संपूर्ण दिवस चिडचिड आणि अस्वस्थतेत जातो.

सकाळी उठताच मोबाईल पाहण्याची सवय कशी सोडावी?

तज्ज्ञ या सवयीपासून दूर राहण्यासाठी काही सोपे उपायही सांगतात. ज्यांना सकाळी उठताच मोबाईल पाहण्याची सवय आहे, त्यांनी मोबाईल बेडरूमच्या बाहेर किंवा बिछान्यापासून दूर चार्जिंगला ठेवावा. त्यामुळे उठताच हात आपोआप मोबाईलकडे जाणार नाही. तसेच अलार्मसाठी मोबाईलऐवजी स्वतंत्र अलार्म घड्याळाचा वापर करावा.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)