Ayurvedic Remedies for Sneezing: सकाळ होताच सलग शिंका सुरू होतात? उठताच नाकातून पाणी, डोळ्यांतून पाणी आणि थांबेना अशी शिंक… ही अवस्था अनेकांना रोज भेडसावते. कधी सर्दी, कधी हवेतला बदल, तर कधी ॲलर्जी; कारण काहीही असो, वारंवार येणाऱ्या शिंकांमुळे अस्वस्थता, चिडचिड आणि लाजिरवाणी परिस्थिती निर्माण होते. पण आश्चर्य म्हणजे आयुर्वेदात यावर प्रभावी आणि घरगुती उपाय उपलब्ध आहेत, जे योग्य पद्धतीने केल्यास आराम देऊ शकतात.
शिंक येणं चांगलं की वाईट?
शिंक ही शरीराची संरक्षक प्रतिक्रिया आहे. नाकावाटे आत गेलेले जंतू, धूळकण किंवा त्रासदायक घटक बाहेर फेकण्याचं काम शिंक करते. मात्र, सलग आणि वारंवार शिंका आल्यास नाकातील श्लेष्मल आवरण संवेदनशील होतं, श्वसनमार्ग त्रस्त होतो आणि दैनंदिन कामात अडथळे येतात. विशेषतः सकाळी उठल्यानंतर शिंका जास्त येण्यामागे थंड हवा, कोरडेपणा किंवा प्रतिकारशक्ती कमी असणं कारणीभूत ठरू शकतं.
आयुर्वेद सांगतो उपाय घरीच
आयुर्वेदानुसार शरीरातील दोषसंतुलन बिघडलं की श्वसनमार्गावर परिणाम होतो. हे संतुलन सुधारण्यासाठी काही घरगुती, नैसर्गिक उपाय नियमित केल्यास आराम मिळू शकतो.
१) जस्तयुक्त अन्नाचा समावेश
जस्त हा सूक्ष्म पोषक घटक प्रतिकारशक्ती वाढवतो. सर्दी किंवा शिंक सुरू झाल्यावर जस्तयुक्त पदार्थ घेतल्यास शरीराची लढण्याची ताकद वाढते. डाळी, कडधान्ये, बिया आणि सुकामेवा हे जस्ताचे उत्तम स्रोत आहेत. गरज असल्यास वैद्यांच्या सल्ल्याने पूरक आहारही घेता येतो.
२) काळी वेलची, लहानसा उपाय, मोठा फायदा
दिवसातून दोन ते तीन वेळा काळी वेलची चावल्यास नाकातील कफ कमी होतो. तिच्या सुगंधी तेलामुळे श्वसनमार्ग मोकळा होतो आणि ॲलर्जीजन्य शिंकांमध्ये लक्षणीय आराम मिळतो, असे जाणकार सांगतात.
३) आवळा- प्रतिरोधक शक्तीचा आधार
आवळ्यात प्रतिऑक्सिडंट आणि जंतुनाशक गुणधर्म मुबलक प्रमाणात असतात. रोज दोन ते तीन आवळे खाल्ल्यास शिंकांची वारंवारता कमी होऊ शकते. कच्चा आवळा किंवा रस- दोन्ही प्रकार उपयुक्त ठरतात.
४) तुळस- औषधी गुणांचा खजिना
तुळशीची पाने उकळून काढलेला काढा सर्दी-शिंकांवर परिणामकारक ठरतो. तुळशीतील जंतुनाशक गुण संसर्गापासून संरक्षण करतात आणि नाक-घशातील दाह कमी करतात.
५) लसूण- वास नको, पण फायदा हवा
लसणामध्ये असलेले अॅलिसिन द्रव्य नाकातील जडत्व कमी करण्यास मदत करते. कच्चा लसूण किंवा तुपात थोडा परतून घेतल्यास ॲलर्जी व संसर्गाचा धोका कमी होतो.
सकाळच्या शिंकांपासून सुटका कशी?
उठताच थंड हवा थेट नाकात जाणे टाळा, कोमट पाणी प्या, खोलीत आर्द्रता ठेवा आणि वर सांगितलेले उपाय नियमित करा. लक्षणे टिकून राहिल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
सकाळी उठल्यावर येणाऱ्या शिंका दुर्लक्षित करू नका. आयुर्वेदातील साधे, नैसर्गिक उपाय योग्य पद्धतीने केल्यास आराम मिळू शकतो. औषधांवर अवलंबून न राहता, घरातील उपायांनीच शिंकांवर नियंत्रण मिळवण्याची हीच योग्य वेळ आहे.
(टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने दिलेला आहे. यातील माहिती वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचारांना पर्याय नाही. अधिक तपशिलासाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लेखातील माहितीची अचूकता, विश्वासार्हता किंवा परिणामकारकतेची जबाबदारी ‘लोकसत्ता’ घेत नाही.)
