Morning Vomiting Reason: सकाळी उठल्यानंतर काहीही खाण्याची इच्छा न होणं सामान्य आहे. पण काही खाल्ल्यावर उलटीसारखं वाटतं किंवा उलटी होते. काही लोकांना काहीही न खाल्लं तरी उलटी किंवा मळमळ जाणवते. ही समस्या सामान्य असली तरी तिच्याकडे दुर्लक्ष करू नये. जर सतत उलटी होत असेल किंवा उलटीत रक्त दिसत असेल, तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
ॲसिडिटी आणि गॅस्ट्रायटिस
पोट बराच वेळ रिकामं राहिलं तर तयार होणारं आम्ल (ॲसिड) पोटाच्या आतील भागावर परिणाम करू शकतं. त्यामुळे मळमळ, छातीत किंवा पोटात जळजळ आणि कधी-कधी पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाची उलटी होऊ शकते.
पित्ताची उलटी
पोट पूर्णपणे रिकामं असतानाही उलटी होत असेल, तर त्यामध्ये पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचा द्रव बाहेर येऊ शकतो. हे पित्त असू शकतं. बराच वेळ उपाशी राहणं किंवा वारंवार उलटी होणं यामुळे असं होऊ शकतं.
मॉर्निंग सिकनेस
गर्भधारणेच्या सुरुवातीच्या महिन्यांत अनेक महिलांना सकाळी रिकाम्या पोटी मळमळ आणि उलटीचा त्रास होतो. यालाच मॉर्निंग सिकनेस म्हणतात. ही समस्या अनेक महिलांमध्ये दिसून येते आणि तिच्याकडे दुर्लक्ष करू नये.
रक्तातील साखर कमी होणं
बराच वेळ काहीही न खाल्ल्यामुळे काही लोकांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. त्यामुळे अशक्तपणा, चक्कर येणं, घाम येणं आणि मळमळ होऊ शकते.
ॲसिड रिफ्लक्स
पोटातील आम्ल अन्ननलिकेत परत आलं, तर सकाळच्या वेळी घशात जळजळ होणं, तोंडात आंबट पाणी येणं आणि उलटीसारखं वाटणं अशा समस्या होऊ शकतात.
रिकाम्या पोटी उलटी होत असेल तर काय करावं?
सकाळी उठल्यानंतर खूप वेळ रिकाम्या पोटी राहू नका. हलका आणि सहज पचणारा नाश्ता करा. तसेच, पुरेसं पाणी पिण्याची सवय लावा.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
