Best Time to Take BP Medicine: जर तुम्ही तुमची रक्तदाबाची गोळी सकाळी घेत असाल, फक्त डॉक्टर म्हणाले म्हणून किंवा रोजच्या सवयीमुळे, तर तुम्ही तसे एकटे नाही आहात. पण, तुम्हाला माहिती आहे का की औषध घेण्याची वेळदेखील तितकीच महत्त्वाची आहे जितकी औषधाची मात्रा आणि प्रकार? संशोधन सांगते की, योग्य वेळ निवडल्यास औषध अधिक प्रभावी होऊ शकते आणि कधी कधी हृदयविकार, स्ट्रोक किंवा वेळेपूर्वी मृत्यूचा धोका कमी करता येतो.

पारंपरिक सल्ला : सकाळीच औषध घ्या

जास्तीत जास्त लोकांना सांगितले जाते की, रक्तदाबाची औषधे सकाळी घ्या. त्यामागे काहीतरी कारण आहे. कारण- शरीराचा नैसर्गिक चक्र (सर्केडियन ऱ्हिदम) सकाळी रक्तदाब वाढवतो, जेव्हा आपण उठतो तेव्हा कॉर्टिसॉल आणि अ‍ॅड्रेनलिन हार्मोन्सच्या वाढीमुळे हा वाढ होतो. डॉक्टरांचा असा विचार आहे की, सकाळी औषध घेतल्यास या वाढीवर नियंत्रण ठेवता येते.

परंतु, अलीकडील संशोधनाने पारंपरिक सल्ल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

नवीन संशोधन: संध्याकाळी औषध घेणे फायदेशीर?

२०१९ मध्ये स्पेनमध्ये झालेल्या संशोधनात जवळपास १९,००० लोकांचा सहा वर्षांचा अभ्यास करण्यात आला. काही लोक औषध सकाळी घेत होते, तर काही जण संध्याकाळी झोपण्यापूर्वी. परिणाम धक्कादायक होते:

हृदयविकाराचा धोका ४०% कमी

स्ट्रोकचा धोका ३४% कमी

हृदयविकाराने मृत्यूचा धोका ६६% कमी

संशोधक म्हणाले की, सामान्यतः रात्री रक्तदाब नैसर्गिकरीत्या कमी होतो; परंतु उच्च रक्तदाब असलेल्या लोकांमध्ये, विशेषतः वृद्ध किंवा मधुमेही रुग्णांमध्ये, ही कमी होणारी लय होत नाही. संध्याकाळी औषध घेणे या नैसर्गिक लय पुनर्संचयित करण्यास मदत करते आणि हृदयाला झोपेत विश्रांती मिळते.

मग काय करावे?

सगळ्यांसाठी एकच वेळ योग्य नाही. काही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात:

औषधाचा प्रकार – काही औषधे (उदा. मूत्रवर्धक) रात्री घेतल्यास झोपेत वारंवार बाथरूमला जावे लागते, तर काही औषधे रात्री अधिक उपयुक्त असतात.

तुमचा रक्तदाब नमुना – जर रात्री रक्तदाब न कमी होणारा (non-dipper) असेल, तर संध्याकाळी औषध घेणे फायदेशीर ठरू शकते.

दैनंदिन दिनचर्या – औषध वेळेवर घेतले नाही तर परिणाम कमी होतो.

एकापेक्षा जास्त औषधे – काही वेळा एक सकाळी, एक संध्याकाळी घेणे योग्य असते.

महत्त्वाचे मुद्दे

  • स्वतःच वेळ बदलू नका, डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
  • औषध घेण्याबरोबर आहार, व्यायाम, झोप आणि मानसिक ताणावरही लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
  • रक्तदाबाची नियमित तपासणी करा आणि औषध आठवणीत राहण्यासाठी नियम पाळा.

निष्कर्ष

सकाळी की संध्याकाळी औषध, याचा निर्णय वैयक्तिक असतो. परंतु, जर तुम्ही रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास संघर्ष करीत असाल, मधुमेह किंवा non-dipping नमुना असेल, तर संध्याकाळी औषध घेणे अधिक सुरक्षित ठरू शकते. मुख्य म्हणजे सातत्य बाळगा; वेळेवर औषध घेणे आणि आरोग्यदायी जीवनशैली हृदयविकारापासून संरक्षण देते.

(टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने दिलेला आहे. त्यातील माहिती वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचारांना पर्याय नाही. अधिक तपशिलासाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लेखातील माहितीची अचूकता, विश्वासार्हता किंवा परिणामकारकतेची जबाबदारी ‘लोकसत्ता’ घेत नाही.)