Cancer Types Which Cancer Is Most Dangerous: कर्करोग म्हटलं की, अनेकांच्या मनात पहिल्यांदा भीती निर्माण होते. कर्करोगाचे प्रमाण वाढत असताना त्याविषयीची जागरूकताही वाढताना दिसत आहे. वैद्यकीय क्षेत्रात उपचारपद्धतींमध्ये मोठी प्रगती झाली असली तरी कर्करोगाचे वेगवेगळे प्रकार, त्यांची लक्षणे आणि शरीरात पसरण्याचा वेग यांमध्ये मोठा फरक असतो. त्यामुळे प्रत्येक कर्करोगाचा धोका सारखा असेलच, असं नाही. मग नेमका कोणता कर्करोग अधिक धोकादायक मानला जातो? कोणत्या प्रकारावर वेळेत उपचार मिळाल्यास परिस्थिती नियंत्रणात आणणे तुलनेने सोपे ठरू शकते? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी कर्करोगतज्ज्ञांनी दिलेली माहिती महत्त्वाची ठरते.
कर्करोग किती गंभीर आहे हे कशावर ठरतं?
फोर्टिस ग्रेटर नोएडा येथील वैद्यकीय कर्करोगशास्त्र विभागाचे सल्लागार डॉ. प्रभात रंजन यांच्या मते, प्रत्येक कर्करोग हा गंभीर आजार आहे; मात्र प्रत्येक कर्करोगाची वर्तणूक सारखी नसते. “कर्करोग किती धोकादायक आहे हे केवळ त्याच्या नावावरून ठरवता येत नाही. तो किती वेगाने वाढतो, शरीरातील इतर अवयवांमध्ये किती लवकर पसरतो आणि त्यावर उपलब्ध उपचार किती प्रभावी आहेत, या गोष्टी त्या बाबतीत महत्त्वाच्या ठरतात,” असे डॉ. प्रभात रंजन यांनी सांगितले. म्हणजेच एकाच आजाराबद्दल ऐकून घाबरण्यापेक्षा त्याचा प्रकार, अवस्था आणि शरीरातील प्रसार किती आहे हे समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे.
अधिक आक्रमक मानले जातात ‘हे’ कर्करोग
काही कर्करोग तुलनेने अधिक आक्रमक असू शकतात. स्वादुपिंडाचा कर्करोग, फुप्फुसाचा कर्करोग, यकृताचा कर्करोग आणि मेंदूतील काही प्रकारचे कर्करोग यांचा यामध्ये समावेश होतो.
त्यातील काही कर्करोग सुरुवातीच्या अवस्थेत असताना त्यांची लक्षणे स्पष्टपणे जाणवतीलच, असे नाही. त्यामुळे आजाराची माहिती उशिरा मिळण्याची शक्यता असते. कर्करोग शरीराच्या इतर भागांमध्ये पसरल्यानंतर उपचार अधिक आव्हानात्मक होऊ शकतात. त्यामुळेच शरीरात काही असामान्य बदल जाणवत असतील, तर ते दीर्घकाळ दुर्लक्षित न करणे महत्त्वाचे ठरते.
काही कर्करोगांमध्ये उपचारांचे परिणाम चांगले
दुसरीकडे, काही कर्करोग सुरुवातीच्या अवस्थेतच लक्षात आल्यास, त्यावर प्रभावीपणे उपचार करता येऊ शकतात. स्तन, थायरॉईड व प्रोस्टेट या अवयवांना ग्रासणाऱ्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या अवस्थांमध्ये उपचारांचे चांगले पर्याय उपलब्ध आहेत.
रक्ताशी संबंधित काही कर्करोग, जसे की लसिका ग्रंथींचा कर्करोग आणि रक्ताचा कर्करोग, यांच्यासाठीही आधुनिक उपचारपद्धती उपलब्ध आहेत. त्यामुळे योग्य वेळी निदान आणि उपचार मिळाल्यास अनेक रुग्णांमध्ये चांगले परिणाम मिळू शकतात. मात्र याचा अर्थ हे कर्करोग कमी गंभीर आहेत किंवा त्यांच्यावर उपचारांची गरज नाही, असा अजिबात होत नाही. प्रत्येक रुग्णाची परिस्थिती वेगळी असू शकते.
कर्करोगाचे नाव नव्हे, ‘या’ गोष्टी अधिक महत्त्वाच्या
कर्करोग किती गंभीर आहे हे ठरविताना त्याचा प्रकार आणि उपप्रकार, आजाराची अवस्था, कर्करोगाच्या पेशींची वाढ किती वेगाने होत आहे, तो शरीरात किती पसरला आहे, रुग्णाचे एकूण आरोग्य आणि उपलब्ध उपचारपद्धती अशा अनेक बाबी विचारात घेतल्या जातात.
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्करोगाचे निदान जितक्या लवकर होते, तितके उपचारांचे पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे शरीरात दीर्घकाळ टिकणारी किंवा नेहमीपेक्षा वेगळी लक्षणे जाणवत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष न करता, डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
कर्करोगाचे नाव ऐकून घाबरण्यापेक्षा वेळेत तपासणी, योग्य निदान आणि तज्ज्ञांचा सल्ला यांना प्राधान्य देणे अधिक महत्त्वाचे आहे. कारण- अनेक वेळा आजार किती गंभीर आहे, यापेक्षा तो किती लवकर ओळखला गेला हे उपचारांच्या दृष्टीने निर्णायक ठरू शकते.
