Marathi Charolya & Poems For Mothers :”स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी’ ही प्रसिद्ध काव्यपंक्ती मराठीतील ख्यातनाम कवी यशवंत (यशवंत दिनकर पेंढारकर) यांनी रचली आहे. या ओळीचा सोपा अर्थ आहे की, आईच्या मायेची तुलना जगात कशाबरोबरही होऊ शकत नाही. आई नसेल तर माणूस जगात कितीही श्रीमंत किंवा शक्तिशाली असला, तरी तो भावनिकदृष्ट्या भिकाऱ्यासारखाच (अनाथ) असतो. आई ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक खास व्यक्ती असते. प्रत्येकाच्या आयुष्यात आईचं महत्त्व व स्थान हे अनन्यसाधारण आहे. आई आपल्या लेकरांच्या सुखासाठी काहीही करू शकते. आईचे प्रेम शब्दात व्यक्त करता येणे अश्यक आहे. हेच आई विषयी प्रेम व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी मातृदिन म्हणजेच ‘मदर्स डे’ जगभरात साजरा केला जातो. या दिवशी मुले आपल्या आईला भेटवस्तू देऊन आणि विविध मार्गांनी आपले प्रेम व्यक्त करून मातृदिन साजरा करतात. तुम्ही तुमच्या आईला सुंदर सुविचार किंवा कविता पाठवून अनोख्या पद्धतीने मातृदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता, किंवा जर तुम्ही तुमच्या आईसाठी शुभेच्छापत्र तयार करत असाल, तर त्यावर हे सुविचार किंवा कविता लिहू शकता.
आईवरील चारोळ्या

आई म्हणजे सुखाची सावली,
आई म्हणजे मायेचा सागर
निळ्या आकाशाएवढा तिचा मायेचा पदर
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आईच्या डोळ्यात दिसतं लेकरांवरील प्रेम,
आईच्या स्पर्शात जाणवते मायेची ऊब
आईच्या हातच एक घास म्हणजे स्वर्ग सुख
आईशिवाय आयुष्य म्हणजे केवळ दुःख
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

चालताना ठेच लागते तेव्हा नकळत ओठातून हाक येते…आई!
चटका बसला, भाजले, कापलं तरी पटकन आठवते ती आईच!
दुखलं-खुपलं, रडू आलं तरी धावत येते ती आई.
जखम कितीही खोल असो, सावरणारी एकच – आई!
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

काळजाची हाक असते आई,
निःशब्द जाग असते आई..
अंतरीचे गूढ असते आई,
ईश्वराचे रूप असते आई…
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

कोठेही न मागता,
भरभरुन मिळालेलं दान, म्हणजे आई…
विधात्याच्या कृपेचं,
निर्भेळ वरदान, म्हणजे आई…
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं थंडगार पाणी
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आई म्हणजे पहाटेचा शांत प्रकाश,
आई म्हणजे मनातला न बोचणारा श्वास
थकलेल्या पावलांना देणारी विश्रांतीची सावली,
आयुष्यभर साथ देणारी निःशब्द काळजी
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आई म्हणजे प्रेमाचं अखंड वहाणारं झरा,
आई म्हणजे प्रत्येक संकटात मिळणारा आधार
रडणाऱ्या डोळ्यांना हसवणारी जादूची हाक,
आणि हरवलेल्या मनाला शोधणारा मार्ग
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आई म्हणजे शब्दात न मावणारी भावना,
आई म्हणजे प्रत्येक हृदयाची पहिली ओळख
दुःख कितीही मोठं असलं तरी कमी करणारी शक्ती,
आणि आयुष्य सुंदर करणारी एकच व्यक्ती
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आई म्हणजे देवाने दिलेली सर्वात सुंदर भेट,
आई म्हणजे काळजाला मिळालेली शांत भेट
जिथे शब्द संपतात तिथे सुरू होते तिचं प्रेम,
आणि जिथे आयुष्य थांबतं तिथेही उरते तिची आठवण
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आईवरील कविता
आई म्हणोनी कोणी – कवी – यशवंत
’आई !’ म्हणोनी कोणी । आईस हाक मारी
ती हाक येइ कानी । मज होय शोककारी
नोहेच हाक माते । मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी ? । आई घरी न दारी !
ही न्यूनता सुखाची । चित्ता सदा विदारी
स्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी.
चारा मुखी पिलांच्या । चिमणी हळूच देई
गोठ्यात वासरांना । या चाटतात गाई
वात्सल्य हे पशूंचे । मी रोज रोज पाही
पाहून अंतरात्मा । व्याकूळ मात्र होई !
वात्सल्य माउलीचे । आम्हा जगात नाही
दुर्भाग्य याविना का ? । आम्हास नाही आई
शाळेतुनी घराला । येता धरील पोटी
काढून ठेवलेला । घालील घास ओठी
उष्ट्या तशा मुखाच्या । धावेल चुंबना ती
कोणी तुझ्याविना गे । का ह्या करील गोष्टी ?
तूझ्याविना न कोणी । लावील सांजवाती
सांगेल ना म्हणाया । आम्हा ’शुभं करोति’
ताईस या कशाची । जाणीव काही नाही
त्या सान बालिकेला । समजे न यात काही
पाणी तरारताना । नेत्रात बावरे ही
ऐकूनि घे परंतू । ’आम्हास नाहि आई’
सांगे तसे मुलीना । ’आम्हास नाहि आई’
ते बोल येति कानी । ’आम्हास नाहि आई’
आई ! तुझ्याच ठायी । सामर्थ्य नंदिनीचे
माहेर मंगलाचे । अद्वैत तापसांचे
गांभीर्य सागराचे । औदार्य या धरेचे
नेत्रात तेज नाचे । त्या शांत चंद्रिकेचे
वात्सल्य गाढ पोटी । त्या मेघमंडळाचे
वात्सल्य या गुणांचे । आई तुझ्यात साचे
गुंफूनि पूर्वजांच्या । मी गाइले गुणाला
साऱ्या सभाजनांनी । या वानिले कृतीला
आई ! करावया तू । नाहीस कौतुकाला
या न्यूनतेमुळे ही । मज त्याज्य पुष्पमाला
पंचारती जनांची । ना तोषवी मनाला
परि जीव बालकाचा । तव कौतुका भुकेला
येशील तू घराला । परतून केधवा गे !
दवडू नको घडीला । ये ये निघून वेगे
हे गुंतले जिवाचे । पायी तुझ्याच धागे
कर्तव्य माउलीचे । करण्यास येइ वेगे
रुसणार मी न आता । जरि बोलशील रागे
ये रागवावयाही । परि येइ येइ वेगे
कवी – यशवंत
२. आई मुलाचा संवाद – संकर्षण कऱ्हाडे
धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आलं
वस्तूंची फेकाफेक करत घरामध्ये गेलं
तिन्ही सांजेची वेळ रात्र झाली नव्हती
आई अशीच देवासमोर दिवा लावत होती
जगासमोर जे चाललं नव्हतं ते घरामध्ये मात्र चाललं
बाहेर जे बोलता येत नव्हतं ते लेकरू आईसमोर बोललं
म्हणाला खोटारडी आहेस तू आई खोट्या मार्गावर चाललीस
आजपर्यंत तु माझ्याशी खोटंच बोललीस
आशीर्वाद देताना काय म्हणतेस ? की माझं काहीच अडणार नाही
माझ्या बाबतीत कधीच मुळी वाईट काही घडणार नाही ?
आईपासून काय लपतय? तिच्या लक्षात आलं
तिने बाळाला घोटभर पाणी प्यायला दिलं
हुदक्यामधून वाट काढत पाणी पोटात गेलं
आई म्हणाली आता सांग तुला काय झालं ?
तो म्हणाला आई लोक विचित्र झालेत फार
सतत सगळे माझ्यावरती खाऊन असतात खार
त्यांच्या त्या अशांत अस्वस्थ नजरा मला कळतात
जाणवत मला माझ्यावरती ते खूप खूप जळतात
बरं माझ्याविषयी माझ्यामाघारी बोलतात लोकांजवळ
मी पुढे जातोय ना माझा माझा का पोटात यांच्या कळ?
बरं वाईट याच वाटत की या लोकांचा एकसंघ झालाय
मी वाईट वागत नसून मला यांनी बाजूला केलाय
आई म्हणाली बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला
मी तुला काय झालं? विचारले तू त्यांचा त्रास सांगितला
सोडून दे ना तुझ्यावरती ते रुसताहेत का हसताहेत?
कारण तुला पूर्ण करायची स्वप्नही तुला तुझ्याच डोळ्यांना दिसताहेत
त्यामुळे तुझ्या अपयशाची लोक पाहताहेत ती सर्व स्वप्ने खोटी कर
दुसऱ्यांची रेघ पुसण्यापेक्षा तू तुझी रेघ मोठी कर
आणि हे केलंस तर तुझं खरंच काही अडणार नाही
आणि आई आजही तेच म्हणेल माझ्या बाळाचं वाईट काही घडणार नाही
आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला
आणि तिने लावलेल्या दिव्याचा लख्ख प्रकाश पडला
तिने लावलेल्या दिव्याचा लख्ख प्रकाश पडला..
कवी – संकर्षण कऱ्हाडे
माझी मायं – कवी – स. द. पाचपोळ
हंबरून वासराले
चाटती जवा गाय
तवा मले तिच्यामंदी
दिसती माझी माय
आयाबाया सांगत व्हत्या
व्हतो जवा तान्हा
दुस्काळात मायेच्या माजे
आटला व्हता पान्हा
पिठामंदी पानी टाकून
पाजत जाय
तवा मले पिठामंदी
दिसती माझी माय
कन्या-काट्या येचायाला
माय जाई रानी
पायात नसे वहान तिच्या
फिरे अनवानी
काट्याकुट्यालाही तिचं
नसे पाय
तवा मले काट्यामंदी
दिसती माझी माय
बाप माझा रोज लावी
मायच्या मागं टुमनं
बास झालं शिक्षान आता
घेऊ दे हाती काम
शिकुनश्यानं कुठं मोठ्ठा
मास्तर हुनार हायं
तवा मले मास्तरमंदी
दिसतो माझी माय
दारु पिऊन मायेले मारी
जवा माझा बाप
थरथर कापे आन
लागे तिले धाप
कसायाच्या दावनीला
बांधली जशी गाय
तवा मले गायीमंदी
दिसती माझी माय
बोलता बोलता येकदा
तिच्या डोळा आलं पानी
सांग म्हने राजा तुझी
कवा दिसंल रानी
भरल्या डोल्यान कवा पाहील
दुधावरची साय
तवा मले सायीमंदी
दिसती माझी माय
म्हनून म्हंतो आनंदानं
भरावी तुझी वटी
पुना येकदा जलम घ्यावा
तुजे पोटी
तुझ्या चरनी ठेवून माया
धरावं तुझं पाय
तवा मले पायामंदी
दिसती माझी माय
कवी – स. द. पाचपोळ
