Motion Sickness: बहुतेक लोकांसाठी प्रवास करणे हा एक मजेदार आणि रोमांचक अनुभव असतो; पण काहींना प्रवासाचा खूपच त्रास होतो. प्रवासादरम्यान चक्कर, मळमळ, उलट्या किंवा अस्वस्थता जाणवते. कार, बस, ट्रेन, जहाज किंवा विमानातून प्रवास करीत असले तरी मळमळ ही एक सामान्य समस्या आहे. वैद्यकीयदृष्ट्या याला ‘मोशन सिकनेस’ म्हणतात. दर तीनपैकी एका व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी याचा अनुभव येतो. प्रवासातील मळमळ फक्त लहान मुले किंवा वृद्धांनाच नाही, तर कोणत्याही वयोगटातील कोणालाही याचा त्रास होऊ शकतो.
प्रवासादरम्यान मळमळ का जाणवते?
मोशन सिकनेस ही एक अशी स्थिती आहे,ज्यामुळे प्रवासादरम्यान मळमळ, उलटी, चक्कर किंवा डोकेदुखी होते. हे तेव्हा घडते जेव्हा मेंदू, डोळे आणि कान एकसारखी माहिती पाठवू शकत नाहीत. उदाहरणार्थ, जर तुम्ही गाडीत बसून पुस्तक वाचत असाल किंवा मोबाईल फोन पाहत असाल, तर तुमचे डोळे तुम्हाला सांगतात की, तुम्ही स्थिर आहात; पण तुमच्या कानांची संतुलन प्रणाली तुम्हाला सांगते की,तुम्ही गतिमान आहात. या विरोधाभासामुळे शरीर गोंधळते आणि उलटी होते.
आपल्या शरीरात लहान सेन्सर (रिसेप्टर्स) असतात, जे आपले डोळे, कान आणि शरीरात होणारे बदल ओळखतात. मग ते आपल्या मेंदूला संदेश पाठवतात. प्रवासादरम्यान या संदेशांमध्ये विसंगती निर्माण होते. शरीराचा तोल सांभाळणारी प्रणाली म्हणजेच वेस्टिब्युलर सिस्टीम विस्कळित होते. ब्रेन स्टेम आणि हायपोथॅलॅमस सक्रिय होतात, ज्यामुळे मळमळ, चक्कर आणि उलट्या होतात.
प्रवासादरम्यान आपल्याला उलट्या का होतात?
वाहनाची होणारी हालचाल हा एकमेव घटक नाही. पोटाची स्थिती आणि प्रवासाचे स्वरूप हेदेखील महत्त्वाचे आहे:
१) रिकाम्या पोटी प्रवास केल्याने पोटातील व्हॅगस नर्व्ह सक्रिय होते, ज्यामुळे चक्कर आणि अस्वस्थता वाढते.
२) पोटभर जेवणानंतर प्रवास केल्याने उलट्या होण्याचा धोकाही वाढतो.
३) खराब रस्ते, चढ-उताराचे रस्ते, वाहनाचे धक्के किंवा दुर्गंधी यांसारख्या गोष्टींमुळेदेखील प्रवासातील मळमळ वाढू शकते.
४) कानाच्या आतील द्रवाच्या हालचालीमुळे मान आणि कवटीमध्ये कंपने निर्माण होतात, ज्यामुळे मेंदूचा समतोल बिघडतो.
प्रवासादरम्यान जाणवणारी मळमळ टाळण्यासाठी करा ‘हे’ उपाय
१) जड खाणे टाळा – प्रवासाला निघण्यापूर्वी हलके जेवण करा.
२) रिकाम्या पोटी प्रवास करू नका – प्रवासादरम्यान हलका नाश्ता किंवा फळे सोबत ठेवा.
३) डॉक्टरांचा सल्ला – गरज भासल्यास डॉक्टरांच्या देखरेखीखाली औषध घ्या.
४) धावत्या वाहनात झोपणे टाळा – झोपेत तुमचा तोल जाऊ शकतो.
५) गाडी थांबवा – मळमळायला लागताच गाडी थांबवून स्वतःचे लक्ष विचलित करा.
६) शरीराची स्थिती स्थिर ठेवा – डोके, खांदे, कंबर आणि गुडघ्यांची हालचाल कमीत कमी करा.
७) पुढच्या सीटवर बसा. त्यामुळे तोल सांभाळणे सोपे जाते.
८) निकोटीन आणि धूम्रपान टाळा.
९) मंद संगीत ऐका – त्यामुळे मन शांत होते आणि मळमळ कमी होते.
