Bitter Taste Reason: सकाळी उठताच तोंड कडू लागणे किंवा दिवसभर वारंवार तोंडाची चव बिघडणे ही समस्या अनेकांना जाणवते. त्यामुळे बरेच लोक याकडे दुर्लक्ष करतात. पण ही समस्या बराच काळ कायम राहिली, तर ती शरीरातील एखाद्या आरोग्याच्या समस्येचा इशारा असू शकते. मात्र, प्रत्येक वेळी तोंड कडू होणं म्हणजे गंभीर आजारच असतो असं नाही. पण त्यामागचं कारण जाणून घेणं महत्त्वाचं आहे. चला जाणून घेऊया, तोंड कडू होण्यामागील ५ मुख्य कारणं कोणती असू शकतात.

ॲसिड रिफ्लक्सची समस्या

तोंड कडू होण्यामागे ॲसिड रिफ्लक्स किंवा गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज हे कारण असू शकतं. या स्थितीत पोटातील आम्ल अन्ननलिकेतून वर येतं. त्यामुळे तोंडात कडू किंवा आंबट चव जाणवू लागते.

तोंड आणि दात नीट स्वच्छ न ठेवणे

दात आणि जीभ नीट स्वच्छ केली नाही, तर तोंडात जंतू वेगाने वाढतात. त्यामुळे तोंडाला दुर्गंधी येण्यासोबतच तोंड कडू लागण्याची समस्याही होऊ शकते. त्यामुळे दात आणि जीभ रोज नीट स्वच्छ ठेवा.

यकृताची समस्या

सतत तोंड कडू राहणं हे यकृत किंवा पित्ताशयाशी संबंधित समस्येचं लक्षण असू शकतं. यासोबतच पोटदुखी, डोळे किंवा त्वचा पिवळी पडणं आणि भूक कमी लागणं अशी लक्षणंही दिसू शकतात.

औषधांचे दुष्परिणाम

काही अँटिबायोटिक्स, व्हिटॅमिन सप्लिमेंट्स, रक्तदाबाची औषधं आणि इतर काही औषधांमुळे तोंडात कडू किंवा धातूसारखी चव येऊ शकते. एखादं नवीन औषध सुरू केल्यानंतर ही समस्या जाणवत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

संसर्गाची समस्या

सर्दी, पडसं, सायनसचा संसर्ग, व्हायरल इन्फेक्शन, तोंडातील संसर्ग किंवा चव ओळखणाऱ्या नसांवर परिणाम करणारे काही आजार यांमुळेही तोंड कडू लागू शकतं.

तोंडाची कडवट चव कमी करण्यासाठी काय कराल?

दिवसातून किमान दोन वेळा दात आणि जीभ नीट स्वच्छ करा. दिवसभर पुरेसं पाणी प्या आणि जंक किंवा अस्वास्थ्यकर पदार्थांपासून दूर राहा. तसेच, संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या, त्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)