Oral cancer symptoms : तोंडातला अल्सर म्हणजेच तोंडात व्रण तयार होणे ही एक सामान्य समस्या आहे, ज्यामुळे खाणे, पिणे आणि बोलण्यातही अडथळे येऊ शकतात. कधी कधी हे व्रण आपोआप बरे होतात; परंतु काही लोकांना त्यांचा वारंवार त्रास होतो. तथापि, हे व्रण पौष्टिकतेची कमतरता, तोंडाला झालेली दुखापत किंवा इतर समस्यांमुळेही तयार होऊ शकतात. त्यामुळे तोंडातील व्रणांकडे दुर्लक्ष करू नये. डॉ. शालिनी सिंग साळुंके स्पष्ट करतात की, तोंडातील व्रण कधी कधी एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण ठरू शकतात. जरी त्यावर काही विशिष्ट उपायांद्वारे उपचार करता येत असले तरी आपण तोंडातील व्रणांची कारणे आणि ते एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण केव्हा ठरू शकतात, हे आपण जाणून घेऊया.
तोंडात अल्सर का होतात?
तोंडात व्रण तयार होण्याची अनेक कारणे आहेत, जसे की व्हिटॅमिन बी१२, लोह किंवा फोलेटची कमतरता, तणाव किंवा तोंडाला झालेली इजा. कधी कधी, काही विशिष्ट औषधांमुळेही अल्सर होऊ शकतात. हे अल्सर सहसा एक ते दोन आठवड्यांत आपोआप बरे होतात; परंतु जर अल्सर पुन्हा पुन्हा होत असतील किंवा जास्त काळ टिकून राहत असतील, तर तपासणीसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
तोंडात व्रण तयार होण्याची कारणे
जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता – व्हिटॅमिन बी१२, फोलेट, लोह किंवा जस्त या पोषक घटकांच्या कमतरतेमुळे काही लोकांना तोंडात वारंवार व्रण तयार होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. त्याव्यतिरिक्त संतुलित आहार न घेतल्याने पोषक तत्त्वांच्या कमतरतेचाही धोका वाढू शकतो.
तणाव आणि झोपेचा अभाव – तणावामुळेदेखील तोंडात व्रण तयार होऊ शकतात. काही लोकांना अनावश्यक तणाव जाणवतो किंवा त्यांच्या झोपेचे चक्र विस्कळीत होते, ज्यामुळे ही समस्या अधिकच गंभीर होऊ शकते.
तोंडाला होणाऱ्या दुखापती – जसे की गालाला जखम होणे, दात खूप जोरात घासणे, गरम पदार्थाने भाजणे किंवा एखाद्या धारदार वस्तूला दात घासले गेल्यानेदेखील फोड येऊ शकतात. तोंडाला होणाऱ्या दुखापती हे फोड येण्याचे एक सामान्य कारण आहे. तोंडाच्या आतील अस्तरावर (Mucous membrane) होणारा एक दीर्घकाळ टिकणारा (Chronic) दाहक किंवा जळजळ करणारा आजार
ओरल लायकेन प्लॅनस – ओरल लायकेन प्लॅनस हा तोंडाच्या आतील अस्तरावर हल्ला करणारा एक दीर्घकाळ टिकणारा दाहक किंवा जळजळ करणारा आजार आहे. या आजारामध्ये गालांच्या आतील बाजूस पांढरे, स्रावयुक्त चट्टे, लालसरपणा, जळजळ आणि कधी कधी वेदनादायक फोड येऊ शकतात. जर तुम्हाला ही लक्षणे जाणवत असतील, तर तुम्ही डॉक्टर किंवा दंतवैद्याचा सल्ला घ्यावा.
तोंडातल्या अल्सरमुळे कर्करोग होऊ शकतो का?
तोंडातील व्रण हे नेहमीच कर्करोगाचे लक्षण नसते. कारण ते पौष्टिकतेची कमतरता, तणाव, तोंडाला झालेली इजा किंवा इतर कारणांमुळे होऊ शकतात. जर एखादा व्रण बराच काळ टिकून राहिला, त्यातून वारंवार रक्त येत असेल किंवा त्यावर पांढरे किंवा लाल डाग दिसत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. ही लक्षणे कधी कधी तोंडाच्या कर्करोगाशी संबंधित असू शकतात. म्हणून जर व्रण दोन आठवड्यांत बरा झाला नाही, तर दंतवैद्य किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे
- न बरी होणारी जखम
- पांढरे किंवा लाल ठिपके
- गाठ किंवा सूज
- सुन्नपणा
- गिळण्यास किंवा चावण्यास अडचण
- तोंड कमी प्रमाणात उघडणे किंवा तोंड उघडणेच कठीण होणे
- आवाज बदलणे
- दात सैल होणे
- कानदुखी
- मानेतील गाठ
- वजन कमी करणे
तोंडातल्या अल्सरपासून आराम मिळविण्यासाठी काय करावे?
- तोंडातल्या व्रणापासून आराम मिळवण्यासाठी कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ मिसळा, गुळण्या करा आणि ते पाणी थुंकून टाका.
- काही दिवस खूप मसालेदार, आंबट, तिखट आणि कुरकुरीत पदार्थ खाणे टाळा.
- मऊ केसांचा टूथब्रश वापरा आणि पाणी प्या किंवा संतुलित आहार घ्या.
- जर तुम्हाला वारंवार फोड येत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि पोषक तत्त्वांच्या कमतरतेबाबतची खात्री करून घेण्यासाठी तपासणी करून घ्या.
