Home Remedies for Mouth Ulcers: उन्हाळ्यात अनेकांना एक त्रास वारंवार सतावतो. सुरुवातीला किरकोळ वाटणारी ही समस्या काही वेळा इतकी वाढते की खाणे, पिणे आणि बोलणेही कठीण होते. तोंडातील अल्सर, जिभेवर येणारे लाल फोड आणि तोंडाच्या आतील भागातील जखमा यामुळे प्रचंड वेदना आणि जळजळ होऊ शकते. अनेक जण यासाठी विविध औषधांचा आधार घेतात. मात्र, घरात सहज उपलब्ध असलेल्या काही नैसर्गिक उपायांमुळेही मोठा दिलासा मिळू शकतो.
तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढणे, पोटाचे विकार, बद्धकोष्ठता, पोषक घटकांची कमतरता, ताणतणाव आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे तोंडातील अल्सर आणि जिभेवर लाल फोड येण्याची शक्यता वाढते. वेळेत काळजी घेतली नाही तर हा त्रास अनेक दिवस कायम राहू शकतो.
या समस्येवर घरगुती उपायांमध्ये कोरफड हा अत्यंत उपयुक्त पर्याय मानला जातो. ताजी कोरफड स्वच्छ धुवून तिच्यातील गर काढावा आणि तो थेट अल्सर किंवा जखमांवर लावावा. कोरफडीचा थंडावा जळजळ कमी करण्यास मदत करतो. नियमित वापर केल्यास वेदना आणि अस्वस्थता कमी होण्यास मदत मिळू शकते.
तोंडातील अल्सरवर पेरूची कोवळी पानेदेखील फायदेशीर मानली जातात. पेरूच्या पानांमध्ये जीवाणूंविरुद्ध लढणारे तसेच सूज कमी करणारे गुणधर्म असल्याचे मानले जाते, त्यामुळे तोंडातील हानिकारक जंतूंवर नियंत्रण मिळविण्यास मदत होऊ शकते. पेरूची कोवळी पाने स्वच्छ धुवून चावल्यास जिभेवरील लाल फोड, जखमा आणि अल्सरमुळे होणाऱ्या वेदना व जळजळ कमी होण्यास मदत मिळू शकते.
अनेक घरांमध्ये वापरले जाणारे शुद्ध गाईचे तूपदेखील या समस्येत आराम देणारे मानले जाते. रात्री झोपण्यापूर्वी स्वच्छ कापसाच्या मदतीने तोंडातील जखमांवर किंवा अल्सरवर तूप लावता येते. तुपामुळे तोंडातील कोरडेपणा कमी होऊन प्रभावित भागाला ओलावा मिळतो, त्यामुळे वेदना आणि जळजळ काही प्रमाणात कमी होऊ शकते.
तोंडातील अल्सर होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. शरीरातील उष्णता वाढणे, बद्धकोष्ठता, जीवनसत्त्व बी-१२ आणि लोहाची कमतरता, अतितिखट पदार्थांचे सेवन, पुरेसे पाणी न पिणे, मानसिक ताणतणाव, संप्रेरकांमधील बदल आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे ही त्यामागील प्रमुख कारणे मानली जातात. काही वेळा दातांची स्वच्छता न राखल्याने किंवा तोंडाला झालेल्या किरकोळ दुखापतीमुळेही जखमा निर्माण होऊ शकतात.
मध हे देखील एक प्रभावी घरगुती उपाय मानले जाते. जवळपास प्रत्येक घरात सहज उपलब्ध असणारे मध तोंडातील अल्सरमुळे होणारी अस्वस्थता कमी करण्यास मदत करू शकते. रात्री जेवणानंतर प्रभावित भागावर थोडासे मध लावल्यास जळजळ कमी होण्यास मदत मिळू शकते. मधातील नैसर्गिक गुणधर्म तोंडातील भागाला ओलावा देऊन आराम मिळवून देतात.
आवळा हा आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो. तोंडातील अल्सर वारंवार होत असेल तर आवळ्याच्या सालीच्या उकळलेल्या पाण्याने सकाळ-संध्याकाळ गुळण्या करता येतात. तसेच आवळ्याची पाने स्वच्छ धुवून चावल्यानेही काही प्रमाणात आराम मिळू शकतो. आवळ्यात असलेले जीवनसत्त्व सी आणि अँटीऑक्सिडंट घटक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.
तोंडातील अल्सर, जिभेवरील लाल फोड आणि जखमा या समस्या साध्या वाटल्या तरी त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. संतुलित आहार, भरपूर पाणी, ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या आणि तोंडाची नियमित स्वच्छता यामुळे हा त्रास टाळता येऊ शकतो. मात्र, जखमा वारंवार होत असतील किंवा दीर्घकाळ बऱ्या होत नसतील तर वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
घरात सहज उपलब्ध असलेली पेरूची पाने, कोरफड, तूप, मध आणि आवळा हे उपाय अनेकांना आराम देऊ शकतात. त्यामुळे तोंडातील अल्सर, जिभेवरील लाल फोड आणि जखमांनी त्रस्त असाल तर हे सोपे घरगुती उपाय करून पाहण्यास हरकत नाही.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
