conversation between MS Dhoni and young fan : सेलिब्रिटी असो, कंटेंट क्रिएटर किंवा खेळाडू; प्रत्येकाच्या शरीराची गरज वेगळी असते, त्यामुळे प्रत्येकासाठी डाएट प्लॅनही वेगळा असतो. एमएस धोनीने एकदा क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका लहान चाहत्याला आहाराबाबत महत्त्वाचा सल्ला दिला होता. हा चाहता भविष्यात विकेटकीपर-बॅटर बनू इच्छित होता. धोनीने त्याला फक्त क्रिकेटच्या सरावाबद्दलच नाही, तर योग्य आहार आणि फिटनेसबाबतही माहिती दिली.
२०२३ मधील एका व्हिडीओत धोनी त्या लहान चाहत्याला “हाय अनिरुद्ध, कसा आहेस? तुझ्या वडिलांनी मला सांगितले की तुलाही विकेटकीपर-फलंदाज बनायचे आहे. पण, त्यांना असेही वाटले की तुला खाण्यापिण्यात फारसा रस नाही, त्यामुळे माझा सल्ला असा आहे की, तू योग्य गोष्टी खा आणि साखर व तळलेले पदार्थ शक्यतो खाणे टाळ. त्यासोबतच भरपूर भाज्या, फळे आणि संतुलित आहार घे; कारण षटकार मारण्यासाठी तुला अधिक ताकदवान बनावे लागेल आणि वेगवान झेल घेण्यासाठी चपळ राहावे लागेल, म्हणून मला आशा आहे की, आतापासून तू तुझ्या पालकांच्या सल्ल्यानुसार आहार घेशील. तसे करायचे नसल्यास तू काय खाल्लं पाहिजे याचा ‘डाएट प्लॅन’ मी तुला देऊ शकतो! ठीक आहे? तुला खूप खूप शुभेच्छा!”
व्हायरल होत असलेल्या या जुन्या व्हिडीओच्या निमित्ताने, खेळासाठी आवश्यक आहार आणि पोषण याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने सल्लागार आहारतज्ज्ञ आणि फिटनेस तज्ज्ञ गरिमा गोयल यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, पौष्टिक आहार घेणे म्हणजे काही कठीण किंवा गुंतागुंतीची गोष्ट नाही. तुम्ही खेळाडू असाल किंवा केवळ निरोगी राहण्याचा प्रयत्न करणारी एक सामान्य व्यक्ती; संतुलित आहाराची मूलभूत तत्त्वे बऱ्याच अंशी सारखीच असतात.
तज्ज्ञांच्या दृष्टिकोनातून, चांगल्या आहारामध्ये उच्च-गुणवत्तेचे प्रथिने (protein), कॉम्प्लेक्स कर्बोदके (complex carbohydrates), आरोग्यदायी चरबी (healthy fats), तंतूमय पदार्थ (fibre), फळे, भाज्या आणि पुरेसे द्रव पदार्थ यांचा समतोल असायला हवा. अंडी, दुग्धजन्य पदार्थ, कडधान्ये, मासे, चिकन किंवा सोया यांसारख्या पदार्थांमधून मिळणारी प्रथिने स्नायूंची दुरुस्ती आणि स्नायूंची वाढ करण्यास मदत करतात; तर संपूर्ण धान्य, भरड धान्य (millets), फळे आणि भाज्या यांतून सातत्याने ऊर्जा, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात. तसेच सुकामेवा, बिया आणि वनस्पतीजन्य तेलांमधून मिळणारी चांगली चरबी शरीरातील संप्रेरकांच्या निर्मितीसाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी महत्त्वाची असते.
हा आहार सर्वांसाठी लागू होईलच असे नाही. व्यक्तीचे वय, शारीरिक हालचालींचे प्रमाण, वैद्यकीय स्थिती, शरीराच्या रचनेबाबतची उद्दिष्टेजीव, जीवनशैली यांनुसार पोषणाच्या गरजा बदलतात. उदाहरणार्थ, क्रिकेटपटूचा आहार हा तीव्र सराव, त्यातून सावरणे आणि खेळात टिकवून ठेवणे या गोष्टी लक्षात घेऊन तयार केला जातो. याउलट, एका सामान्य व्यक्तीला लागणाऱ्या कॅलरीज, पोषक घटकांचे प्रमाण वेगळे असू शकते.
निरोगी आहाराचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ‘परिपूर्णते’ पेक्षा ‘सातत्य’ राखणे. जेवणाच्या नियमित वेळा, अन्नाचे योग्य प्रमाण, अति-प्रक्रिया केलेले पदार्थ व साखरयुक्त पेये यांचे मर्यादित सेवन आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे यांचा दीर्घकालीन परिणाम, अनेकदा प्रतिबंधात्मक किंवा तात्पुरत्या लोकप्रिय (fad) आहारांचे पालन करण्यापेक्षा अधिक चांगला असतो. सस्टेनेबल न्यूट्रिशन म्हणजे झटपट वजन कमी करण्यासारख्या उपायांच्या मागे न लागता, दीर्घकाळ टिकवता येईल अशा संतुलित आहाराच्या सवयी अंगीकारणे होय.
