Mumbai Doctors Identify Rare Stomach Cancer: सतत पोटदुखी, भूक न लागणे, वजन झपाट्याने कमी होणे आणि मासिक पाळीत अनियमितता… ही लक्षणे दिसल्यानंतर अनेक महिलांना अंडाशयाशी संबंधित आजाराचा संशय येऊ शकतो. मात्र, मुंबईतील दोन महिलांच्या बाबतीत डॉक्टरांसमोर असे सत्य आले, ज्याने वैद्यकीय क्षेत्रालाही विचार करायला भाग पाडले.

तपासणीदरम्यान दोघींच्या अंडाशयात मोठी गाठ आढळली. सुरुवातीला अंडाशयाचा कर्करोग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र, पुढील तपासणीत धक्कादायक वास्तव समोर आले. अंडाशयातील गाठ ही मूळ आजार नव्हती. प्रत्यक्षात कर्करोगाची सुरुवात पोटातून झाली होती आणि तो शांतपणे अंडाशयापर्यंत पसरला होता.

मुंबईतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि कामा व अल्ब्लेस रुग्णालयातील डॉक्टरांनी या दुर्मीळ प्रकरणांची नोंद केली असून, त्यांचा अहवाल आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.

नेमका हा आजार काय आहे?

डॉक्टरांच्या मते, या प्रकाराला क्रुकेनबर्ग अर्बुद असे म्हटले जाते. हा अंडाशयाचा मूळ कर्करोग नसून शरीरातील दुसऱ्या अवयवातून, विशेषतः पोटातून, कर्करोगाच्या पेशी अंडाशयात पसरतात.

क्वचित प्रसंगी हा कर्करोग मोठे आतडे, स्वादुपिंड, अपेंडिक्स किंवा स्तनातूनही पसरू शकतो. अंडाशयातील सर्व गाठींपैकी केवळ एक ते दोन टक्के गाठी या प्रकारातील असतात, त्यामुळे हा आजार अत्यंत दुर्मीळ मानला जातो.

पहिल्या महिलेची कहाणी

२५ वर्षीय महिला सतत पोटदुखी, मासिक पाळीतील अनियमितता, भूक न लागणे आणि वजन कमी होणे या तक्रारींमुळे रुग्णालयात दाखल झाली होती.

तपासणीत उजव्या अंडाशयात मोठी गाठ दिसली. सुरुवातीला अंडाशयाचा कर्करोग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र, पुढील तपासणीत पोटाच्या आतील भागातही बदल दिसून आले. अन्ननलिकेतून विशेष तपासणी आणि ऊतींच्या परीक्षणानंतर कर्करोगाचा उगम पोटात झाल्याचे स्पष्ट झाले.

दुसऱ्या महिलेतही तोच धक्कादायक निष्कर्ष

३७ वर्षीय दोन मुलांची आईही जवळपास याच लक्षणांसह रुग्णालयात आली होती. तिला पोटदुखी, मासिक पाळीतील बदल, वजन घटणे आणि शौचाच्या सवयींमध्ये बदल जाणवत होते.

तपासणीत दोन्ही अंडाशयांमध्ये गाठी आढळल्या. सुरुवातीला अंडाशयाचा कर्करोग असल्याचा संशय होता. मात्र, शस्त्रक्रिया आणि पुढील तपासणीनंतर तिच्याही कर्करोगाची सुरुवात पोटातून झाल्याचे डॉक्टरांनी निश्चित केले. त्यानंतर तिला सहा टप्प्यांमध्ये औषधोपचार देण्यात आले आणि पुढील तपासणीत तिची प्रकृती स्थिर असल्याचे दिसून आले.

डॉक्टरांनी कोणत्या लक्षणांकडे लक्ष देण्याचा दिला सल्ला?

या अभ्यासाच्या प्रमुख संशोधक डॉ. प्रतीक्षा दत्तू खामकर यांनी सांगितले की, दोन्ही महिलांना सुरुवातीला तीव्र पोटदुखी होती. मात्र, पुढील तपासणीत हा दुर्मीळ प्रकार समोर आला.

त्यांच्या मते, एखाद्या महिलेच्या अंडाशयात गाठ आढळली आणि त्याचबरोबर सतत पोटदुखी, भूक न लागणे, विनाकारण वजन कमी होणे किंवा शौचाच्या सवयींमध्ये बदल अशी लक्षणे दिसत असतील तर केवळ अंडाशयाचा विचार न करता पोट किंवा आतड्यांतील कर्करोगाचीही तपासणी करणे आवश्यक आहे.

ही लक्षणे अजिबात दुर्लक्षित करू नका

डॉक्टरांच्या मते, खालील लक्षणे सातत्याने जाणवत असतील तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

  • सतत पोटदुखी
  • पोट फुगल्यासारखे वाटणे
  • मासिक पाळी अनियमित होणे
  • भूक कमी होणे
  • विनाकारण वजन कमी होणे
  • थोडे खाल्ले तरी पोट भरल्यासारखे वाटणे
  • शौचाच्या सवयींमध्ये बदल

वेळीच निदान होणे का महत्त्वाचे?

डॉक्टरांच्या मते, अंडाशयातील गाठ दिसली म्हणजे ती नेहमी अंडाशयातूनच निर्माण झाली आहे असे समजू नये. कर्करोगाची सुरुवात ज्या अवयवातून झाली आहे, त्यानुसार उपचार निश्चित केले जातात. त्यामुळे योग्य वेळी अचूक निदान झाल्यास रुग्णावर योग्य उपचार लवकर सुरू करता येतात आणि आजारावर नियंत्रण मिळवण्याची शक्यता वाढते.

ही दोन प्रकरणे महिलांनी आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष करू नये, याची महत्त्वाची जाणीव करून देणारी ठरत आहेत. विशेषतः सतत पोटाशी संबंधित तक्रारी आणि अंडाशयातील गाठ एकत्र आढळल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेऊन सखोल तपासणी करून घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.