Biryani And Watermelon Death Myth : मुंबईतील पायधुनी परिसरात बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला, या घटनेमुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांच्या मनात आता बिर्याणी आणि कलिंगड खाण्याबाबत भीती निर्माण झाली आहे, यामुळे आता असा प्रश्न उपस्थित होतो की, बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होऊ शकतो का? याच विषयावर केईएमचे माजी अधिष्ठाता आणि ज्येष्ठ जठरांत्र शल्यचिकित्सक डॉ. अविनाश सुपे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

डॉ. अविनाश सुपे सांगतात की, अशा प्रकरणांमध्ये जेव्हा कोणाचा असा मृत्यू होतो, तेव्हा ‘फूड पॉयझनिंग’ (अन्नातून विषबाधा) झालं असावं असा संशय असतो, दुसरं काही कारण नसेल असं मला वाटतं, कारण त्यांनी मद्यपान किंवा इतर काही केलं नव्हतं. या प्रकरणात अन्नातून विषबाधा एक तर बिर्याणी किंवा कलिंगडातून झाली असावी. कलिंगड आणि बिर्याणी सोबत खाल्ल्यामुळे असा कोणताही धोका नसल्याचं तज्ज्ञ सांगतात.

जर बिर्याणीतून विषबाधा झाली असेल तर परिणाम दिसायला साधारण चार तास लागले असते. कारण अनेकदा खाल्ल्यानंतर अन्न लहान आतड्यापर्यंत पोहोचलं की प्रक्रिया सुरू होते, ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो. पण, या प्रकरणात ज्या वेगाने हे मृत्यू झाले आहेत ते पाहता कलिंगडातून विषबाधा झाली असण्याची शक्यता अधिक आहे. अशाच काही घटना आधीही समोर आल्या आहेत.

या प्रकरणात कलिंगड, बिर्याणीची न्यायवैद्यक (forensic) तपासणी व्हायला हवी. तसेच त्यांना बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यानंतर कोणती लक्षणे जाणवत होती हे तपासणे आवश्यक आहे. यात डोळ्यांच्या बाहुल्या विस्तारल्या होत्या की आकुंचन पावल्या होत्या, फुप्फुसात पाणी झालं होतं का किंवा आतड्यांमध्ये जखमा होत्या का? या सर्व गोष्टी तपासूनच नेमके कारण काय असावे हे सांगता येऊ शकते. पण, यात कलिंगडातील कीटकनाशकांमुळे विषबाधा होऊन मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे.

अनेकदा फळं लवकरात लवकर पिकावी, त्यांचा रंग गडद दिसावा यासाठी कीटकनाशके वापरली जातात. यात कलिंगडाचा रंग आतून लाल दिसावा यासाठी विविध रसायने इंजेक्शनद्वारे दिली जातात, त्यामुळे त्यांनी खाल्लेल्या कलिंगडावरही अशीच काही रासायनिक प्रक्रिया झाली होती का तपासले पाहिजे.

कलिंगड खाण्याची योग्य वेळ कोणती आहे?

डॉ. अविनाश सुपे सांगतात, कलिंगड तुम्ही कधीही खाऊ शकता. पण, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आधी धुवून घेणे गरजेचे आहे. आजकाल आंबा आणि केळी यांसारखी फळे कृत्रिमरीत्या पिकवली जातात किंवा केळीसारखी सामान्य फळंदेखील तुम्ही आधी व्यवस्थित धुवून घेतली पाहिजेत.

कलिंगड कोणत्या पदार्थांबरोबर खाऊ नये?

वैयक्तिकरित्या असे वाटते की, कलिंगड पचायला खूप हलके असते, कारण त्यात मुख्यतः पाणी आणि साखर असते. दुसरीकडे बिर्याणी जड आणि तेलकट असते. ते किती प्रमाणात खाल्ले यावरही अवलंबून आहे. कलिंगडाच्या फक्त दोन फोडी खाल्ल्याने सहसा असं होत नाही.

पण जर तुम्ही खूप जड काही खाल्ले असेल, जसे की भरपूर चिकन किंवा मटण आणि त्यानंतर आंबा, फणस किंवा सुरणसारखी जड फळे खाल्ली, तर हे कॉम्बिनेशन त्रासदायक ठरू शकतं, पण या प्रकरणात कीटकनाशकांशी संबंधित विषबाधा असावी.

जेवणानंतर लगेच कलिंगड खाल्ल्याने पोट फुगल्यासारखे वाटते का?

हे व्यक्तीनुसार बदलते आणि तुम्ही किती कलिंगड खाता यावर अवलंबून असते. पण, या विशिष्ट एका बातमीमुळे कोणत्या पदार्थाबरोबर खावं की खाऊ नये यावर चर्चा करणं योग्य नाही.

कलिंगड खाणं सर्वांसाठीच वाईट आहे का?

डॉक्टर सांगतात, कलिंगड खाणं सर्वांसाठीच वाईट आहे, असं बोलणं मुळात चुकीचं आहे. उन्हाळ्यात कलिंगड शरीराला थंडावा देतं. पण, आता गोष्टी आधीसारख्या राहिल्या नाहीत. आता कलिंगड कुठून येत आहे, रंगासाठी त्यात काय इंजेक्शन दिले जात आहे हे आपल्याला माहीत असायला हवे आणि यासाठी नियामक मार्गदर्शक तत्त्वे असणे आवश्यक आहे.

कलिंगड बाजारातून विकत घेतल्यानंतर काय काळजी घ्यावी?

बाजारातून कलिंगड विकत घेतल्यावर ते घरी आल्यानंतर नीट धुवून आणि कापून घ्यावे.

बाहेरून कलिंगड पूर्णपणे धुवून घ्या. कापल्यानंतर बघा की, त्याचा कोणताही भाग खराब झाला आहे का किंवा सडलेला आहे का?

कलिंगडाच्या आतील पोत (texture) बिघडलेला आहे का ते पाहा. जर तो गुळगुळीत नसेल किंवा एखादा भाग खूप पातळ किंवा मऊ (पचपचित) झाला असेल तर तो खाऊ नका, तो फेकून द्या.