Mustard Oil vs Peanut Oil vs Refined Oil Which Is Healthier: स्वयंपाकघरात तेलाशिवाय अनेक पदार्थांची कल्पनाच करता येत नाही. पोळी-भाजीपासून ते तळलेल्या पदार्थांपर्यंत रोजच्या आहारात तेलाचा वापर होतो. मात्र, बाजारात तेलाचे अनेक पर्याय उपलब्ध असल्याने नेमकं कोणतं तेल वापरावं हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. काही घरांमध्ये मोहरीचं तेल वापरलं जातं, तर काही ठिकाणी शेंगदाण्याचं तेल पसंत केलं जातं. अनेक जण स्वयंपाकासाठी रिफाइंड तेलाचा वापर करतात.

तेलाचा प्रकारच नव्हे, तर त्याचे प्रमाण आणि वापरण्याची पद्धतही आरोग्यासाठी महत्त्वाची असते, त्यामुळे मोहरीचं तेल, शेंगदाण्याचं तेल आणि रिफाइंड तेल या तिन्हीपैकी तुलनेने कमी हानिकारक पर्याय कोणता, असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. याबाबत तज्ज्ञांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्यामुळे पुढच्या वेळी स्वयंपाकाचं तेल खरेदी करण्यापूर्वी ही माहिती नक्की जाणून घ्या.

तज्ज्ञ काय सांगतात?

AIIMSशी संबंधित हृदय व रक्तवाहिन्यांच्या विकारांवरील तज्ज्ञ डॉ. अमरिंदर सिंह मल्ही यांच्या मते, तेलाची निवड करताना त्यावर किती प्रक्रिया करण्यात आली आहे आणि त्याचा आहारात किती प्रमाणात वापर केला जातो हे महत्त्वाचे आहे. त्यांच्या मते, योग्य प्रकारे निवड करून आणि तेलाचा मर्यादित वापर केल्यास कोल्ड-प्रेस्ड मोहरीचं तेल किंवा शेंगदाण्याचं तेल हे तुलनेने कमी प्रक्रिया केलेले पर्याय ठरू शकतात.

डॉ. अमरिंदर सिंह मल्ही सांगतात, ‘मोहरी आणि शेंगदाण्याचं तेल पारंपरिक पद्धतीने तयार केलं जाऊ शकतं आणि त्यांच्यावर रिफाइंड तेलाच्या तुलनेत कमी प्रक्रिया केली जाते. रिफाइंड तेल तयार करताना अधिक प्रक्रिया केली जाते, त्यामुळे तेल निवडताना त्याचा प्रकार, प्रक्रिया आणि प्रमाण या तिन्ही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे.’

मात्र, याचा अर्थ कोणतेही तेल अमर्याद प्रमाणात वापरता येते असा होत नाही. कोणत्याही प्रकारच्या तेलाचा अतिरेक आहारासाठी योग्य मानला जात नाही.

मोहरीचं तेल का ठरू शकतं पर्याय?

मोहरीच्या तेलामध्ये असंतृप्त मेदाम्ले आढळतात. त्यामध्ये ओमेगा-३ आणि ओमेगा-६ या फॅटी ॲसिड्सचाही समावेश असतो. योग्य प्रमाणात घेतलेले असंतृप्त मेदाम्ले संतुलित आहाराचा भाग ठरू शकतात.

मोहरीच्या तेलामध्ये काही नैसर्गिक घटक आणि अँटीऑक्सिडंट्सही असतात, त्यामुळे पारंपरिक स्वयंपाकात या तेलाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र, हृदयाचे आरोग्य, वजन किंवा इतर कोणत्याही आजारासाठी केवळ एका तेलावर अवलंबून राहणे योग्य नाही.

शेंगदाण्याचं तेल कसं वेगळं?

शेंगदाण्याच्या तेलामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड म्हणजेच असंतृप्त मेदाम्ले आढळतात. हे मेदाम्ले आहारातील चरबीचा तुलनेने चांगला पर्याय मानले जातात.

याशिवाय शेंगदाण्याच्या तेलामध्ये जीवनसत्त्व ई आढळते. जीवनसत्त्व ई हे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते, त्यामुळे शरीरातील पेशींना मुक्त कणांमुळे होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह ताणापासून संरक्षण देण्यामध्ये त्याची भूमिका असते.

शेंगदाण्याच्या तेलातील असंतृप्त मेदाम्लांचा आहारातील चरबीचा भाग म्हणून वापर केल्यास रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. मात्र, त्यासाठी संपूर्ण आहार संतुलित असणे आवश्यक आहे.

मग रिफाइंड तेलाचं काय?

रिफाइंड तेलावर उत्पादनाच्या प्रक्रियेत विविध टप्प्यांमधून प्रक्रिया केली जाते, त्यामुळे तेलाचा प्रकार निवडताना त्याची निर्मिती प्रक्रिया आणि पोषणमूल्य लक्षात घेणं महत्त्वाचं ठरतं.

तज्ज्ञांच्या मते, केवळ एखाद्या तेलाला आरोग्यदायी किंवा हानिकारक असा ठपका लावण्यापेक्षा आहारातील एकूण चरबीचं प्रमाण, तेलाचा वापर आणि स्वयंपाकाची पद्धत याकडे लक्ष देणं अधिक महत्त्वाचं आहे.

तेल निवडताना काय लक्षात ठेवावं?

मोहरीचं तेल असो, शेंगदाण्याचं तेल असो किंवा रिफाइंड तेल – तेलाचा वापर मर्यादित असणं सर्वांत महत्त्वाचं आहे. वारंवार एकाच तेलात पदार्थ तळणं टाळावं.

तुमच्या आहारानुसार योग्य तेलाची निवड करण्यासाठी आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणं अधिक योग्य ठरू शकतं. विशेषतः हृदयविकार, मधुमेह, वाढलेलं कोलेस्ट्रॉल किंवा इतर आरोग्यविषयक समस्या असल्यास आहारात बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

थोडक्यात सांगायचं तर मोहरीचं आणि शेंगदाण्याचं तेल हे कमी प्रक्रिया केलेल्या स्वरूपात वापरले जात असल्यास तुलनेने चांगले पर्याय ठरू शकतात. मात्र, कोणतेही तेल किती प्रमाणात आणि कशा पद्धतीने वापरले जाते यालाही तितकेच महत्त्व आहे.