Mutton vs Fish Which Is Healthier? Nutrition, Calories and Benefits: मटण आणि मासे हे दोन्ही पदार्थ अनेकांच्या आवडीचे आहेत. रविवार असो किंवा एखादा खास प्रसंग, अनेकांच्या जेवणात या दोन्ही पदार्थांना विशेष स्थान असते. मात्र, चवीपलीकडे जाऊन विचार केला तर मटण आणि मासे यांपैकी शरीरासाठी अधिक फायदेशीर कोणते? कोणत्या पदार्थातून जास्त प्रथिने मिळतात? हृदयाच्या आरोग्यासाठी कोणता पर्याय चांगला आणि कोणत्या पदार्थाचे पचन होण्यासाठी अधिक वेळ लागतो? जाणून घेऊया दोन्ही पदार्थांमधील महत्त्वाचा फरक.

१. कॅलरीच्या बाबतीत कोणता पदार्थ पुढे?

वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींसाठी अन्नपदार्थांमधील कॅलरींचे प्रमाण महत्त्वाचे असते. मटण आणि मासे यांच्यातील कॅलरींचे प्रमाण त्यांच्या प्रकारावर, मांसाच्या तुकड्यावर आणि शिजवण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते.

साधारणपणे १०० ग्रॅम कमी चरबीयुक्त माशांमधून ९० ते १३० कॅलरी मिळतात, तर अधिक चरबी असलेल्या काही माशांमध्ये हे प्रमाण १८० ते २१० कॅलरींपर्यंत जाऊ शकते.

दुसरीकडे, १०० ग्रॅम मटणातून साधारणपणे २३० ते २६० किंवा त्याहून अधिक कॅलरी मिळू शकतात. मटणातील चरबीचे प्रमाण अधिक असल्यामुळे त्यातून मिळणाऱ्या ऊर्जेचे प्रमाणही वाढते, त्यामुळे कमी कॅलरी असलेला आहार घ्यायचा असल्यास कमी चरबीयुक्त मासे हा चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र, मटण पूर्णपणे टाळण्याची गरज नाही. त्याचे प्रमाण आणि सेवनाची वारंवारता महत्त्वाची आहे.

२. हृदयाच्या आरोग्यासाठी मासे की मटण?

या दोन्ही पदार्थांमधील सर्वांत महत्त्वाचा फरक त्यांच्या चरबीच्या प्रकारात आहे.

माशांमध्ये ओमेगा-३ (Omega-3) हे आरोग्यासाठी उपयुक्त मानले जाणारे स्निग्ध आम्ल आढळते. विशेषतः रावस, बांगडा, सार्डिन आणि सॅल्मन यांसारख्या चरबीयुक्त माशांमध्ये त्याचे प्रमाण चांगले असते. ओमेगा-३ शरीरातील ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकते. तसेच हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठीही ते महत्त्वाचे आहे.

याउलट, मटणामध्ये संपृक्त चरबीचे (Saturated Fat) प्रमाण तुलनेने अधिक असू शकते. अशा चरबीचे अतिसेवन केल्यास रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे हृदयविकाराचा धोका असलेल्या व्यक्तींनी मटणाच्या सेवनाबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

३. संशोधनातून काय समोर आले?

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या २०२० मधील एका संशोधन आढाव्यात माशांचे सेवन आणि आरोग्य यांचा अभ्यास करण्यात आला होता.

या आढाव्यात २९८ संभाव्य दीर्घकालीन अभ्यासांमधील माहितीचे विश्लेषण करण्यात आले. त्यानुसार नियमित माशांचे सेवन आणि हृदयविकाराचा कमी धोका यांच्यात संबंध आढळला. विशेषतः माशांच्या सेवनामुळे हृदयविकाराशी संबंधित मृत्यूचा धोका कमी असण्याची शक्यता संशोधनातून व्यक्त करण्यात आली.

मात्र, हा निरीक्षणात्मक अभ्यास असल्यामुळे केवळ मासे खाल्ल्याने हृदयविकार टळतो, असा निष्कर्ष काढता येत नाही. एकूण आहार आणि जीवनशैलीदेखील महत्त्वाची असते.

४. प्रथिने आणि ताकदीसाठी काय निवडावे?

शरीरातील स्नायूंची वाढ, त्यांची दुरुस्ती आणि रोगप्रतिकारशक्ती टिकवण्यासाठी प्रथिनांची आवश्यकता असते. मटण आणि मासे हे दोन्ही प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत.

साधारणपणे १०० ग्रॅम माशांमधून २० ते २५ ग्रॅम प्रथिने मिळू शकतात, तर मटणातूनही चांगल्या प्रमाणात प्रथिने मिळतात. त्याशिवाय मटणामध्ये लोह, जस्त आणि जीवनसत्त्व बी१२ यांसारखे पोषक घटक असतात, त्यामुळे शरीराला आवश्यक असलेल्या विविध पोषक घटकांची पूर्तता करण्यासाठी मटणाचाही आहारात समावेश करता येतो.

५. पचनाच्या दृष्टीने कोणता पदार्थ हलका?

मटण आणि मासे खाल्ल्यानंतर पोटाला जाणवणारा फरकही महत्त्वाचा आहे. माशांचे मांस तुलनेने मऊ असल्यामुळे ते अनेकांना पचायला हलके वाटते. मात्र, माशांचा प्रकार, काटे, शिजवण्याची पद्धत आणि मसाल्यांचे प्रमाण यांचाही पचनावर परिणाम होतो.

मटणामध्ये चरबीचे प्रमाण अधिक असल्यास त्याचे पचन होण्यासाठी तुलनेने अधिक वेळ लागू शकतो. विशेषतः तेलकट मसालेदार मटण खाल्ल्यानंतर काही व्यक्तींना पोट जड होणे, अपचन किंवा अस्वस्थता जाणवू शकते.

मग मटण खावे की मासे?

एकूणच पाहता, हृदयाचे आरोग्य, ओमेगा-३ आणि तुलनेने कमी कॅलरी यांचा विचार केल्यास कमी चरबीयुक्त मासे किंवा ओमेगा-३ मुबलक असलेले मासे आहारात समाविष्ट करणे फायदेशीर ठरू शकते; तर मटणातून प्रथिने, लोह, जस्त आणि जीवनसत्त्व बी१२ मिळते.

त्यामुळे दोन्ही पदार्थांचे स्वतःचे फायदे आहेत. मात्र, मटणाचे सेवन मर्यादित ठेवणे आणि माशांचा आहारात नियमित समावेश करणे हा संतुलित आहाराचा चांगला भाग ठरू शकतो. मासे आणि मटण तळण्याऐवजी वाफवून, भाजून किंवा कमी तेलात शिजवून खाणे अधिक योग्य ठरते.

थोडक्यात सांगायचे तर केवळ चव पाहून नाही, तर शरीराची गरज, आहाराचे प्रमाण आणि आरोग्याची स्थिती लक्षात घेऊन मटण किंवा मासे यांची निवड करणे महत्त्वाचे आहे.

(टीप : वरील कॅलरी आणि पोषणमूल्ये साधारण अंदाज आहेत. माशांचा प्रकार, मटणाचा तुकडा आणि स्वयंपाकाची पद्धत यांनुसार त्यात बदल होऊ शकतो. ही माहिती सामान्य जनजागृतीसाठी असून वैयक्तिक आहारविषयक सल्ल्यासाठी आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)