Nails and Health: आपण बहुतेक लोक नखांकडे फक्त सौंदर्याच्या दृष्टीने पाहतो. काहीजण नखांना नेलपेंट लावतात, काही नख कापून अगदी नीट नेटके ठेवतात, तर काही त्यावर खोटी नखे लावून डिझाइन काढतात. पण तुम्हाला माहिती आहे का की नखे फक्त सजावटीसाठी नसतात, तर ती आपल्या आरोग्याचंही प्रतिबिंब असतात. डॉक्टर आणि आरोग्यतज्ज्ञांच्या मते, नखांचा रंग, पोत आणि आकार यावरून शरीरात चालू असलेल्या काही आजारांची माहिती मिळू शकते.

कधी कधी हृदय, फुफ्फुस, यकृत, थायरॉइड किंवा अगदी कॅन्सरसारख्या गंभीर आजारांची सुरुवातीची लक्षणेही नखांमधील बदलांमधून दिसू लागतात. जर नखांचा रंग अचानक बदलला, त्यावर विचित्र डाग दिसू लागले, किंवा नखे जाड, सहज तुटणारी किंवा सुजलेली वाटू लागली, तर त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. म्हणूनच, नखांमध्ये दिसणारे हे बदल कोणत्या आजारांकडे इशारा करतात, ते जाणून घेऊया.

नखांवरून आरोग्याची स्थिती कशी ओळखावी?

पिवळी नखे: जर तुमची नखे पिवळी दिसू लागली असतील, तर त्यामागे सर्वात सामान्य कारण बुरशीचा संसर्ग (फंगल इन्फेक्शन) असू शकतो. अशा वेळी नखे हळूहळू जाड होतात, कमकुवत होतात आणि सहज तुटू लागतात. मात्र काही प्रकरणांमध्ये पिवळी नखे थायरॉइडचा आजार, फुफ्फुसांचे विकार, सोरायसिस किंवा मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांचेही लक्षण असू शकतात. जर नखे बराच काळ पिवळीच राहिली, तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

पांढरी नखे किंवा पांढरे डाग: नखांवर पांढरे डाग दिसणे ही एक सामान्य समस्या आहे. वैद्यकीय भाषेत याला ल्यूकोनिशिया असे म्हणतात. बहुतेक वेळा नखांना हलकी इजा होणे, अ‍ॅलर्जी किंवा एखाद्या संसर्गामुळे हे डाग दिसतात. काही वेळा औषधांचे साइड इफेक्ट किंवा शरीरात पोषक घटकांची कमतरता असल्याचाही हा संकेत असू शकतो. जर पांढरे डाग वारंवार दिसत असतील किंवा संपूर्ण नखच पांढरे होत असतील, तर तपासणी करून घेणे गरजेचे आहे.

निळी नखे: जर तुमची नखे निळसर किंवा जांभळ्या रंगाची दिसू लागली, तर हे शरीरात ऑक्सिजनची कमतरता असल्याचं लक्षण असू शकतं. अशी अवस्था हृदय किंवा फुफ्फुसांशी संबंधित आजारांकडे इशारा करते. याशिवाय निळी नखे विल्सन आजार, चांदीची विषबाधा किंवा व्हिटॅमिन B12 ची कमतरता यामुळेही होऊ शकतात. हा एक गंभीर संकेत असून त्याकडे दुर्लक्ष करू नये.

नखांवर गडद लाल अर्धचंद्र

साधारणपणे नखांच्या मुळाशी हलका पांढरा अर्धचंद्र दिसतो. पण जर तो गडद लाल रंगाचा दिसू लागला, तर सावध होणे गरजेचे आहे. अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजी (AAD) नुसार, हे ल्युपस, हृदयविकार किंवा संधिवात (आर्थरायटिस) यांसारख्या आजारांचे लक्षण असू शकते. अशा वेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

नखांभोवती सूज (Swollen Nail Folds)

जर नखांच्या आजूबाजूची त्वचा लाल झाली, सुजली आणि दुखायला लागली, तर या स्थितीला क्रॉनिक पॅरोनिशिया असे म्हणतात. ही समस्या बहुतेक वेळा अ‍ॅलर्जी, सतत ओलसर वातावरणात राहणे किंवा बुरशीच्या संसर्गामुळे होते. वेळेवर उपचार न केल्यास ही समस्या गंभीर होऊ शकते. साधारणपणे यावर औषधे आणि क्रीमच्या मदतीने उपचार केले जातात.

नखांचे क्लबिंग (Clubbing of Nails)

जेव्हा नखे रुंद, गोल आणि स्पंजसारखी मऊ होतात, तेव्हा या अवस्थेला नखांचे क्लबिंग असे म्हणतात. नखांचे क्लबिंग साधारणपणे दीर्घकाळापासून सुरू असलेल्या आजारांचे लक्षण असते, जसे की फुफ्फुसांचा कर्करोग, हृदयविकार किंवा फुफ्फुसांचे गंभीर आजार.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)