Nana Patekar Death: Cardiac Arrest Symptoms & CPR: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या बातमीने चित्रपटसृष्टीसह त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी त्यांना गंभीर ‘कार्डियाक अरेस्ट’ आला. त्यानंतर त्यांना मणिपाल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी जवळपास ४५ मिनिटे त्यांना CPR देऊन वाचवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली; मात्र त्यांना यश मिळू शकले नाही. सकाळी सुमारे ५.२० वाजता त्यांच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली. मणिपाल हॉस्पिटलचे डॉक्टर शेखर सालकर यांनी ही माहिती दिली आहे.
या घटनेनंतर ‘कार्डिअॅक अरेस्ट‘ नेमका काय असतो, तो हार्ट अटॅकपेक्षा कसा वेगळा आहे आणि एखादी व्यक्ती अचानक बेशुद्ध पडल्यास आसपासच्या व्यक्तींनी काय करावे, याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. कार्डियाक अरेस्ट ही अत्यंत गंभीर आणि जीवघेणी स्थिती आहे. अशा वेळी वेळ वाया न घालवता, तातडीने वैद्यकीय मदत मिळणे आणि योग्य पद्धतीने CPR सुरू होणे महत्त्वाचे ठरते.
हार्ट अटॅक आणि कार्डिअॅक अरेस्ट एकच नाहीत!
हार्ट अटॅक आणि कार्डिअॅक अरेस्ट हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. हार्ट अटॅकच्या वेळी हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे हृदयाच्या स्नायूंना पुरेशा प्रमाणात रक्त आणि ऑक्सिजन मिळत नाही. मात्र, कार्डियाक अरेस्टमध्ये हृदयाचे ठोके नियंत्रित करणाऱ्या विद्युत यंत्रणेत अचानक बिघाड निर्माण होतो आणि त्यामुळे हृदयाचे प्रभावीपणे रक्त पंप करण्याचे कार्य थांबते.
मुंबई सेंट्रल येथील वॉक्हार्ट हॉस्पिटल्सचे कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. परिन संगोई यांनी कार्डिअॅक अरेस्ट आणि हार्ट अटॅकमधील फरक स्पष्ट केला आहे. ते सांगतात, “कार्डियाक अरेस्ट हा विद्युत क्रियेशी संबंधित विकारामुळे होतो. त्यामुळे हृदयाची प्रभावी धडधड थांबते आणि मेंदू, तसेच शरीरातील इतर अवयवांना होणारा रक्तपुरवठा खंडित होतो.”
हार्ट अटॅक आलेली व्यक्ती अनेकदा शुद्धीत असू शकते आणि तिचा श्वास सुरू असतो. मात्र, कार्डिअॅक अरेस्टमध्ये व्यक्ती अचानक कोसळू शकते, बेशुद्ध होऊ शकते आणि सामान्यपणे श्वास घेणे थांबू शकते. विशेष म्हणजे गंभीर हार्ट अटॅकमुळे काही वेळा कार्डियाक अरेस्टही होऊ शकतो. त्यामुळे दोन्ही स्थिती वेगळ्या असल्या तरी त्यांच्यात परस्परसंबंध असू शकतो.
करू नका ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष
कार्डिअॅक अरेस्ट अनेकदा अचानक होतो. व्यक्ती अचानक जमिनीवर कोसळणे, प्रतिसाद न देणे, शुद्ध हरपणे आणि न घेऊ शकणे ही त्याची महत्त्वाची चिन्हे आहेत. काही लोकांमध्ये त्याआधी छातीत दुखणे किंवा दडपण जाणवणे, धाप लागणे, चक्कर येणे, असामान्य थकवा किंवा हृदयाची धडधड अनियमित होणे, अशी लक्षणे दिसू शकतात. मात्र, प्रत्येक वेळी आधीपासून अशी लक्षणे दिसतीलच, असे नाही.
याच कारणामुळे अचानक एखादी व्यक्ती बेशुद्ध पडली आणि ती सामान्यपणे श्वास घेत नसल्याचे जाणवले, तर “थोड्या वेळाने ठीक होईल” म्हणून वाट पाहणे धोकादायक ठरू शकते. अशा वेळी तातडीने आपत्कालीन वैद्यकीय मदत मिळवून देणे गरजेचे ठरते.
CPR म्हणजे काय आणि तो इतका महत्त्वाचा का?
कार्डिअॅक अरेस्टच्या वेळी हृदय रक्त पंप करत नसल्यामुळे मेंदू आणि इतर महत्त्वाच्या अवयवांना ऑक्सिजनयुक्त रक्त मिळत नाही. अशा वेळी वैद्यकीय मदत येईपर्यंत CPR म्हणजेच कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन सुरू करणे महत्त्वाचे ठरू शकते.
कार्डिओव्हॅस्क्युलर अँड थोरॅसिक सर्जन डॉ. स्वरूप स्वराज पाल यांच्या मते, कार्डिअॅक अरेस्टच्या प्रसंगी “प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असते.” त्यामुळे व्यक्ती बेशुद्ध पडल्याचे लक्षात येताच मदत मागविणे आणि योग्य पद्धतीने CPR सुरू करणे यात अजिबात विलंब करू नये.
CPR देताना छातीवर दाब कसा द्यायचा?
व्यक्तीला पाठीवर सपाट आणि कडक पृष्ठभागावर झोपवावे. छातीच्या मध्यभागी एका हाताच्या तळहाताची बाजू ठेवून, त्यावर दुसरा हात ठेवावा. कोपरे सरळ ठेवून छातीवर वेगाने आणि ठामपणे दाब द्यावा. प्रौढ व्यक्तीसाठी साधारणपणे एका मिनिटात १०० ते १२० वेळा छातीवर दाब देण्याची शिफारस केली जाते. प्रत्येक दाबानंतर छातीला पुन्हा पूर्वस्थितीत येऊ द्यावे.
CPR चे योग्य प्रशिक्षण घेतले असल्यास छातीवर ३० वेळा दाब दिल्यानंतर दोन श्वास देण्याची पद्धत वापरता येते. मात्र, प्रशिक्षण नसल्यास किंवा तोंडातून श्वास देणे शक्य नसल्यास केवळ छातीवर दाब देत राहण्यामुळेही मदत मिळू शकते. वैद्यकीय पथक येईपर्यंत किंवा व्यक्ती सामान्यपणे श्वास घेऊ लागेपर्यंत प्रयत्न सुरू ठेवणे महत्त्वाचे आहे.
AED मशीनही ठरू शकते महत्त्वाची
कार्डिअॅक अरेस्टच्या प्रसंगी उपलब्ध असल्यास AED म्हणजेच ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर वापरला जाऊ शकतो. हे उपकरण हृदयाची लय तपासते आणि आवश्यक असल्यास विद्युत धक्का देण्याची प्रक्रिया मार्गदर्शित करते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी किंवा इमारतींमध्ये AED उपलब्ध असल्यास त्याचा योग्य पद्धतीने वापर करण्याचे प्रशिक्षण उपयुक्त ठरू शकते.
नाना पाटेकर यांना वाचविण्यासाठी डॉक्टरांनी जवळपास ४५ मिनिटे CPR द्वारे प्रयत्न केले; मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. मात्र, या घटनेच्या निमित्ताने कार्डिअॅक अरेस्टची चिन्हे ओळखणे, हार्ट अटॅक व कार्डिअॅक अरेस्टमधील फरक समजून घेणे आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य वेळी CPR सुरू करण्याचे महत्त्व प्रत्येकाने जाणून घेणे गरजेचे आहे.
