Nana Patekar Death Heart Attack Despite Fitness: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज पहाटे कार्डिअॅक अरेस्टने निधन झाले. वयाच्या ७५ व्या वर्षीही ते फिटनेसबाबत जागरूक होते आणि नियमितपणे व्यायाम करीत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांचा वर्कआऊट करतानाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र, फिट आणि सक्रिय जीवनशैली असूनही अनेकदा कार्डिअॅक अरेस्ट आणि हार्ट अटॅकचा धोका असतो. असे नेमके का होते ते जाणून घेऊया…
नियमित व्यायाम आणि फिट राहण्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो, हे सर्वांना माहीत आहे. मात्र, त्यामुळे एखादी व्यक्ती हृदयविकारापासून पूर्णपणे सुरक्षित राहतेच, असे नाही.
तरुण आणि तंदुरुस्त असलेल्या व्यक्तींना क्वचितच कार्डिअॅक अरेस्ट किंवा हार्ट अटॅक येतो. मात्र, न्यूरोलॉजिस्ट डॉ. राहुल चावला यांनी इन्स्टाग्रामवर सांगितले की, नियमित व्यायाम करूनही किंवा फिट असलेल्या लोकांनाही हृदयविकाराचा धोका असू शकतो. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करीत डॉक्टरांनी अशा घटनांना कारणीभूत ठरू शकणारे पाच लपलेल्या धोक्यांची माहिती दिली आहेत.
१. आनुवंशिक कारणे
आनुवंशिकता हे एक असं कारण आहे, ज्यामुळे काही व्यक्तींना इतरांच्या तुलनेत हृदयाशी संबंधित आजारांचा धोका जास्त असतो. डॉ. चावला यांच्या मते, “काही लोकांमध्ये लिपोप्रोटीन एची पातळी जास्त असणे किंवा कुटुंबातून आलेले उच्च कोलेस्ट्रॉल यांसारख्या समस्या असतात. त्यामुळे आरोग्यदायी जीवनशैली असतानाही हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचा थर वेगाने जमा होऊ शकतो.”
२. शरीरातील न दिसणारी चरबी
शरीरातील सर्व चरबी बाहेरून दिसत नाही, असा इशारा न्यूरोलॉजिस्टने दिला आहे. अनेक भारतीयांमध्ये ‘थिन-फॅट फेनोटाईप’ म्हणजेच व्यक्ती शरीराने बारीक दिसत असली तरी शरीरात जास्त चरबी असण्याची समस्या आढळते.
डॉ. चावला यांनी सांगितले, “शरीराचे वजन सामान्य असले तरी पोटाच्या आतील भागात जास्त चरबी, इन्सुलिन रेसिस्टन्स, ट्रायग्लिसराइड्सचे वाढलेले प्रमाण आणि मेटाबॉलिक सिंड्रोम असू शकतो. या सर्व गोष्टींमुळे कमी वयात हृदयविकाराचा धोका वाढतो.”
३. उपचार न केलेले आरोग्याशी संबंधित आजार
व्यायाम हृदयासाठी फायदेशीर आहे आणि नियमित व्यायाम केल्याने हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. मात्र, शरीरात आधीपासून असलेल्या आरोग्याच्या समस्यांपासून व्यायाम पूर्णपणे संरक्षण देऊ शकत नाही.
डॉ. चावला यांच्या म्हणण्यानुसार, “व्यायामामुळे अनियंत्रित मधुमेह, वाढलेले एलडीएल कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब किंवा आनुवंशिक धोके पूर्णपणे दूर होऊ शकत नाहीत. या समस्यांवर उपचार न केल्यास हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचा थर जमा होत राहू शकतो.”
४. शरीराची कार्यक्षमता वाढविण्यासाठी घेतली जाणारी औषधे
न्यूरोलॉजिस्टच्या मते, शरीराची कार्यक्षमता आणि स्नायू वाढविण्यासाठी घेतली जाणारी काही औषधे किंवा सप्लिमेंट्स फायद्यापेक्षा नुकसान जास्त करू शकतात.
ते म्हणाले, “ॲनाबॉलिक स्टेरॉइड्स आणि बॉडीबिल्डिंगसाठी घेतली जाणारी काही सप्लिमेंट्स एलडीएल कोलेस्ट्रॉल वाढवू शकतात, एचडीएल कोलेस्ट्रॉल कमी करू शकतात, हृदयाचे स्नायू मोठे होऊ शकतात आणि हृदयाच्या ठोक्यांमध्ये धोकादायक बदल होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढवू शकतात.”
५. हृदयाशी संबंधित लपलेल्या समस्या
“काही व्यक्तींमध्ये जन्मापासूनच हृदयाशी संबंधित समस्या असतात, ज्या सहजगत्या लक्षात येत नाहीत,” असे डॉ. चावला यांनी सांगितले.
“हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी, लाँग क्यूटी सिंड्रोम, ब्रुगाडा सिंड्रोम आणि हृदयाच्या रक्तवाहिन्यांशी संबंधित काही जन्मजात समस्या अनेकदा कोणतीही लक्षणे न दाखवता राहू शकतात. मात्र, जास्त शारीरिक मेहनत किंवा तीव्र व्यायाम केल्याने हृदयाच्या ठोक्यांवरील नियंत्रण अचानक धोकादायक पद्धतीने बिघडू शकते आणि त्यामुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.”
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
