Nana Patekar Smoking Habit Heart Risk:अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरूवारी कार्टिअॅक अरेस्टमुळे निधन झाले. वयाच्या ७५व्या वर्षी अगदी फिट असूनही अचानक निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर हृदयाच्या आरोग्याविषयी अनेक चर्चा होऊ लागल्या आहेत.यापैकी एक महत्त्वाची बाब महणजे धूम्रपान. नानांच्या धूम्रपानाच्या सवयीची चर्चा अनेकदा झाली आहे. वयाच्या साधारण ५६ वर्षांपर्यंत ते दिवसाला जवळपास ६० सिगारेट ओढत असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. मात्र, एका जवळच्या व्यक्तीने केलेल्या टिप्पणीमुळे त्यांनी धूम्रपान सोडण्याचा निर्णय घेतला. सिगारेट सोडण्याचा हा निर्णय आरोग्याच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे.
धूम्रपानाचा परिणाम केवळ फुफ्फुसांवरच होत नाही, तर हृदय, रक्तवाहिन्या आणि शरीरातील इतर महत्त्वाच्या अवयवांवरही होऊ शकतो. सिगारेटमधील निकोटीन आणि इतर हानिकारक रसायनांमुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि विविध प्रकारच्या कॅन्सरचा धोका वाढतो. त्यामुळे धूम्रपानाची सवय सोडणे हा आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय ठरू शकतो.
नाना पाटेकर यांना कशी लागली होती सिगारेटची सवय?
नाना पाटेकर यांनी एका मुलाखतीत त्यांच्या धूम्रपानाच्या सवयीबद्दल सांगितले होते. आयुष्यातील कठीण प्रसंग आणि मुलाच्या निधनानंतर आलेल्या मानसिक धक्क्यामुळे त्यांचे धूम्रपान वाढले होते. ते दिवसाला जवळपास ६० सिगारेट ओढत असत. सतत सिगारेट ओढल्यामुळे त्यांना खोकल्याचा त्रास होत असे. एकदा त्यांना खोकताना पाहून त्यांच्या जवळच्या व्यक्तीने, ‘अजून काय काय पाहायचे आहे?’ अशी प्रतिक्रिया दिली. या शब्दांचा त्यांच्या मनावर परिणाम झाला आणि त्यांनी सिगारेट सोडण्याचा निर्णय घेतला, असे सांगितले जाते.
धूम्रपान सोडण्याचा हा निर्णय महत्त्वाचा आहे. कारण सिगारेटचे व्यसन केवळ शारीरिक आरोग्यालाच नव्हे, तर व्यक्तीच्या दैनंदिन जीवनालाही प्रभावित करू शकते.
सिगारेट ओढल्याने शरीरात नेमके काय होते?
सिगारेटच्या धुरात निकोटीन, कार्बन मोनॉक्साइड आणि अनेक विषारी रसायने असतात. यातील काही रसायने कॅन्सरचा धोका वाढवतात. धूम्रपानाचा परिणाम शरीरातील अनेक अवयवांवर होऊ शकतो.
फुफ्फुसांचे नुकसान: सतत धूम्रपान केल्याने फुफ्फुसांचा कॅन्सर, सीओपीडी आणि श्वास घेण्यास त्रास होण्याचा धोका वाढतो.
हृदयविकाराचा धोका: सिगारेटमुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
रक्तदाब आणि हृदयाच्या ठोक्यांवर परिणाम: निकोटीनमुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढू शकतो.
कॅन्सरचा धोका: धूम्रपानामुळे फुफ्फुसांबरोबरच तोंड, घसा, अन्ननलिका आणि इतर अवयवांच्या कॅन्सरचा धोका वाढतो.
रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम: धूम्रपानामुळे शरीराची संसर्गाशी लढण्याची क्षमता प्रभावित होऊ शकते.
प्रजनन आरोग्यावर परिणाम: धूम्रपानामुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. गर्भावस्थेत धूम्रपान केल्यास गर्भाच्या विकासावरही प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते.
सिगारेटमुळे हार्ट अटॅक कसा येऊ शकतो?
धूम्रपान आणि हार्ट अटॅक यांचा जवळचा संबंध आहे. सिगारेटच्या धुरातील हानिकारक घटक रक्तवाहिन्यांच्या आतील थराला नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबीयुक्त थर म्हणजेच प्लाक जमा होण्याची प्रक्रिया वेग घेऊ शकते.
प्लाकमुळे रक्तवाहिन्या अरुंद झाल्यास हृदयापर्यंत पोहोचणाऱ्या रक्ताचा प्रवाह कमी होऊ शकतो. काही वेळा रक्ताची गुठळी तयार झाल्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा अचानक थांबू शकतो आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
सिगारेटच्या धुरातील कार्बन मोनॉक्साइडमुळे रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते. त्याचवेळी निकोटीनमुळे हृदयावर ताण वाढू शकतो. या दोन्ही गोष्टी हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरतात.
महत्त्वाचे म्हणजे, दिवसाला कमी सिगारेट ओढल्याने धोका पूर्णपणे टळत नाही. त्यामुळे सिगारेटची संख्या कमी करण्याबरोबरच ती पूर्णपणे सोडण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.
धूम्रपान सोडल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात?
सिगारेट सोडल्यानंतर शरीराला हळूहळू त्याचे फायदे मिळू लागतात. हे बदल प्रत्येक व्यक्तीत सारख्याच वेगाने होतील असे नाही; मात्र धूम्रपान सोडल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
पहिल्या १२ ते २४ तासांत: रक्तातील कार्बन मोनॉक्साइडचे प्रमाण कमी होऊ लागते.
काही आठवड्यांत: रक्ताभिसरण आणि फुफ्फुसांचे कार्य सुधारू लागते.
काही महिन्यांत: खोकला आणि धाप लागण्यासारख्या त्रासांमध्ये सुधारणा होऊ शकते.
एका वर्षानंतर: हार्ट अटॅकचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. कोरोनरी हृदयरोगाचा धोका धूम्रपान सुरू ठेवणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत साधारण निम्मा होऊ शकतो. हे फायदे मिळण्यासाठी कोणतेही वय उशिराचे नसते. अनेक वर्षे धूम्रपान केले असले तरी ते सोडल्याने आरोग्याला फायदा होऊ शकतो.
पॅसिव्ह स्मोकिंगही तितकेच धोकादायक
सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीच्या आसपास असलेल्या लोकांनाही धुराचा त्रास होऊ शकतो. याला पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतात. अशा धुराच्या संपर्कामुळे हृदयविकार, फुफ्फुसांचा कॅन्सर आणि श्वसनासंबंधी आजारांचा धोका वाढू शकतो.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, तंबाखूमुळे जगभरात दरवर्षी ८० लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. यामध्ये सुमारे १३ लाख मृत्यू हे स्वतः धूम्रपान न करणाऱ्या, पण इतरांच्या धुराच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचे असतात. त्यामुळे घरात किंवा बंद जागेत धूम्रपान करणे टाळणे आवश्यक आहे.
सिगारेटचे व्यसन सोडायचे असेल तर काय करावे?
निकोटीनमुळे सिगारेटची तीव्र इच्छा होऊ शकते. त्यामुळे धूम्रपान सोडताना अस्वस्थता, चिडचिड किंवा लक्ष केंद्रित करण्यात अडचण जाणवू शकते. अशा वेळी पुढील गोष्टी मदत करू शकतात.
- धूम्रपान सोडण्यासाठी एक निश्चित तारीख ठरवा.
- सिगारेटची इच्छा झाल्यास थोडे चालणे, पाणी पिणे किंवा दुसऱ्या कामात लक्ष गुंतवणे यांसारखे पर्याय वापरा.
- कुटुंबीय आणि मित्रांची मदत घ्या.
- गरज भासल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी किंवा इतर उपचारांचा विचार करा.
सिगारेट सोडणे सुरुवातीला कठीण वाटू शकते; मात्र योग्य मदत आणि उपचारांमुळे ही सवय सोडणे शक्य आहे. हृदय, फुफ्फुसे आणि संपूर्ण शरीराचे आरोग्य जपण्यासाठी धूम्रपानापासून दूर राहणे हाच सर्वात चांगला पर्याय आहे.
