Sudden Cardiac Arrest Warning Signs: अचानक हृदय बंद पडणे म्हणजेच सडन कार्डिअ‍ॅक अरेस्ट (SCA) ही अत्यंत गंभीर आणि जीवघेणी परिस्थिती आहे. कार्डिअ‍ॅक अरेस्ट कोणतीही पूर्वसूचना न देता होऊ शकतो, त्यामुळे त्याला ‘सडन’ म्हटलं जातं. मात्र, प्रत्येक वेळी हा प्रकार पूर्णपणे शांतपणे घडतोच असं नाही. काही व्यक्तींमध्ये हृदय बंद पडण्याच्या काही मिनिटे, तास किंवा कधी कधी काही दिवस आधी शरीर काही संकेत देऊ शकतं. हे संकेत वेळीच ओळखले, तर मदत मिळवण्यासाठी मिळणारा महत्त्वाचा वेळ वाचू शकतो.

मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्सचे कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. परिन संगोई यांनी दि इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, अचानक कार्डिअ‍ॅक अरेस्टमध्ये हृदय धोकादायक रिदममध्ये गेल्याने ते शरीरात प्रभावीपणे रक्त पंप करू शकत नाही. मात्र, काही रुग्णांमध्ये त्याआधी काही लक्षणे जाणवू शकतात.

कार्डिअ‍ॅक अरेस्टच्या आधी कोणती लक्षणे जाणवू शकतात?

काही लोकांना खालीलपैकी एक किंवा अनेक लक्षणे जाणवू शकतात.

  • छातीत अस्वस्थता किंवा दुखणे
  • अचानक किंवा अनाकलनीय श्वास घेण्यास त्रास
  • हृदय जोरात किंवा अनियमित धडधडणे
  • चक्कर येणे
  • बेशुद्ध पडल्यासारखं वाटणे
  • अचानक खूप थकवा जाणवणे
  • कारण नसताना घाम फुटणे
  • मळमळ किंवा अस्वस्थ वाटणे
  • छातीवर जडपणा जाणवणे

विशेष म्हणजे, ही लक्षणे अनेकदा सौम्य स्वरूपाची असू शकतात. त्यामुळे काही लोक त्याकडे अ‍ॅसिडिटी, चिंता, थकवा किंवा सामान्य अशक्तपणा म्हणून दुर्लक्ष करतात. पण शरीराकडून मिळणारे हे संकेत दुर्लक्षित करणं धोकादायक ठरू शकतं.

अचानक कार्डिअ‍ॅक अरेस्ट येण्याआधी प्रत्येकाला संकेत मिळतात का?

नाही. प्रत्येक व्यक्तीला आधी लक्षणे जाणवतीलच असं नाही. काही वेळा हृदयाच्या कार्यात अचानक गंभीर बिघाड झाल्यामुळे कोणतीही स्पष्ट पूर्वसूचना न देता व्यक्ती अचानक कोसळू शकते. म्हणूनच, लक्षणे नसतील तर धोका नाही, असं समजणं योग्य नाही.

तुम्ही घरात एकटे असाल तर मदतीसाठी वेळ मिळतो का?

हे परिस्थितीवर अवलंबून असतं. मात्र, तीव्र छातीत दुखणे, प्रचंड धाप लागणे, हृदयाची अनियमित धडधड, चक्कर किंवा बेशुद्ध पडल्यासारखं वाटणं अशी गंभीर लक्षणे सुरू झाली, तर मदत मागण्यासाठी एक क्षणही वाया घालवू नये. डॉ. संगोई यांच्या मते, अशा वेळी तातडीने आपत्कालीन मदत मागणं जीव वाचवण्यासाठी महत्त्वाचं ठरू शकतं. काही मिनिटांचा विलंबही परिस्थिती गंभीर करू शकतो.

कार्डिअ‍ॅक अरेस्ट झाल्यानंतर वेळ का इतका महत्त्वाचा?

एकदा व्यक्ती कार्डिअ‍ॅक अरेस्टमध्ये गेली आणि बेशुद्ध झाली, तर परिस्थिती अत्यंत गंभीर होते. हृदय रक्त पंप करत नसल्यामुळे मेंदूला ऑक्सिजनयुक्त रक्त मिळत नाही. रक्तपुरवठा बंद झाल्यानंतर साधारण ४ ते ६ मिनिटांत मेंदूला इजा होण्यास सुरुवात होऊ शकते. म्हणूनच कार्डिअ‍ॅक अरेस्टची लक्षणे ओळखणे, तातडीने आपत्कालीन मदत बोलावणे आणि गरज पडल्यास CPR सुरू करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

‘काहीतरी गडबड आहे’ असं वाटत असेल तर दुर्लक्ष करू नका

डॉ. संगोई सांगतात की, छातीत सतत दुखणे, अचानक घाम फुटणे, चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडण्यासारखं वाटणे यासारखी लक्षणे जाणवत असतील तर ती आपोआप कमी होतील म्हणून वाट पाहू नका. तुम्ही एकटे असाल तर तातडीने आपत्कालीन सेवांना फोन करा, शक्य असल्यास घराचा दरवाजा अनलॉक करा आणि जवळच्या व्यक्तीला परिस्थितीची माहिती द्या.

हृदयरोग, मधुमेह किंवा कुटुंबात अचानक हृदयविकारामुळे मृत्यूचा इतिहास असल्यास नियमित तपासणी आणि नवीन लक्षणांकडे वेळीच लक्ष देणं अधिक महत्त्वाचं ठरतं. प्रत्येक छातीत दुखणे किंवा धाप लागणे म्हणजे कार्डिअ‍ॅक अरेस्टची पूर्वसूचना असेलच असं नाही. मात्र, अचानक किंवा गंभीर लक्षणे जाणवल्यास स्वतः निदान करण्यापेक्षा तातडीने वैद्यकीय मदत घेणं सुरक्षित आहे.