National Science Day 2024: भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. हा दिवस भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रमण (सी. व्ही. रमण) यांनी लावलेल्या ‘रमन इफेक्ट’ च्या शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. देशाचे महान शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांनी आजच्या दिवशी जी किमया केली होती, त्यामुळे त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. दरवर्षी हा दिवस वेगळ्या थीमने साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे प्रेरित करणे आणि सर्वसामान्यांना विज्ञान आणि वैज्ञानिक कामगिरीची जाणीव करून देणे हा आहे. आज देशभरातील शाळा, महाविद्यालयांत विज्ञान दिन साजरा केला जातो. तुमच्याही मुलांना विज्ञानात रस असेल तर विज्ञान अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही त्यांना खालील विज्ञान संग्रहालयांत घेऊन जाऊ शकता.

‘या’ विज्ञान संग्रहालयांना भेट द्या!

विश्वेश्वरय्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान संग्रहालय, बेंगळुरू

बेंगळुरू येथील विश्वेश्वरय्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान संग्रहालय हे भारतातील सर्वात जुने विज्ञान संग्रहालय आहे. त्याची स्थापना १४ जुलै १९६२ रोजी झाली. अशा अनेक गोष्टी इथे मुलांसाठी उपलब्ध आहेत, ज्यामुळे त्यांची विज्ञानाची आवड आणखी वाढण्यास मदत होते. या संग्रहालयात सात प्रदर्शन हॉल आणि दोन विशेष प्रदर्शने आहेत. राईट ब्रदर्सने बांधलेली किट्टी हॉकची फुल स्केल प्रतिकृती येथील आकर्षणाचे केंद्र आहे. येथे येऊन मुले इतर मनोरंजक गोष्टी शोधू शकतात.

(हे ही वाचा: National Science Day 2024: आज पुन्हा जाऊ शाळेत! विज्ञानाचे ‘हे’ १० प्रश्न सोडवून पाहा )

राष्ट्रीय विज्ञान केंद्र, दिल्ली

दिल्लीतील नॅशनल सायन्स सेंटर हे विज्ञानात रुची असलेल्या मुलांसाठीही उत्तम ठिकाण आहे. या संग्रहालयात मुलांसाठी डायनासोर गॅलरी, फन सायन्स लायब्ररी, माहिती क्रांती गॅलरी, प्री-हिस्टोरिक गॅलरी, ह्युमन बायोलॉजी गॅलरी अशा अनेक गोष्टी आहेत. मन प्रफुल्लित करण्यासाठी थ्रीडी शो, मेज ऑफ मिरर्स, मोठ्या डायनासोरच्या बोलक्या आकृत्या आहेत; जे पाहणे खरोखर मजेदार आहे. या संग्रहालयाला भेट देणे एक अद्भुत अनुभव आहे.

बिर्ला विज्ञान संग्रहालय, हैदराबाद

तुम्ही आज मुलांना बिर्ला तारांगण आणि विज्ञान संग्रहालयात देखील घेऊन जाऊ शकता, जो त्यांच्यासाठी एक संस्मरणीय अनुभव असेल. हे केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील सर्वोत्तम विज्ञान संग्रहालयांपैकी एक आहे, जे हैदराबादमध्ये आहे. या संग्रहालयाची स्थापना २००० साली झाली. स्पेस म्युझियम हे येथील खास आकर्षण आहे. येथे आल्यावर तुम्ही १६० दशलक्ष जुने डायनासोरचे जीवाश्म पाहू शकता.

केरळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संग्रहालय, तिरुवनंतपूरम

केरळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संग्रहालय लोकांना विज्ञानाचे महत्त्व समजावे आणि त्यात रस घ्यावा, या उद्देशाने सुरू करण्यात आले. याची स्थापना केरळ सरकारने १९८४ मध्ये केली होती. जर तुम्ही तिरुवनंतपूरमला आलात तर या संग्रहालयाला भेट देण्याची संधी गमावू नका. केवळ विज्ञानच नाही तर गणित, ऑटोमोबाईल, बायो-मेडिकल इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर आणि सौरऊर्जा या विषयांसाठीही स्वतंत्र गॅलरी आहेत. संग्रहालयात तारांगण, सायन्स पार्क आणि किड्स पार्कदेखील आहे.

नेहरू विज्ञान संग्रहालय, मुंबई

मुंबईत असलेले नेहरू सायन्स म्युझियम हे मुलांच्या सहलीसाठीही उत्तम ठिकाण आहे. याशिवाय हे भारतातील प्रसिद्ध विज्ञान संग्रहालयांपैकी एक आहे. येथे येऊन मुले विज्ञानाशी संबंधित ५०० हून अधिक गोष्टी पाहू शकतात. त्यांच्याबद्दल जाणून घेऊ शकतात. या ठिकाणी ऐतिहासिक वैज्ञानिक वस्तू, उपकरणे यांचा संग्रह करण्यात आला आहे. येथे दररोज थ्रीडी आणि सायन्स ऑन स्फेअर शो आयोजित केले जातात. याशिवाय मुलांसाठी विज्ञानविषयक कार्यशाळाही आयोजित केल्या जातात.