Colon Cleanse Remedies: सकाळी उठल्यानंतर अनेकांना सर्वात मोठी चिंता असते ती म्हणजे पोट व्यवस्थित साफ होईल की नाही. बद्धकोष्ठता, पोटात वायू होणे, जडपणा जाणवणे आणि अपचन यांसारख्या समस्या केवळ दिवसभराचा मूडच खराब करत नाहीत, तर शरीरातील ऊर्जादेखील कमी करतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आतड्यांमध्ये साचलेला मल आणि अपशिष्ट पदार्थ दीर्घकाळ राहिल्यास पचनसंस्था कमकुवत होऊ शकते. इतकेच नव्हे, तर यामुळे इतर अनेक आरोग्यविषयक तक्रारी निर्माण होण्याचाही धोका वाढू शकतो.
बाजारात पोट साफ करण्यासाठी विविध औषधे आणि उत्पादने उपलब्ध असली, तरी काही नैसर्गिक आणि घरगुती उपायांच्या मदतीने आतड्यांची स्वच्छता राखणे शक्य आहे. जाणून घ्या असे ७ प्रभावी उपाय, जे आतड्यांना आतून स्वच्छ ठेवण्यास मदत करू शकतात.
पुरेसे पाणी पिणे सर्वात महत्त्वाचे
पचनसंस्था सुरळीत ठेवण्यासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे. दिवसभर पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने मल मऊ राहतो आणि तो सहज बाहेर पडण्यास मदत होते. विशेषतः सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे फायदेशीर मानले जाते. तसेच टरबूज, काकडी, टोमॅटो आणि अजमोदा ( Celery किंवा Parsley ही एक सुगंधी आणि बहुगुणी औषधी वनस्पती आहे. हिचे खोड, पाने आणि बिया यांचा वापर प्रामुख्याने मसाले, सूप आणि आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो)
यांसारख्या पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांचाही आहारात समावेश करावा.
खाऱ्या पाण्याचा उपाय ठरू शकतो उपयोगी
ज्यांना तीव्र बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, त्यांच्यासाठी खाऱ्या पाण्याचा उपाय मदत करू शकतो. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात थोडे समुद्री मीठ किंवा गुलाबी मीठ मिसळून प्यायल्यास शौचास होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होऊ शकते. मात्र, उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी हा उपाय वैद्यकीय सल्ल्याशिवाय करू नये.
तंतुमय आहार म्हणजे नैसर्गिक स्वच्छता
तंतुमय पदार्थ आतड्यांसाठी झाडूसारखे काम करतात. हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, संपूर्ण धान्ये, सुका मेवा आणि विविध बिया यांचा आहारात समावेश केल्यास आतड्यांतील साचलेले पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे बद्धकोष्ठतेपासूनही संरक्षण मिळू शकते.
रस आणि स्मूदींचा होऊ शकतो फायदा
फळे आणि भाज्यांपासून तयार केलेले ताजे रस पचनासाठी लाभदायक ठरू शकतात. मात्र, रसापेक्षा स्मूदी अधिक उपयुक्त मानली जाते, कारण त्यामध्ये तंतुमय घटक कायम राहतात. सफरचंद किंवा लिंबूपासून तयार केलेले पेयही पचनक्रियेला चालना देऊ शकते.
प्रतिरोधक स्टार्चचे महत्त्व
बटाटे, उकडलेला भात, कडधान्ये आणि कच्ची केळी यामध्ये प्रतिरोधक स्टार्च आढळतो. हा घटक तंतूप्रमाणे कार्य करतो आणि आतड्यांतील उपयुक्त जीवाणूंची वाढ होण्यास मदत करतो, त्यामुळे पचनसंस्थेचे आरोग्य सुधारू शकते.
प्रोबायोटिक पदार्थ ठरतात हितकारक
दही, ताक, लोणचे आणि काही आंबवलेले पदार्थ यामध्ये उपयुक्त जीवाणू असतात. हे जीवाणू अन्नपचन सुधारण्यास मदत करतात. तसेच पोटातील सूज आणि अस्वस्थता कमी करण्यासाठीही ते फायदेशीर मानले जातात.
हर्बल चहाने मिळू शकतो आराम
इसबगोल, कोरफड, आले, लसूण आणि काही औषधी वनस्पतींपासून तयार केलेले हर्बल पेय पचनक्रिया सुधारण्यास मदत करू शकतात. यामधील नैसर्गिक घटक आतड्यांतील हानिकारक जीवाणूंवर नियंत्रण ठेवण्यास सहाय्यक ठरतात. मात्र, अशा पेयांचे सेवन मर्यादित प्रमाणातच करणे आवश्यक आहे.
पोटाच्या समस्या दुर्लक्षित करणे धोकादायक ठरू शकते. योग्य आहार, पुरेसे पाणी आणि निरोगी जीवनशैली यांचा अवलंब केल्यास पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होऊ शकते. दररोजच्या छोट्या सवयी बदलल्यास आतड्यांची स्वच्छता राखणे आणि पोट हलके ठेवणे अधिक सोपे होऊ शकते.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
