Top Healthy Sweetener Options : साखर आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. पण, तिच्या अतिसेवनामुळे वजन वाढणे, मधुमेह आणि इतर अनेक आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे उत्तम आरोग्य आणि फिटनेस राखण्यासाठी आपल्यापैकी अनेक जण साखरेऐवजी आरोग्यदायी पर्याय शोधत आहेत. गूळ, मध आणि स्टीव्हिया यांसारखे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध असतात ज्यांना अनेकदा “आरोग्यदायी गोड पदार्थ” म्हणून ओळखले जाते. पण, साखरेऐवजी गूळ किंवा मधाचा वापर केल्याने कॅलरी आणि रक्तातील साखरेच्या पातळीवर काही परिणाम होतो का? स्टीव्हियासारखे वनस्पती-आधारित गोड पदार्थ दररोज सेवन करण्यासाठी सुरक्षित आहेत का? याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतात त्याबद्दलची उत्तरे आज आपण बातमीतून जाणून घेऊयात.

भारतीय योगगुरू, लेखिका, संशोधिका आणि टीव्ही व्यक्तिमत्व डॉक्टर हंसा योगेंद्र स्पष्ट करतात की, प्रत्येक नैसर्गिक किंवा कृत्रिम गोड पदार्थाचे परिणाम शरीराची चयापचय क्रिया आणि ग्लायसेमिक इंडेक्स (GI) यावर अवलंबून वेगवेगळे असतात. उदाहरणार्थ, गुळामध्ये खनिजे असतात. पण, त्यात साखरेइतक्याच कॅलरीज असतात. तर स्टीव्हिया कॅलरी-मुक्त असूनही, प्रत्येकाच्या पचनसंस्थेसाठी योग्य नाही.

तर मग जाणून घेऊया की साखर, गूळ, मध आणि स्टीव्हिया यांपैकी कोणता पर्याय अधिक चांगला आहे.

साखर

साखरेला डॉक्टरांनी १० पैकी १ रेटिंग दिले आहे. हा गोड पदार्थ अत्यंत शुद्ध केलेला असतो आणि त्यामुळे रक्तातील साखर वेगाने वाढू शकते. या शुद्ध साखरेच्या सेवनाने शरीराला कोणताही फायदा होत नाही. शुद्ध साखरेवर अनेक प्रक्रिया केल्या जातात. त्यात प्रामुख्याने सुक्रोज असते. त्यात फायबर, जीवनसत्त्वे किंवा खनिजे यांसारखे पोषक घटक खूप कमी प्रमाणात असतात. या साखरेच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढते. एका निरोगी व्यक्तीसाठी, नियमितपणे मोठ्या प्रमाणात साखरेचे सेवन केल्याने शरीरात अतिरिक्त कॅलरीज वाढतात, ज्यामुळे वजन वाढू शकते. पांढऱ्या साखरेच्या नियमित सेवनामुळे देखील रक्तातील साखरेची पातळी वाढते.

गूळ आणि मध

गूळ आणि मधाला १० पैकी ५ रेटिंग दिले आहे. गुळावर पांढऱ्या साखरेपेक्षा कमी प्रक्रिया केली जाते. त्यात लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारख्या काही खनिजांचे अल्प प्रमाण असते. पण, हे पोषक घटक पोषणाचा प्रमुख स्रोत मानण्याइतके पुरेसे नाहीत. गुळामध्ये देखील प्रामुख्याने साखर आणि कॅलरीज असतात. त्यामुळे, साखरेला चांगला पर्याय आहे असे समजून त्याचे मोठ्या प्रमाणात सेवन करणे योग्य नाही. मधुमेह किंवा रक्तातील साखरेची समस्या असलेल्या लोकांनी त्याच्या सेवनाबाबत विशेष सावधगिरी बाळगली पाहिजे.

दुसरीकडे मधाला एक नैसर्गिक गोडवा देणारा पदार्थ मानला जातो. त्यात काही अँटीऑक्सिडंट्स आणि इतर सेंद्रिय संयुगे असतात. पण, त्यात साखरेचे प्रमाणही लक्षणीय असते. त्यामुळे, मधाचे सेवन प्रमाणात करणे महत्त्वाचे आहे. नैसर्गिक किंवा कमी प्रक्रिया केलेले असूनही, गूळ आणि मध हे साखर-मुक्त पर्याय नाहीत. त्यांचे सेवन करताना त्यांच्या प्रमाणाबद्दल जागरूक राहणे महत्त्वाचे आहे.

नारळाची साखर आणि पाम शुगर

विविध स्वीटनर्समध्ये प्रक्रिया केलेली साखर आरोग्यासाठी सर्वाधिक नुकसानकारक ठरू शकते. तज्ज्ञांनी नारळाची साखर (Coconut Sugar) आणि पाम शुगर (Palm Sugar) यांना १० पैकी ६ रेटिंग दिले आहे. पांढऱ्या साखरेच्या तुलनेत नारळाच्या साखरेचा रक्तातील साखरेवर तुलनेने कमी परिणाम होऊ शकतो, असे सांगितले जाते. तर पाम शुगर हा पारंपरिक स्वीटनर असून त्यात काही खनिजेही आढळतात. मात्र, एखादा स्वीटनर नैसर्गिक किंवा कमी प्रक्रिया केलेला आहे, म्हणून तो मधुमेहासाठी सुरक्षित आहे असे मानता येत नाही. स्वीटनरचे सेवन किती प्रमाणात केले जाते आणि दिवसभरात एकूण किती कार्बोहायड्रेट घेतले जातात, याकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

खजुर

खजुरांपासून बनवलेल्या साखरेला किंवा खजूर सिरपला १० पैकी ७ गुण दिले आहेत. संपूर्ण खजुरांपासून बनवलेल्या पर्यायांमध्ये काही फायबर आणि खनिजे असू शकतात आणि त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी तुलनेने कमी वेगाने वाढू शकते. पण, या उत्पादनांमध्ये नैसर्गिक साखर देखील असते.

स्टेव्हिया

स्टेव्हियाला १० पैकी ८ गुण दिले आहेत. स्टेव्हिया हा वनस्पतीपासून तयार होणारा गोड पदार्थ असून, साखरेऐवजी त्याचा वापर केला जातो. त्यात कॅलरीजचे प्रमाण खूप कमी किंवा जवळजवळ नसते. स्टेव्हिओल ग्लायकोसाइड्समुळे स्टेव्हियाला गोड चव मिळते. माफक प्रमाणात सेवन केल्यास, पांढऱ्या साखरेप्रमाणे स्टेव्हियामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी वेगाने वाढत नाही. त्यामुळे कॅलरी आणि साखरेचे सेवन कमी करू इच्छिणारे लोक साखरेला पर्याय म्हणून स्टेव्हियाचा वापर करतात. मात्र, स्टेव्हियाची चव काहीशी कडवट असू शकते, जी काही लोकांना आवडत नाही. साखरेच्या तुलनेत हा कमी-कॅलरी पर्याय असला तरी स्टेव्हियाचे सेवनही योग्य प्रमाणात करणे चांगले.

मग कोणता पदार्थ निवडावा?

एखादा पदार्थ नैसर्गिक किंवा आरोग्यदायी आहे, असे समजून त्याचे जास्त सेवन करू नका. मधुमेह किंवा मधुमेहाची पूर्वस्थिती असलेल्या तसेच वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींनी साखर आणि गोड पदार्थांच्या सेवनाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कोणताही गोडवा असो, त्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे आणि आहारातील एकूण साखर व कार्बोहायड्रेटचे प्रमाण लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.