Navratri Fast Diabetes Care : शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. सणाच्या या खास प्रसंगी लोक उपवास करतात, परंतु मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी उपवास करताना आपली ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवणे हे एक मोठे आव्हान ठरू शकते. या काळात खाण्यापिण्यातील बदल, जेवणाच्या वेळेतील अंतर आणि औषधांच्या वेळेत होणारा बदल यामुळे रक्तातील साखरेची पातळी प्रभावित होऊ शकते. परंतु, योग्य खबरदारी बाळगून सणाचा आनंद घेत आपल्या आरोग्याचीही काळजी घेता येऊ शकते. यावर किम्स हॉस्पिटलच्या क्लिनिकल डायटीशियन आणि सर्टिफाइड डायबिटीक एज्युकेटर डॉ. अर्चना एस. यांनी एका हिंदी वृत्तसंस्थेशी बोलताना, नवरात्रीच्या उपवासादरम्यान डायबिटीसच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

खाण्यापिण्याची घ्या विशेष काळजी

उपवासादरम्यान फळे, बटाटे, साबुदाना आणि शिंगाड्याच्या पिठापासून बनवलेले पदार्थ अमर्यादित प्रमाणात खाल्ले जातात. या अन्नपदार्थांमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे अतिसेवनामुळे ब्लड शुगरची लेव्हल वाढू शकते. म्हणूनच, यांचे सेवन मर्यादित प्रमाणात करा आणि आपल्या आहारात प्रथिने (प्रोटीन) व फायबरने परिपूर्ण असलेल्या पदार्थांचाही समावेश करा.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय दीर्घकाळ उपाशी राहू नका

दीर्घकाळ काहीही न खाल्ल्यामुळे ब्लड शुगर लेव्हल खूप कमी होण्याचा म्हणजेच ‘हायपोग्लायसेमिया’चा धोका वाढू शकतो. हा धोका विशेषतः अशा लोकांमध्ये जास्त असतो, जे इन्सुलिन किंवा ब्लड शुगर कमी करणाऱ्या डायबिटीसच्या गोळ्या घेतात. उपवास करण्यापूर्वी आपल्या एन्डोक्राइनोलॉजिस्टचा सल्ला नक्की घ्या. टाईप-१ डायबिटीस, वारंवार ब्लड शुगर कमी होणे, अनियंत्रित डायबिटीस किंवा डायबिटीसशी संबंधित इतर धोके असलेल्या लोकांनी उपवासादरम्यान विशेष काळजी घेतली पाहिजे.

ब्लड शुगरची नियमित तपासणी करा

उपवासाच्या काळात सामान्य दिवसांच्या तुलनेत अधिक वेळा ब्लड शुगरची तपासणी करा; विशेषतः जर तुम्ही इन्सुलिन किंवा शुगर कमी करणाऱ्या गोळ्या घेत असाल. घाम येणे, हात थरथरणे, चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे, खूप जास्त भूक लागणे किंवा गोंधळल्यासारखे वाटणे यांसारख्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

जर ब्लड शुगर लेव्हल ७० mg/dL पेक्षा कमी झाली, तर डॉक्टरांनी सांगितलेल्या उपचारांचे पालन करा. साधारणपणे यासाठी १५ ग्रॅम वेगाने परिणाम करणाऱ्या कार्बोहायड्रेटचे सेवन केले जाते आणि १५ मिनिटांनंतर पुन्हा ब्लड शुगरची तपासणी केली जाती.

शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नका

डॉक्टरांनी पातळ पदार्थांच्या सेवनावर कोणतीही बंदी घातलेली नसेल, तर उपवासादरम्यान जेव्हा अन्न किंवा पाणी घेण्याची परवानगी असेल, तेव्हा पुरेशा प्रमाणात पाणी प्या. ऊर्जेसाठी गोड फळांचा रस, सरबत किंवा अतिगोड लस्सीचे सेवन करू नका, कारण यामुळे ब्लड शुगर वेगाने वाढू शकते.

औषधोपचारात स्वतःच्या मनाने बदल करू नका

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय इन्सुलिन किंवा डायबिटीसच्या औषधांचे प्रमाण (डोस) कमी करू नका, ती बंद करू नका किंवा त्यांच्या वेळेत बदल करू नका. उपवासादरम्यान खाण्यापिण्याची सवय आणि ब्लड शुगर लेव्हल लक्षात घेऊन डॉक्टर तुमच्या औषधांच्या डोसमध्ये आवश्यक ते बदल करू शकतात.

उपवास सोडताना काळजी घ्या

दीर्घकाळ उपाशी राहिल्यानंतर एकदम खूप जास्त जेवू नका. उपवास सोडताना संतुलित आहार घ्या आणि एकाच वेळी जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ खाणे टाळा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, उपवासापोटी आरोग्याशी तडजोड करू नका. जर खूप जास्त भूक किंवा तहान लागणे, ब्लड शुगर खूप कमी किंवा जास्त होणे, उलट्या होणे, अंगात खूप अशक्तपणा जाणवणे किंवा चक्कर येणे अशी लक्षणे दिसली, तर लगेच उपवास सोडा आणि गरज भासल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.