डोके आणि घशाचा कर्करोग सामान्यतः डोके आणि घशाच्या श्लेष्मल पृष्ठभागावर असलेल्या स्क्वॅमस पेशींमध्ये उद्भवतो. या पेशी तोंड, घसा आणि स्वरयंत्रात आढळतात. अशा कर्करोगांना डोके आणि घशाचा स्क्वॅमस सेल कार्सिनोमा (Head and Neck Squamous Cell Carcinoma), असे म्हटले जाते. काही प्रकारचे कर्करोग डोके आणि घशातील लाळ ग्रंथी, सायनस, स्नायू किंवा नसांमधूनही उद्भवू शकतात.

डोके आणि घशाचा कर्करोग झाल्यास सुरुवातीची लक्षणे अनेकदा सामान्य आजारांसारखीच दिसू शकतात. त्यामुळे काही विशिष्ट लक्षणांकडे दुर्लक्ष न करता, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. घशाचा कर्करोग होण्याचा धोका कोणाला अधिक असतो आणि त्याची कोणती लक्षणे दिसू शकतात, याबाबत फोर्टिस हॉस्पिटलमधील वरिष्ठ सल्लागार, युनिट प्रमुख आणि हेड अँड नेक सर्जन डॉ. अंबेश सिंग यांच्याकडून जाणून घेऊया…

घशाच्या कर्करोगाचा धोका कोणाला जास्त?

तंबाखू, गुटखा, पान मसाला, विडी किंवा सिगारेटचे सेवन करणाऱ्या व्यक्तींमध्ये डोके आणि घशाच्या कर्करोगाचा धोका अधिक असू शकतो. त्याचबरोबर मद्यपान करणाऱ्या व्यक्तींमध्येही हा धोका वाढतो.

एचपीव्ही (HPV) संसर्ग हादेखील एक महत्त्वाचा जोखीम घटक आहे. विशेषतः घशाच्या काही विशिष्ट प्रकारच्या कर्करोगांशी HPV संसर्गाचा संबंध आढळतो.

घशाच्या कर्करोगाची लक्षणे कोणती?

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट (अमेरिका)च्या माहितीनुसार, डोके आणि मानेच्या कर्करोगामध्ये दिसू शकणारी काही लक्षणे खालीलप्रमाणे :

मानेवर गाठ येणे किंवा तोंडात अथवा घशात न बरी होणारी जखम होणे, हे त्यातील महत्त्वाचे लक्षण असू शकते. ही जखम काही वेळा वेदनादायकही असू शकते. त्याशिवाय सतत घसा खवखवणे, अन्न किंवा पाणी गिळण्यास त्रास होणे आणि आवाजात बदल होणे, जसे की आवाज बसणे किंवा घोगरा होणे, अशी लक्षणेही दिसू शकतात.

ही लक्षणे इतर कमी गंभीर आजारांमध्ये किंवा सामान्य व्याधींमध्येही दिसून येऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक वेळी ही लक्षणे कर्करोगाचेच संकेत आहेत, असे नाही. मात्र, अशी लक्षणे दीर्घकाळ टिकून राहिल्यास किंवा वारंवार जाणवत असल्यास, त्याकडे दुर्लक्ष न करता, डॉक्टरांचा सल्ला घेऊन आवश्यक ती तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे.

तोंडाच्या भागात कर्करोगाची लक्षणे

जर तोंडाच्या भागात कर्करोगाच्या पेशी असतील, तर हिरड्या, जीभ किंवा तोंडाच्या आतील अस्तरावर पांढरे किंवा लाल डाग दिसू शकतात. जबड्यात गाठ किंवा सूज येऊ शकते. त्यामुळे कृत्रिम दात (डेंचर्स) नीट बसत नाहीत किंवा ते वापरताना अस्वस्थता जाणवू शकते. त्याशिवाय तोंडातून असामान्य रक्तस्राव होणे किंवा तोंडात सतत वेदना जाणवणे, अशी लक्षणेही दिसू शकतात.

घशाशी संबंधित लक्षणे

घशाच्या भागात कर्करोग असल्यास गिळताना वेदना होणे, मानेत किंवा घशात सतत वेदना जाणवणे, कानात वेदना होणे किंवा कान वाजल्यासारखे वाटणे, तसेच ऐकण्यास त्रास होणे, अशी लक्षणे दिसू शकतात.

स्वरयंत्राशी संबंधित लक्षणे

स्वरयंत्रामध्ये कर्करोग असल्यास श्वास घेण्यास किंवा बोलण्यास त्रास होऊ शकतो. गिळताना वेदना होणे किंवा कानात वेदना जाणवणे हीदेखील काही संभाव्य लक्षणे आहेत. आवाजात सातत्याने बदल होणे किंवा आवाज घोगरा होणे यांकडेही दुर्लक्ष करू नये.

नाक आणि सायनसशी संबंधित लक्षणे

नाकाभोवती किंवा नाकपुडीच्या आतील भागात कर्करोग असल्यास नाक सतत बंद राहणे, प्रतिजैविके (अँटीबायोटिक्स) घेतल्यानंतरही बरा न होणारा किंवा वारंवार होणारा सायनसचा संसर्ग, नाकातून रक्त येणे आणि वारंवार डोकेदुखी होणे, अशी लक्षणे दिसू शकतात. काही प्रकरणांमध्ये डोळ्यांभोवती सूज येणे किंवा दृष्टीशी संबंधित समस्या जाणवू शकतात. तसेच वरच्या दातांमध्ये वेदना होणे किंवा कृत्रिम दात (डेंचर्स) वापरताना समस्या निर्माण होणे, अशी लक्षणेही दिसू शकतात.

लाळ ग्रंथींशी संबंधित लक्षणे

लाळ ग्रंथींमध्ये कर्करोग असल्यास हनुवटीखाली किंवा जबड्याच्या हाडाभोवती सूज किंवा गाठ येऊ शकते. चेहऱ्याच्या स्नायूंमध्ये बधिरपणा किंवा चेहऱ्याच्या स्नायूंना पक्षाघात होणे, तसेच चेहरा, हनुवटी किंवा मानेच्या भागात सतत वेदना जाणवणे, अशी लक्षणे दिसू शकतात.

(महत्त्वाचे : वरीलपैकी एखादे लक्षण दिसले म्हणजे कर्करोग आहेच, असे नाही. मात्र, लक्षणे सतत दिसत वा जाणवत राहिल्यास, वाढत असल्यास किंवा वारंवार जाणवत असल्यास वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि आवश्यक ती तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे.