आरोग्य प्रणालीच्या क्षमतेमध्ये वाढ करून भारत आणि दक्षिण पूर्व आशियातील डेंग्यू तसेच चिकनगुनियाचा प्रसार, त्याला रोखणे, त्यावर उपचार करणे आवश्यक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

एखाद्या घटकामार्फत आजार पसरविण्याला (संक्रमणाच्या माध्यमातून) प्रतिबंध घालण्यासाठी राष्ट्रीय तसेच राज्य स्तरावर आरोग्य क्षमता सुधारण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आजार संक्रमित करणाऱ्या (व्हेक्टरला) जर प्रतिबंध घातला तर आजारावर नियंत्रण शक्य असल्याचे, जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व क्षेत्राच्या प्रादेशिक संचालक पूनम खेत्रपाल सिंग यांनी सांगितले.

अलीकडील काही वर्षांमध्ये वाढत्या अनियोजित नागरीकरणामुळे, वाढत्या स्थलांतर आणि पर्यावरणात झपाटय़ाने झालेल्या बदलांचा परिणाम म्हणून संक्रमणामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले असल्याचे, जागतिक आरोग्य संघटनेला आढळून आले आहे.

या संक्रमित होणाऱ्या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी देशांनी आरोग्य आणि बिगर आरोग्य क्षेत्रात समन्वय साधून हे क्षेत्र बळकट करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मलेरिया आणि इतर संक्रमित आजार एकमेकांशी संबंधित आहेत. ते अस्वच्छ पाण्यामुळे प्रसारित होतात. त्यामुळे आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीने स्वच्छतेवर अधिक भर देण्याची आवश्यकता आहे. देशांनी स्थानिक डासांच्या प्रजातींबाबत अधिक अभ्यास करून त्याला नष्ट करण्याची आवश्यकता असल्याचे सिंग यांनी म्हटले आहे.

संक्रमित आजार हे गरीब लोकसंख्या आणि आर्थिक विकास कमी असलेल्या भागात अधिक प्रमाणात होतात. यामुळे येथील लोकांचा रुग्णालयामध्ये उपचार करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात खर्च होतो. परिणामी त्याचा परिणाम उत्पादन कमी होणे आणि पर्यटन क्षेत्रावर घडून येतो. त्यामुळे हे आजार दूर करण्यासाठी थेट कृती कार्यक्रमाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.