Benefits of Brushing Teeth With Neem Stick: सगळेच जण सकाळी उठल्याबरोबरच टूथब्रश हातात घेतात. दात स्वच्छ करण्यासाठी शक्यतो तेवढी चांगली आणि उच्च दर्जाच्या टूथपेस्टचा वापर लोक करतात. पण जर तुम्हाला कधी कडुलिंबाच्या काडीने दात घासण्याची वेळ आली तर तुम्हाला तिची चव आणि त्यामुळे तोंडात येणारा ताजेपणा याचा अनुभव घेता येईल. दात स्वच्छ करण्यासाठी कडुलिंबाच्या काड्यांचा वापर ही एक जुनी पद्धत आहे. पण आजही अनेक जण या पद्धतीचा वापर करतात. विशेष म्हणजे कडुलिबांच्या काड्यांचा वापर कालबाह्य झालेला नाही, तर त्याच्या नैसर्गिक गुणधर्मांमुळे लोक आजही त्याचा वापर दैनंदिन तोंडाच्या स्वच्छतेसाठी करतात. त्याला दातुन असेही म्हटले जाते.
मात्र कडुलिंबाच्या या काड्या खरंच दात आणि हिरड्यांसाठी फायदेशीर आहे का? त्याचा रोज वापर करता येतो का आणि ते टूथब्रशला पर्याय म्हणून वापरू शकतो का? हे प्रश्न समजून घेणं महत्त्वाचं आहे. दातांच्या स्वच्छतेसाठी नेमकी कोणती टूथपेस्ट वापरावी किंवा पिवळेपणा घालवण्यासाठी काय काय घरगुती उपाय करावेत याचे बरेच व्हिडीओज सोशल मीडियावर दाखवले जातात.
कडुलिंबाच्या काड्यांनी दात स्वच्छ करण्याचा फायदा काय?
दात स्वच्छ करणे: एक मऊ काडी चावल्यानंतर त्याने हळुवारपणे दाता घासा. यामुळे दातांवर साचलेली घण काढून टाकण्यास मदत होते.
हिरड्या स्वच्छ करणे: काडीच्या साहाय्याने हिरड्यांभोवतीची घाण हळुवारपणे काढता येते. मात्र हिरड्या जोरात घासू नका. त्यामुळे इजा होऊ शकते.
तोंडाची दुर्गंधी: तोंड व्यवस्थित स्वच्छ न केल्यास तोंडाला दुर्गंधी येऊ शकते. कडुलिंबामुळे तोंड अधिक स्वच्छ आणि ताजे वाटू शकते.
कमी खर्चिक: कडुलिंबाच्या काड्यांसाठी टूथपेस्ट किंवा इतर कोणत्याही साहित्याची गरज नसते. तुमच्या जवळ एखादे स्वच्छ कडुलिंबाचे झाड असल्यास एक लहान फांदी पुरेशी आहे. किंवा आयुर्वेदिक दुकानातही ती उपलब्ध असते.
कडुलिंब हा अँटीबॅक्टेरियल म्हणून काम करतो. त्यामुळे पूर्णपणे नाही पण काही अंशत: तो दातांसंबंधित किंवा हिरड्यांसंबंधित समस्यांवर उपाय ठरू शकतो.
कडुलिंबाचा टूथब्रश कसा वापरावा?
- सर्वात आधी कडुलिंबाची एक स्वच्छ, बारीक फांदी घ्या. त्यावर धूळ किंवा घाण नाही याची खात्री करा.
- आता काडीचे एक टोक चावा. ते मऊ होऊन तंतुमय झाल्यावर त्याने हळुवारपणे दात घासा.
- टूथब्रश तुमच्या दातांच्या पुढच्या आणि मागच्या दोन्ही भागांवर हळुवारपणे वापरा. तुमच्या हिरड्यांवरही ते हळुवारपणे वापरा.
- दात घासल्यानंतर तोंड पाण्याने स्वच्छ धुवा.
कडुलिंबाने दात घासताना या चुका टाळा
- कडुलिंबाची काडी जास्त जोरात चोळू नका. यामुळे हिरड्यांना इजा होऊ शकते.
- धूळ लागलेल्या किंवा घाणेरड्या फांद्या तोंडात घालू नका.
- कोणासोबतही त्या काड्या शेअर करू नका.
- जुन्या काड्या पुन्हा वापरू नका. प्रत्येक वेळी ताजी, स्वच्छ काडी वापरणे योग्य आहे.
- जर तुम्हाला दातदुखी, हिरड्यांमधून रक्त, सूज किंवा सतत तोंडाला दुर्गंधी येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
फक्त कडुलिंबाच्या काड्यांनी दात घासणे पुरेसे आहे का?
तुम्ही कडुलिंबाच्या काड्या वापरत असाल तरी दातांची संपूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला दात किडणे, हिरड्यांचे आजार किंवा इतर समस्या असतील तर केवळ काडीने त्यावर उपचार करण्याचा प्रयत्न करू नका. तो एक पर्याय म्हणून अतिशय उपयुक्त आहे.
