नव्या इलेक्ट्रिक चेतकवर तब्बल तीन हजार किलोमीटरचा टप्पा पूर्ण करत २० चेतकस्वार गुरूवारी पुण्यात दाखल झाले. आकुर्डी येथे बजाज ऑटोचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी या यात्रेचे स्वागत केले. यावेळी सोबत राजीव बजाजही होते.
भारतातील कित्येक पिढय़ांसाठी दुचाकीच नव्हे तर कुटुंबातील सदस्याचे स्थान पटकावलेली ‘बजाज चेतक’चे नुकतेच विद्युत शक्तीतील रूप विकसित करण्यात आले असून, ही दुचाकी येत्या जानेवारीपासून बाजारात उपलब्ध होणार आहे.

नवी दिल्लीत १६ ऑक्टोबरला नव्या इलेक्ट्रिक चेतकचे अनावरण झाले. त्यानंतर दिल्लीतून सुरु झालेल्या चेतक इलेक्ट्रिक यात्रेने गुरुवारी प्रवास पूर्ण केला. बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यानिमित्ताने म्हणाले, ‘‘लोकप्रियतेच्या शिखरावर असताना, भारतात १.३ कोटी चेतक त्याकाळात विकल्या गेल्या. खरेदी किमतीपेक्षा अधिक मूल्य पुनर्विक्रीतून देणारे हे बहुदा ते जगातील एकमेव उत्पादन असेल. तो काळ नवीन पिढीसाठी परत आणतानाच, इलेक्ट्रिक चेतक हे त्याचे पर्यावरण पूरक पाऊल आहे.’’

आणखी वाचा- F77 : आली नवी इलेक्ट्रिक बाइक, एकदा चार्ज केल्यास 150 Km मायलेज

शीट मेटल बॉडी पॅनल, आकर्षक रंगसंगती आणि डिझाईन यांमुळे नवीन आणि जुन्याची सांगड घालण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. जानेवारीपासून इलेक्ट्रिक चेतक बाजारात ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे, अशीही बजाज यांनी माहिती दिली. एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर तब्बल ९५ किलोमीटरचे अंतर कापणे चेतकच्या ग्राहकांना शक्य होणार असल्याचे राजीव बजाज यांनी सांगितले. इलेक्ट्रिक चेतकच्या किमतीबाबत मात्र माहिती देण्यात आलेली नाही.